नमस्कार.
संवादाची साधने विपुल आहेत; परंतु संवाद अर्थपूर्ण, तर्कशुद्ध होण्याला अधिक मोल आहे. हा टप्पा सहजसाध्य नाही, परंतु अशक्यही नाही. या टप्प्याच्या दिशेने जाण्यासाठी या वेबसाईटचे प्रयोजन.
जागतिक माहिती प्रवाह विषम आहे. अपुरी माहिती, विपर्यस्त माहिती, एकाच प्रकारची सोईची माहिती, हे सारे माहितीप्रवाहातील दोष आहेत. याचा गेली आठ शतके जग अनुभव घेते आहे. ज्ञान म्हणजे काय, योग्य कशाला म्हणायचे, अयोग्य कशाला संबोधायचे, याचे निकष चौदाव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत युरोपातून निश्चित झाले. विसाव्या शतकात त्याची जागा अमेरिकेने घेतली. मानवी समाज हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि त्यातूनच त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन निश्चित झालेला आहे, हा तर्क न अजमावताच फक्त नव्या युगातील ज्ञानपरंपरा प्रस्थापित केली गेली. या नव्या युगाच्या ज्ञानात भौतिक सुखाला केंद्रस्थानी ठेवल्याने त्याचा स्वीकारही अभूतपूर्व वेगाने झाला. हजारो वर्षांची ज्ञानपरंपरा मोडीत काढली गेली.
ज्ञान सतत वृद्धिंगत होत असते, जे टिकाऊ नसते ते आपोआप कालबाह्य होते, या प्रगल्भतेचा अभाव या आधुनिक ज्ञानपरंपरेत होता. त्यामुळे ज्ञानपरंपरा जेत्यांचीच, असा काहीसा चमत्कारिक समज रुजविला गेला. जगभरातील हजारो पारंपरिक कौशल्ये दुय्यम ठरविली गेली, आणि त्यांना हिणकसही लेखले जाऊ लागले. राष्ट्रवाद, जन्मभूमी या कल्पना नकारात्मक मानल्या जाऊ लागल्या. ज्यांनी जगातील प्रत्येक भाग आपल्या टाचेखाली आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला, त्यांनीच आणि हा समज रुजविला. प्राचीन परंपरा असलेल्या आणि सांस्कृतिक धाग्याने एकत्र बांधल्या गेलेल्या संस्कृती संपविण्याचा घनघोर प्रयत्न सुरू झाला. त्याचा अनुभव भारतवर्ष सातत्याने घेते आहे.
सांस्कृतिक घटकांनी जोडले गेलेले राष्ट्र चिवट असते, ते सहजासहजी लयाला जाऊ शकत नाही, परंतु त्याच्या सांस्कृतिक ओळखीविषयीच न्यूनगंड निर्माण करायचा, असे नवे अस्त्र परजले गेले. रुजविला गेलेला न्यूनगंड दूर करणे, जगाच्या शाश्वत कल्याणाच्या तत्त्वज्ञानाचा सातत्याने जागर करणे, हा उद्देश या वेबसाईटमागे आहे. टीकाकारांच्या मांडणीतील परस्पर विसंगती दाखवून देणे, त्यांच्या मतांचा तर्कशुद्ध प्रतिवाद करणे, हेही या वेबसाईटच्या माध्यमातून साध्य करण्याचा कसोशीने प्रयत्न आहे. उत्तम मुलाखती, जगातील आणि देशातील घडामोडींच्या मागची नेमकी कारणमीमांसा अशा अनेकविध प्रकारांतून हा प्रयत्न झाल्याचे या वेबसाईटवर आपल्याला निश्चितपणे जाणवेल.
या वेबसाईटचे प्रयोजन व्यावसायिक नाही. त्यातील तुमचा सहभाग हा अत्यंत मोलाचा ठरणार आहे. आपण त्या दृष्टीने या वेबसाईटवरील आशय समृद्ध करण्यासाठी सूचना कराव्यात, लिंक्स शेअर कराव्यात, ही आग्रही विनंती. संवादाची प्रक्रिया खर्या अर्थाने पूर्णत्वास नेऊयात.
धन्यवाद!
- विश्व संवाद केंद्र, पुणे
