नाशिक : एकता मासिक पुणे प्रकाशित स्वर्गीय नानाराव ढोबळे विशेषांक प्रकाशन कार्यक्रम.
डावीकडून रूपाली भुसारी" (संपादक) प्रा. प्रकाश पाठक (प्रमुख वक्ते) कैलासनाना साळुंखे (विभाग संघचालक), दत्तात्रय अंबुलकर (अध्यक्ष, एकता फाउंडेशन), डॉ. विजय मालपाठक (शहर संघचालक), डॉ आशिष कुलकर्णी (अध्यक्ष, शंकराचार्य न्यास),दिलीप क्षीरसागर (प्रांत कार्यकारणी सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
नाना ढोबळे यांच्या कार्यपद्धतीला प्रवाहित करावे : प्रकाश पाठक
नाशिक : नानाराव ढोबळे यांच्या कार्यपद्धतीचा अनुग्रह घेतला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि अनुकरणाने तो प्रवाहित केला पाहिजे असे भावोद्गार प्रा प्रकाश पाठक यांनी ज्येष्ठ संघ प्रचारक कै.नानाराव ढोबळे विशेषांक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले.
शंकराचार्य न्यास व एकता मासिक पुणे यांच्यावतीने हा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर विभाग संघचालक कैलासनाना साळुंखे,शहर संघ चालक डॉ. विजय मालपाठक, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रय अंबुलकर,न्यासाचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी हे होते.
नानांचे व्यक्तिमत्व
संघकार्य देशव्यापी होण्यामध्ये पूर्णवेळ संघ प्रचारक तसेच गृहस्थी कार्यकर्त्यांचे प्रचारकांप्रमाणेच वेळ देणे हे महत्त्वाचे योगदान आहे.
नानांच्या जीवनातील असंख्य आठवणींनी आजही प्रेरणा मिळते. त्यांचा पिंड अध्यात्मिक होता नानांचे व्यक्तिमत्व साधे होते. समाजातील मोठ्या माणसांवर त्यांचा प्रभाव पडत नसेल परंतु जेव्हा त्यांचे काही प्रसंग आठवणी या त्यांना समजत तेव्हा नानांचे मोठेपण त्यांच्या लक्षात येत असे.
नानांचे वक्तृत्व व व्यक्तिमत्व हे भावात्मक होते. त्यांच्या भावपूर्ण वक्तृत्वाने श्रोत्यांच्या व त्यांच्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू निघत असत.भावूक माणसे तार्किक नसतात आणि तार्किक माणसे भावूक नसतात. मात्र नाना हे याला अपवाद होते.ते भावूक असले तरी कठोर होते पण कर्तव्य कठोर होते.त्यांचा अधिकार त्यांनी अधिकार प्रेमातून, त्यागातून मिळविला होता.
नानांचे वक्तृत्व व समर्पण
नानांचे वक्तृत्व हे प्रभावी, परिणामकारी व प्रवाही असे. त्यामुळे नानांच्या वक्तृत्वाने माणसे कार्यप्रवण होत व दीर्घकाळ कार्यरत राहत. त्यातील काहीजण हे पूर्ण वेळ प्रचारक म्हणून देखील निघालेले आहेत. त्यांच्या वक्तृत्वाचा केंद्रबिंदू देशभक्ती व हिंदूराष्ट्र असे.नानांकडे उत्कट मातृशक्ती व मातृभक्ती होती. नानांची शिवाजी महाराज, विवेकानंद, सावरकर व डॉ हेडगेवार ही चार दैवते होती. कबीराने अत्युच्च समर्पणासाठी बासरीचे उदाहरण दिलेले असून निर्मितीपासून सुरेल स्वर निघेपर्यंत ती स्वतःवर आघात करून घेते. बासरीसारखे नाना हे समर्पणाचे अत्युच्च शिखर होते.
