आतंकवाद, दहशतीचे वातावरण, युद्धजन्य परिस्थिती, पर्यावरणाचा ऱ्हास, कुटुंब व्यवस्थेचा बिमोड, स्वकेंद्रीतता, पैसा हेच साध्य, श्रीमंत व गरीब यात वाढणारी दरी, अनैतिक जीवघेणी स्पर्धा अशा अनेक गंभीर समस्यांनी सर्व जगास ग्रासले आहे. या सर्व समस्या मानवाने निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सर्व समस्यांवर मानवानेच उत्तरे शोधावयास हवीत आणि तसे प्रयत्न संपूर्ण जगात चालू आहेत. भारतीय विचार संपदेमध्ये सर्वसमस्यांवर उत्तरे आहेत. मात्र या विचार महासागरातून, वेगवेगळ्या ग्रंथ-शिंपल्यामधून, समस्या पूर्तीचे मोती शोधण्याचे काम करावयास हवे आहे. पुढील पंचवीस वर्षांच्या या अमृत काळात ही मोहीम आज वयाच्या पस्तीशीत असणाऱ्या व साठीत पोहोचलेल्या तरुण अभ्यासकांनी कसोशीने लढावयाची आहे. पंचवीस वर्षांनी भारत आपल्या स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करणार आहे. तेंव्हा भारताने बऱ्याचशा जागतिक समस्यांवर उत्तरे दिलेली असावयास हवीत. तेंव्हा जगातील बहुसंख्य राष्ट्रे भारत हा विश्वगुरु आहे हे मान्य करेल. आजच्या तरुणांच्या अमृत कालातील पंचवीस वर्षांच्या तपःश्चर्येची ती परिणती असेल.
पश्चिमी गरूड भरारीतून समस्या-निर्मिती
भारतावर गेली दोनशे वर्षे ‘पश्चिमी जगतातील’ घटनांचा व युरोपात जन्म पावलेल्या विचार प्रवाहांचा पगडा आहे. युरोपातील लोकच अमेरिकेत गेले आणि तेथील लोकांचा संहार करून त्यांनी अमेरिका हा देश निर्माण केला. औद्योगिक क्रांती व अमाप नैसर्गिक संपत्ती याचा वापर करून अमेरिकेने आर्थिक संपन्नता मिळविली. युरोप व अमेरिका मिळून एक ‘पश्चिमीजग’ आहे असे संबोधले जावू लागले आहे. या पश्चिमी जगाने बाह्यजगताचा विस्मय वाटावा असा अभ्यास केला आहे व तंत्रज्ञानाची गरूड भरारी घेतली आहे. आज प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल फोन नावाचे साधन आहे हे त्याचे प्रत्यंतर आहे.
औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या आकाराच्या कारखानदारीस सुरवात झाली. त्यातून मालक-कामगार संघर्ष निर्माण झाला. त्याचाच परिणाम म्हणून समाजात श्रीमंत-गरीब अशी मोठी दरी निर्माण झाली. यातून समाजात संघर्ष निर्माण झाले. युरोपात शासनावर चर्चचा वरचष्मा राहील्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले. या सर्व संघर्षास उत्तरे म्हणून, प्रतिक्रिया म्हणून साम्यवाद, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आदी विचारप्रवाहांचा जन्म युरोपात झाला.
याच काळात युरोपातील धाडसी व्यापारी मंडळींनी संपन्न असलेल्या भारताकडे जलमार्गाने येण्याचे धाडस दाखविले. व्यापारासाठी आलेल्या इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांनी भारतातील सामाजिक उणीवांचा फायदा घेवून भारतातील शासन ताब्यात घेतले. या व्यापाऱ्यांना औद्योगिक क्रांतीचा फायदा मिळाला. वसाहतीतीत कमी दराने कच्चा माल विकत घेवून त्यांनी अनेक वस्तूंची निर्मिती त्यांच्या देशात केली. हा पक्का माल अवाजवी दराने वसाहतींत विकून लूट करून आपले देश संपन्न केले.
