महाड, दिनांक २६ जून २०२६ :
एकदिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद येत्या रविवारी (दि. २८) महाड येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेतच 'छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार' प्रदान केले जातील, अशी माहिती परिषदेचे संयोजक निलेश धायरकर आणि स्वागत समितीचे अध्यक्ष अॅड. संजय भिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेला जयवंत तांबे व आप्पासाहेब पारधे उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती व 'सामाजिक न्याय' दिनानिमित्त आयोजित ही परिषद सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडेल. परिषदेला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, राष्ट्रीय भटके विमुक्त जाती-जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, 'बार्टी'च्या प्रभारी महासंचालक दीपा मुधोळ मुंडे, 'आर्टी'चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे आणि कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत उपस्थित राहणार आहेत.
यंदा संत रविदास महाराज यांचे ६५० वे, महात्मा ज्योतिराव फुले यांचे २०० वे, संत गाडगे महाराज यांचे १५० वे जयंतीवर्ष तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक चवदार तळ सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सन २०२६-२७ हे वर्ष “सामाजिक समता समरसता वर्ष" म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाची परिषद महाडमध्ये होत असून विवेक विचार मंच, 'बार्टी', 'आर्टी' आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे.
परिषदेसाठी राज्यभरातून विविध सामाजिक संस्था व संघटनांचे सुमारे १० हजारांहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दिवसभरात एकूण तीन सत्रे होतील. पहिल्या उद्घाटन सत्रात मान्यवरांची भाषणे आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. दुसरे 'संवाद सत्र' चार गटांत होईल. यात अनुसूचित जाती प्रवर्गातील समस्या, सामाजिक न्याय, समता, शासकीय योजना आणि अन्याय-अत्याचाराच्या घटनांवर चर्चा होईल. तिसऱ्या सत्रामध्ये समारोप व विविध ठराव पारित केले जातील.
परिषदेच्या स्वागत समितीचे अध्यक्ष अॅड. संजय सहदेव भिसे असून मिलन बहलेकर, संदीप शेठ, सिद्धेश जैतपाल, प्रमोद महाडिक व गणेश जंगम हे सदस्य आहेत. परिषद यशस्वी करण्यासाठी विष्णू केंजळे, सत्यवान महाडिक, विजय वेदपाठक, प्रबोधन निकाळजे आणि नितीन केदार प्रयत्न करत आहेत.
पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे :
१. पश्चिम महाराष्ट्र: अॅड. विजय लक्ष्मण गव्हाळे (बारामती), मिलिंद मधुकर जाधव (पिंपरी-चिंचवड).
२. मराठवाडा - खान्देश: नागेश मोहन कंडारे (धुळे), प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे (छत्रपती संभाजीनगर), नागसेन शामराव पुंडगे (परभणी), डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड).
३. विदर्भ: प्रभाकर मनोहर शिंदे (नागपूर), शाम वसंत माळवंदे (खामगाव, बुलढाणा).
४. कोकण: स्मिता सुशांत कवडे (मुंबई), विजय अंबुजी जाधव (अंधेरी, मुंबई), महादेव कृष्णाजी गोठणकर (राजापूर, रत्नागिरी).
-------