राज्यातील पहिले निसर्गोपचार महाविद्यालय कोल्हापुरात
60 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, आजरा येथे 60 खाटांचे नेचरोपॅथी रुग्णालय

आधुनिक धकाधकीच्या जीवनात दिवसेंदिवस जीवनशैलीशी निगडीत आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रासायनिक औषधांचे दुष्परिणाम पाहता आयुर्वेदिक किंवा निसर्गोपचाराला प्राधान्य दिले जात आहे. निसर्गोपचार पद्धतीने विविध आजारांवर उपचार घेण्याचे प्रमाण वाढले असून, यासाठी खासगी व्यावसायिकांची मागणी वाढली आहे. परंतु या पद्धतीचे शास्त्रोक्त शिक्षण मिळावे, म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागामधील आयुष संचालनालयाअंतर्गत यंदापासून 'बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्सेस' या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे.
- काय आहे निसर्गोपचार -
निसर्गोपचाराचे क्षेत्र हे आगळेवेगळे क्षेत्र आहे. ही एक आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी प्रमाणेच शासनमान्य उपचारपद्धती असून कुठलेही औषध न वापरता निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने रोगावर उपचार केला जातो. औषधांचे दुष्परिणाम, औषधांच्या न परवडणा-या किमती या पार्श्वभूमीवर सारे जग निसर्गोपचाराकडे वळत आहे. यामुळेच निसर्गोपचार तज्ज्ञांना प्रचंड मागणी आहे.
- निर्णय काय?
निर्णयानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात यंदा नॅचरोपॅथीचे राज्यातील पहिले कॉलेज सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाला बारावी विज्ञान शाखेतील गुणांच्या आधारावर पहिल्या वर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. या विषयाचा पदवी अभ्यासक्रम बनविण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या संस्थेची मदत घेतली आहे. अभ्यासक्रम अंतिम मंजुरीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविला आहे.
- अभ्यासक्रम
हा अभ्यासक्रम साडेचार वर्षाचा असून त्यांनतर एक वर्ष इंटर्नशिप अर्थात आंतरवासिता करणे अनिवार्य असेल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची पदवी देण्यात येईल. शासनाने कॉलेजच्या परवानगीबरोबरच ६० बेड्सच्या नॅचरोपॅथी रुग्णालयालाही मंजुरी दिली आहे. ‘शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय’ असे त्याचे नामकरण करण्यात आलं आहे.
- निसर्गोपचाराचा इतिहास आणि महत्त्व:
नॅचरोपॅथी ही सर्वात जुनी आरोग्यसेवा प्रणाली आहे. जी पारंपरिक आणि नैसर्गिक औषधांसह आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाची जोड देते. निसर्गाच्या उपचार शक्तींवर अवलंबून राहून, निसर्गोपचार मानवी शरीराला स्वतःला बरे करण्याची क्षमता उत्तेजित करते. आहारशास्त्र, वनस्पती औषध, होमिओपॅथी, उपवास, व्यायाम, जीवनशैली, समुपदेशन, डिटॉक्सिफिकेशन आणि किलेशन अर्थात शरीरातील अतिरिक्त धातू काढून टाकण्याची प्रक्रिया , क्लिनिकल पोषण, हायड्रोथेरपी, निसर्गोपचार हाताळणी, आध्यात्मिक उपचार, पर्यावरणीय मूल्यांकन आणि आरोग्य यांसह नैसर्गिक उपचारांचा वापर करून निदान, उपचार आणि बरे करण्याचे हे शास्त्र आहे.
- नॅचरोपॅथीचा फायदा काय?
नॅचरोपॅथी उपचार पद्धतीत फळे, ध्वनी,उष्णता, वनस्पती, पाणी आणि सूर्यप्रकाश या नैसर्गिक साधनांचा वापर केला (What is Naturopathy) जातो. या पद्धतीमध्ये ॲलोपॅथी किंवा शस्त्रक्रियांचा अतर्भाव करण्यात येत नाही. अनेक खासगी संस्था या उपचार पद्धतीत मागील काही वर्षांपासून काम करत आहेत. जुने आजार दूर करण्यासाठी या उपचार पद्धतीची जास्त करून मदत घेण्यात येत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
यामध्ये नैसर्गिक घटक जुन्या आजाराच्या मुळाशी जाऊन, तो आजार बरा करतात. या पद्धतीचे जास्त दुष्परिणाम नाहीत.पहिल्या शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालयासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत (Naturopathy College In Maharashtra) आहे. मुळात या पद्धतीचा अभ्यासक्रम केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये यापूर्वीच सुरू झाला आहे. आपल्याकडे हा अभ्यासक्रम यंदा सुरू होत आहे. येत्या महिनाभरातच पहिली बॅच सुरू होण्याची शक्यता आहे.

- भारतातील निसर्गोपचार:
भारतातील निसर्गोपचाराचे पुनरुज्जीवन जर्मन पोषणतज्ञ लुई कुहन यांच्या 'द न्यू सायन्स ऑफ हीलिंग' या पुस्तकाच्या भाषांतराद्वारे झाले, ज्याचा तेलगूमध्ये अनुवाद द्रोणमराजू वेंकटचलपथी सरमा यांनी १८९४ मध्ये केला होता. नंतर त्याचे हिंदी आणि उर्दूमध्ये भाषांतर करण्यात आले.
भारतीय निसर्गोपचार चळवळ सुरुवातीला आंध्रप्रदेश, गुजरात, बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये सुरू झाली. या राज्यांमध्ये लोकांनी यासंदर्भात कठोर परिश्रम केले आणि विज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान दिले.