विसाव्या शतकाच्या सुरवातीस साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, भांडवलशाही, धर्मनिरपेक्षता आदी संकल्पना विविध देशात रुजू लागल्या. राजकीय जीवनाने या संकल्पनांचा आधार घेतला. जगातील अनेक देशांनी या विचार प्रवाहांच्या मिश्रणाच्या कार्यवाहीचा ही अनुभव घेतला. जगाने गेल्या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेल्या या सर्व संकल्पनांचे फायदे-तोटे समजून घेतले आहेत. या विचार प्रवाहांच्या आधारे समाज सुखी होवू शकत नाही यात आता विचारवंतांचे एकमत आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीतून सुखाचा मार्ग कसा शोधावयाचा याचा विचार जगभरातील विचारवंत करू लागले आहेत.
भारताकडे आहेत समस्यांची उत्तरे
जगातील जटील समस्यांवरील तोडगे भारताकडे अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सुप्त स्वरूपामध्ये आहे. भारतीय ऋषिमुनींनी पाच हजार वर्षांपूर्वी मानवाचे शरीर, मन, बुद्धी, चित्त, आत्मा, या पाच कोषांचा सखोल अभ्यास केला. तसेच या अंतरजगताचा संबंध धर्म, धर्मसंस्था, व्यक्ती, समाज, समाजातील विविध व्यवसाय, पर्यावरण, पंचमहाभूते, सृष्टी, ईश्वर संकल्पना, ब्रह्मांड पसारा, ग्रहगोलांचा वातावरणात होणारा परिणाम यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला. तो सर्व चार वेद, उपनिषदे, भागवत, गीता आदी ग्रंथांमध्ये विदित केलेला आहे.
‘सर्वेत्र सुखिन: सन्तु’ साठी भारतीय ग्रंथ
भारतीय ग्रंथ हे कोणत्याही घटनेची प्रतिक्रिया नाही. या ग्रंथांतून कोणत्याही संघर्षास आमंत्रण नाही. ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया:’ अर्थात सर्व जग सुखात नांदावे, सर्व जग निरामय असावे या उद्देशाला धरून ती सर्व मांडणी केलेली आहे. सध्याच्या समस्येवर अमुक एका ग्रंथात वा ग्रंथातील अमुक एका प्रकरणामध्ये उत्तर आहे अशी स्थिती नाही. बहुतेक ग्रंथ हे ओव्या स्वरूपात आहेत. एक-एक समस्या घेवून त्या समस्येवरचे उत्तर ग्रंथ अभ्यासून प्रचलित भाषेत तयार करण्याचे काम करणे आवश्यक आहे. या पुरातन ग्रंथांच्या आधाराने अनेक संतांनी कालानुरूप ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध आदी विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिले आहेत. समस्येनुसार याही ग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपण तुकाराम महाराजांचा जगद्गुरू म्हणून जयजयकार करतो, पण त्यांच्या अभंगातील विचार जगापुढे कोठे आहेत? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विश्वरत्न म्हणतो. त्यांचे विचार जगापुढे येणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांचा अभ्यास प्रचलित संदेश पद्धतीत मांडणे जरूर आहे.
गुलामगिरीचा ‘जेट लॅग’ दूर व्हावयास हवा
गेल्या दीडशे वर्षात जागतिक समस्यांवर भारताकडे असलेली उत्तरे ऐकून घेतली जातील अशी स्थिती नव्हती. भारत पारतंत्र्यात होता, गुलामीत होता. गुलामीत असलेल्या विचारवंतांकडे कोणी लक्ष देत नाही. स्वामी विवेकानंद हे जागतिक कीर्तीचे प्रज्ञावंत, प्रज्ञासूर्य विचारवंत हे तर खरेच. तरीपण ते गुलाम असलेल्या भारतातील आहेत म्हणून त्यांच्या व्याख्यानाला जपानमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्हती.