नानांची संवेदनशीलता
कार्यकर्त्याच्या घरी त्यांचा अनौपचारिक स्नेह असे. त्यामुळे कुटुंब संघानुकूल बनत असे. कार्यकर्त्याचे घर सांभाळणे यासाठी ते आग्रही असत.
धुळे जिल्ह्यातील जनजाती बांधवांची अवस्था बघून त्यांचे संवेदनशील मन द्रवित होत असे. परंतु त्यावर मात करीत त्यांनी सत्तरच्या दशकात धुळे जिल्ह्यातील अक्कलकोस गावी सहकारी सामूहिक शेतीचा प्रयोग या क्षेत्रात करून दाखवला.
संघशताब्दीच्या पृष्ठभूमीवर संघाने आग्रह धरलेल्या पंचपरिवर्तनातील स्वबोध, समरसता,कुटुंब प्रबोधन हे विषय नाना त्यांच्या जीवनात परिपूर्णतेने जगलेले दिसतात. संघ हा अनुभवण्याचा विषय असतो. संघकार्यात झिजणे,संपणे,विरघळून जाणे आणि जो विरघळेल त्याला साखरेची चव देणे हा अनुभव नानांच्या बरोबर काम करणाऱ्या सर्वांना आला असे ते म्हणाले.
यावेळी एकता मासिकाच्या संपादक रूपाली भुसारी,प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर तसेच अनेक मान्यवर स्वयंसेवक उपस्थित होते.
-- - - - - - -- - - - - - -- - - - - --- - - - - - -- - - - - - ---- ------ ------ ------- ------- -------- ------- ----- ---- ------- ------ ----
धुळे जिल्ह्यातील संघ स्वयंसेवक उत्तमराव पाटील यांनी जनसंघ या राजकीय क्षेत्रात काम करण्याचा आग्रह नाना ढोबळे यांनी केला. जनसंघाच्या प्रारंभीच्या काळात दोनच खासदार निवडून दिले त्यात एक अटल बिहारी वाजपेयी होते तर दुसरे उत्तमराव पाटील होते.पुढे ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील झाले.
नानांच्या सहवासात प्रेरणा मिळून लखन भतवाल हे गर्भश्रीमंत घरातील स्वयंसेवक राजकीय क्षेत्रात कार्यरत झाले आणि धुळे जिल्ह्यातील जनजाती क्षेत्रात त्यांनी पूर्ण आयुष्य वाहून घेतले.जनजाती बांधव त्यांना "लखा पावरा" असे संबोधत.
"समाजातलातील मोती" या पुस्तकात नानांनी समाजातील सामान्य व्यक्तींच्या जीवनातील छोटेसे परंतु असामान्य गुण लक्षात आणून दिले हे पुस्तक प्रकाश पाठक यांनी सुधा मूर्ती यांना दिले महिनाभराने ते वाचून सुधा मूर्ती यांनी असे संघ प्रचारक असतात हे आम्हाला माहिती नव्हते. आम्ही त्यांच्यापुढे काहीच नाही असा अभिप्राय दिला.
नाना व श्री गोळवलकर गुरुजी यांचे नाते विलक्षण स्नेहाचे होते.श्री गुरुजींना नाशिकरोड स्टेशनवर कार्यकर्त्यांबरोबर नाना असले की ते गाडी सुटण्याच्या दिशेने लांबवर जाऊन उभे राहत.श्रीगुरुजी रेल्वे सुटताना डब्याच्या दारात उभे राहत.
रेल्वे दृष्टीआड होईपर्यंत नाना त्यांना डोळेभरून बघून घेत. एकनाथ ची रानडे म्हणत त्याप्रमाणे आम्हाला श्रीगुरुजी बोलायला नाही मिळाले आणि दृष्टभेट झाली तरी प्रेरणा मिळते कासवीण आपल्या पिल्लाला डोळ्यातून दूध पाजते असे म्हणतात.कदाचित हेच या प्रेमात दिसते.