केंद्राविषयी

'विश्व संवाद केंद्र' ही संस्था राष्ट्रीय विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी माध्यम क्षेत्रात समन्वयाचे काम करते. विश्व संवाद केंद्राचे कार्य देशभरातून चालते. १९९२ साली विश्व संवाद केंद्राच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज देशभरात जवळपास सर्व राज्यांमधून एकूण ३० पेक्षा  अधिक केंद्रे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, संभाजीनगरपाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र प्रांतासाठी पुण्यात केंद्राची स्थापना मे २०१४ मध्ये करण्यात आली.
 

राष्ट्रीय विचारांचा प्रसार आणि प्रचार करून नागरिकांमधील राष्ट्रीयतेची भावना वाढीस लावणे, त्याची जोपासना करणे हे केंद्राचे प्रमुख कार्य आहे. त्यात वेगाने वाढणाऱ्या प्रसार माध्यमांची भूमिका व सहकार्य महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय विचारानुरूप कार्य करणाऱ्या संस्था-संघटनांबद्दल अज्ञान, अपुरी माहिती, गैरसमज, किंवा योग्य माहितीचा अभाव यांमुळे या विचारांचे पुरेसे व वास्तववादी प्रतिबिंब माध्यमातून दुर्दैवाने उमटत नाही. ही गरज लक्षात घेऊन, हे विचार आणि कार्य प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न विश्व संवाद केंद्र आपल्या विविध उपक्रमांतून करीत आहे. त्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय व स्थानिक पातळीवर प्रसार माध्यमांशी संपर्क व समन्वय ठेवणे हे विश्व संवाद केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. माहितीचे नियमितपणे आदान प्रदान करणे, ती माहिती पुरेशा संदर्भासह - वेळोवेळी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी सातत्याने संपर्क ठेवणे ही कार्याची दिशा होय.  
 

विश्व संवाद केंद्रातर्फे आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती दरवर्षी देशभरात साजरी केली जाते. त्यानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा 'देवर्षी नारद स्मृती पुरस्कार' देऊन गौरव केला जातो. प्रतिवर्षी  विश्व संवाद केंद्र-पश्चिम महाराष्ट्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षणसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने  देवर्षी नारद पुरस्कार देण्यात येतात.

 
पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, व्यंगचित्रकार / छायाचित्रकार, आणि सोशल मीडिया असे चार वर्गांतले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरु असून आतापर्यंत तीसपेक्षा अधिक ज्येष्ठ पत्रकार / संपादकांचा गौरव करण्यात आला आहे.