आता आपण कोणाचे गुलाम नाही, स्वतंत्र झालो आहोत. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून परदेशाचा प्रवास ही समाजात नित्याची बाब झाली आहे. आज जेट विमानाने अमेरिकेतील न्यूयार्क शहरामधून तेरा हजार किलोमीटर सलग प्रवास करून सोळा तासात भारतात मुंबईस पोहोचता येते. परदेशातून आलेल्या आपल्या नातेवाईकांना फोन करावा तर ते म्हणतात आमचा सध्या ‘जेट लॅग’ आहे, त्यामुळे आमचे मन, शरीर पूर्वपदावर नाही. तद्वत संपूर्ण भारत देश हा १००० वर्षे परकीय आक्रमणांच्या, परकीय विचार प्रवाहांच्या छायेत होता. दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता. स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात भारत गुलामगिरीच्या पराभूत वृत्तीच्या ‘जेट लॅग’ मध्ये होता. त्यामुळे भारताचे मन व बुद्धी त्याच्या स्वाभाविक स्थितीत, पूर्वपदावर नव्हती. आता भारताचे शरीर व मन पूर्वपदावर यावयास हवे. सर्व भारतीयांनी हा ‘गुलामगिरीचा जेट लॅग’ दूर करून आपल्या स्वतंत्र प्रतिभेच्या आधारे कार्यशील व्हावयास पाहिजे आहे.
शतक महोत्सवी लक्ष्य
आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगात सर्वत्र स्वागत होत आहे. ते प्रसंगानुरूप आकर्षक पेहराव करतात म्हणून त्यांचा ‘मोदी.. मोदी..’ असा उदोउदो होत नाही तर ते जागतिक समस्यांवर भारतीय ग्रंथातील विचारांचे आधारे स्पष्ट उत्तरे सांगतात म्हणून त्यांचा सत्कार होत आहे. जगास व जगातील भारतीयांना त्या उत्तरातील यथार्थता पटत आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील प्रथम श्रेणीचे नेते आहेत.
भारताने निर्माण केलेली विचारसंपदा शाश्वत विचारांवरच आधारित आहे, या विचार संपदेची गुणवत्ता जगास माहीत आहे. त्यामुळे जगासमोरील आव्हानांवरील उपाय भारतातच मिळू शकतात अशी जगाला खात्री आहे. आता भारताला समस्यांची कालसुसंगत उत्तरे देण्याची तयारी करावयाची आहे. त्या उत्तराची प्रयोगभूमी म्हणून भारतास त्या उत्तराचे प्रत्यंतर स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवापर्यंत म्हणजे २०४७ पर्यंत दाखवावयाचे आहे.
वयाची साठी गाठलेल्या पिढीच्या पाठीशी चाळीस वर्षांच्या कामाचा अनुभव असणार आहे. बऱ्याच जणांनी उदरनिर्वाहाची किमान सोय करून ठेवली असणार आहे. त्यांचेकडे या संशोधन कार्यास लागणारा वेळ असणार आहे. आयुष्याची उरलेली दोन तपे म्हणजे २४ वर्षे भारतीय संपदेचा अभ्यास करून काही समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी खर्च केली तर जीवन सार्थकी लागल्याचा आनंद मिळणार आहे. भारत विश्वगुरु झालेला पाहण्याची संधी भारतातील व भारताबाहेर राहणाऱ्या तरुणांनी खेचून आणावयाची आहे.
