राष्ट्रीय एकतेची पुनर्स्थापना अहिल्याबाईंनी केली - राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का; विशेषांकाचे प्रकाशन
पुणे, दिनांक १८ जानेवारी २०२५ ः समाजातील कुप्रथांना दूर सारत पुण्यश्वोक अहिल्याबाईंनी लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भारतीय संस्कृतीच्या प्रतिकांचे संवर्धन करत राष्ट्रीय एकतेच्या पुनर्स्थापनेचे कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केले, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का यांनी केले.
एकता मासिक व राष्ट्र सेविका समितीच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात हा प्रकाशन कार्यक्रम पार पडला. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीपराव करंबळेकर, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रेय अंबुलकर, राष्ट्र सेविका समितीच्या क्षेत्र कार्यवाहिका सुनंदा जोशी, एकताच्या संपादिका रुपाली भुसारी उपस्थित होत्या.
सती प्रथा शास्त्रसंमत नसल्याचे अहिल्याबाईंना माहित होते. म्हणूनच त्यांनी समाजाच्या समोर ते ठेवले. ज्याचा मोठ्या प्रमाणावर स्विकार झाला, असे मत शांताक्का यांनी मांडले. त्या म्हणाल्या, "अहिल्याबाईंच्या जीवनाचा उद्देश्य हा रामराज्याची स्थापना असाच होता. म्हणूनच त्यांनी समाज आणि धर्म हिताचे असाधारण निर्णय घेतले. समाजाच्या हितासाठी तत्कालीन कायद्यांमध्ये संशोधन करत नवे कायदे अंमलात आणले." माहेश्वरी साडी आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देत अहिल्याबाईंनी आत्मनिर्भरता आणि व्होकल फॉर लोकल हे आजचे विचार तेंव्हाच पूर्णत्वास नेले, असेही शांताक्का म्हणाल्या. एकताच्या या अहिल्या देवी अंकाने इतिहास समोर ठेवत आपली मुल्ये समाजापुढे मांडली . नव्या पिढीसाठी अहिल्ये सारखे आदर्श प्रस्थापित केले आहेत.
राम शिंदे म्हणाले,"मुघल आक्रमकांच्या काळात मंदिरे बांधण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे केले. मात्र, त्यांचे जन्मस्थान चोंडी १९८५ पर्यंत अडगळीत होते. तहसीलदार कार्यलयातील नकाशावरही गावची नोंद नव्हती. पुढे १९९५ मध्ये युतीकाळात चोंडी विकास प्रकल्प आराखडा आला. तिथून पुढे चोंडीला ओळख मिळाली." पुरूषप्रधान संस्कृती असताना अहिल्यादेवींनी त्या काळात केलेले असामान्य कर्तृत्त्व आजही दिपस्तंभा सारखे आहे. धार्मिक अहिल्याबाईंनी धर्मउत्थानाचे कार्य अहिल्याबाईंनी केले. न्यायप्रिय आणि कर्तबगार महिला शासक म्हणून त्या आजही माच्या आदर्श आहे, असेही शिंदे म्हणाले.
आजचा काळ हा स्त्री शक्तीच्या जागरणाचा काळ आहे, असे मत दिलीपराव करंबळेकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, सध्या पाश्चात्य जगतातील फेमिनीजमचा बोलबाला आहे. मात्र, फेमिनिजम हा आत्मकेंद्रीत असून, भारतीय विचारांतील स्त्री जागरण व्यापक आहे. स्त्री जागरण हा या समाजाचा आणि राष्ट्राचा आधार होत कर्तृत्व फुलविणारा विचार आहे. गेल्या १०० वर्षांत स्त्री शिक्षणाचा आणि कर्तृ्त्त्वाचा सर्व क्षेत्रात विकास झाला आहे. मात्र आज कुटुंब आणि समाजव्यवस्था उध्वस्त होण्याचे विचार मांडले जात आहे. अशा काळात स्त्री शक्तीला सकारात्मक पद्धतीने जागृत करणाऱ्या प्रसारमाध्यमाची समाजाला गरज आहे.
सूत्रसंचालन डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन या अंकाच्या अतिथी संपादिका आहेत. कार्यक्रमात शांतक्का यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
-----
एकता निबंध स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक ः गार्गी जोशी,
द्वितीय क्रमांक ः कुंदा कुलकर्णी
तृतीय क्रमांक ः स्वाती रानडे
उत्तेजनार्थ चौथा क्रमांक ः प्रिया वैद्य
उत्तेजनार्थ पाचवा क्रमाक ः शुभांगी निंबोळे
----