'समर्थांचा दासबोध' एक ठळक उदाहरण
श्रीसमर्थांचा दासबोध एक ठळक उदाहरण आहे. समर्थांनी पहिल्या समासात दासबोधासाठी संदर्भ म्हणून घेतलेल्या ग्रंथांची यादी दिली आहे. समर्थांची बालपणातील पहिली १२ वर्षे जांभ या गावी गेली. त्यानंतर १२ वर्षांच्या अभ्यास काळात नाशिकजवळ टाकळी येथे किती विविध ग्रंथांचा अभ्यास केला. त्यानंतर समर्थांनी भारताचे १२ वर्षे भ्रमण केले. समाज व्यवस्थेचा अभ्यास केला. जे अभ्यासले, जे अनुभवले त्याच्याआधारे त्यांनी दासबोध लिहिला. त्यामुळे दासबोधात शरीरशास्त्र आहे. मानसशास्त्र आहे. पर्यावरणशास्त्र आहे. खगोलशास्त्र आहे. मायाब्रह्माची तात्विक उकल आहे. संभाषणशास्त्र आहे. व्यवस्थापनशास्त्र आहे. नेतृत्वशास्त्र आहे. सर्व अभ्यासकांच्या पुढे आव्हान आहे ते हे की, अनेक ग्रंथ अभ्यासून ही सर्व शास्त्रे प्रचलित भाषेत समाजासमोर आणावयाची आहेत. दासबोधातील ७ हजार ८०० ओव्यांचा अर्थ समर्थविचार अभ्यासक प्रा. के. वि. बेलसरे, ल. रा. पांगारकर, सुनील चिंचोलकर यांनी इंग्लिश, मराठी भाषेत उपलब्ध करून दिला आहे. श्री तांबवेकर यांनी संपूर्ण दासबोध इंग्लिश भाषेमध्ये अनुवादित केला आहे. तसाच अभ्यास अनेक ग्रंथांचा झाला आहे. या सर्वांचा अभ्यास करून समस्यांवरील उत्तरे प्रचलित पद्धतीने विविध भाषांमध्ये उपलब्ध करून द्यायला पाहिजे आहेत. जगातील विचारवंतांचे सहाय्यार्थ जे माहिती तंत्रज्ञान आहे ते सर्व आता आपणांस उपलब्ध आहे. त्या सर्वांचा उपयोग करून जगातील जटील समस्यांवरची उत्तरे जगापुढे आणून द्यावयाची आहेत.
समस्यापूर्तीचे ग्रंथ भारताने जगास द्यायचे आहेत
आपणांस माहित आहे की Stephan Covey यांचे The 7 Habits of Highly Effective People हे जगातील ‘The Best seller book’ आहे. तसेच एखादे ‘Ten answers from Dasbodh for 100 Global Crises’ असे पुस्तक परदेशातून आपणाकडे येईल. त्याचा आपण गौरव करू व त्या पुस्तकाचा मोठ्या अभिमानाने मराठीत अनुवादही करू. पण आता असे पुस्तक आपणच जगास द्यायचे आहे. कोणी परदेशी अभ्यासक असे पुस्तक देईल याची वाट पहायची नाही.
ध्येयसिद्धीसाठी ऋषी बनावयाचे आहे
परिस्थिती अनुकूल आहे. तशीच ती स्फोटक पण आहे. एकाबाजूने भारत शक्तिमान बनत आहे तर दुसऱ्या बाजूस संपूर्ण भारतास ख्रिश्चन बनवायचे, इस्लामी बनवायचे अशी षड्यंत्रे जागतिक स्तरावर चालू आहेत. भारतात बहुसंख्यांक हिंदूंना मारक अशी विधायके बहुमताने मंजूर होवू शकतात ही स्थिती या षड्यंत्रांना बळ देणारी आहे. याचा गांभीर्याने विचार भारतीय जनतेने करावयाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६७४ साली स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याने परकीय शत्रूंना परास्त केले व स्वकीय आपलेसे करून पुढे अठराव्या शतकात हिंदवी स्वराज्याचा विस्तार उत्तरेस अटकेपासून दक्षिणेत तंजावरपर्यंत केला. तशीच स्थिती आज आहे. आज आप्तस्वकीय, मोगल, ख्रिश्चन, साम्यवाद, समाजवाद, धर्मनिरपेक्षता असे अनेक शत्रू आपल्या भोवताली आहेत. त्या शत्रूंना आपल्या शक्तीने व कालसुसंगत विचार संपदेने आपलेसे करावयाचे आहे.
भारताचे अंतिम ध्येय
‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ म्हणजे सर्व जग सुशील करावयाचे आहे हे भारताचे अंतिम ध्येय आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही धारणा आहे. या ध्येयाची पूर्ती करण्याचे हे आव्हान आजच्या पस्तीशीतील तरुण वर्गाने व निवृत्त अभ्यासू वर्गाने अंगावर घ्यायचे आहे. संन्यासी योद्धा स्वामी विवेकानंद म्हणायचे, “पूर्वीच्या ऋषिंनी मोठे काम केले आहे. आता तुम्ही ऋषी बनायचे आहे. ज्ञानी योद्द्धा बनायचे आहे. त्यांच्यापेक्षा चांगले काम करावयाचे आहे”.
अमृत काळाचा संकल्प
सार्थक जीवनासाठी स्वामी विवेकानंद सुचवितात की ‘माणसाने आयुष्यात एक ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी आयुष्यभर काम करावे’.
आज पस्तीशीत असलेल्या तरुणांनी पहिल्या २४ वर्षात भारतीय जीवन पद्धतीचे संस्कार ग्रहण केले आहेत. विविध शाखांचे शिक्षण घेतले आहे. काहींनी त्यानंतरच्या १२ वर्षात व निवृत्तांनी ३६ वर्षात व्यवसाय, नोकरीनिमित्त भारतात व जगातील अनेक देशात प्रवास केलेला असणार आहे. भारतातील समाज स्थितीची व जगातील विविध देशातील परीस्थितीची ओळख त्यांना झाली आहे. आज साठीस पोहोचून निवृत्त झालेल्या अभ्यासू तरुणांनी उदार निर्वाहाची सोय करून ठेवल्यामुळे ते तर चांगल्या स्थितीत आहेत. आता या सर्व तरूणांनी आपल्या आवडीचे ध्येय निवडले आणि पुढील २४ वर्षात निवडलेल्या क्षेत्राची मांडणी करून भारतीय विचार संपदेमधून जागतिक समस्यांवरची उत्तरे जगास पटवून दिली तर ते त्यांच्या जीवनाचे सार्थक ठरेल. तेंव्हा आजचे ३६ वर्षांचे तरुण ६० वर्षांचे होतील, आजचे ६० वर्षांचे तरुण ८४ वर्षांचे प्रौढ तरुण असतील. त्या सर्वांना भारत जगन्मान्य विश्वगुरु पाहण्याचे भाग्य मिळेल. जटील जागतिक समस्यांवरची उत्तरे भारतीय विचार संपदेतून शोधून देण्याच्या महान प्रकल्पात सहयोग देण्याचा संकल्प त्यांनी मनाशी केला पाहिजे.
विद्यापीठांमध्ये संशोधन कक्ष
मानवाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर उत्तरे शोधण्याचा संकल्प केलेल्या अभ्यासकांना सुयोग्य साधनसामग्री उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आज देशात सर्व भागात अंतरराष्ट्रीय दर्जाची अनेक विद्यापीठे आहेत. त्या विद्यापीठांनी भारतीय संपदा संशोधन कक्ष निर्माण करावयास हवेत. तेथे विद्यापीठातील पस्तीस वर्षीय विद्यार्थी व विद्यापीठाच्या आसमंतात राहणारे निवृत्त झालेले साठ वर्षीय अभ्यासक यांना संशोधनास योग्य अशा सोयीसुविधा प्राप्त करून देण्याची व्यवस्था करता येईल. देशात अनेक विद्यापीठे आणि शिक्षण संस्था आहेत. या सर्वांकडे जागा, ज्ञानी प्राध्यापक, वाचनालय आदी सोयी आहेतच. त्या ‘भारतीय विचार संपदा संशोधन कक्ष’ निर्माण करू शकतात. त्याच्या माध्यमातून भारतीय विचार संपदेमधून समस्या पूर्तीचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले तर ते संपूर्ण देशास मार्गदर्शक होवू शकतील.
---------
[संदर्भ :
https://vskpune.org/item/89f0fd5c927d466d6ec9a21b9ac34ffa
https://epaper.mahamtb.com/index.php?edition=Mpage&date=2023-07-17&page=5]
---------------------------------------