दीड वर्षांनंतर जेजुरी गडावर सोमवती अमावस्या उत्सव
१५ जून रोजी पहाटे पालखीचे प्रस्थान; कऱ्हा नदीवर होणार श्री खंडेरायाचा पावन स्नान विधी

जेजुरी: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या जेजुरी गडावर तब्बल दीड वर्षांनंतर 'सोमवती अमावस्या पालखी सोहळा' येत आहे. हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. श्री मार्तंड देव संस्थानने प्रसिद्धीपत्रकाद्वारे या सोहळ्याच्या नियोजनाची अधिकृत घोषणा केली असल्याची माहिती देवसंस्थानचे अध्यक्ष ॲड. विश्वास गोविंद पानसे आणि व्यवस्थापक आशिष मारुती बाठे यांनी दिली.
या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी गडावरील खांदेकरी, मानकरी, पुजारी वर्ग, देवसंस्थानचे विश्वस्त मंडळ, पोलीस प्रशासन, नगरपरिषद आणि महावितरण प्रशासन या सर्वांची एकत्र ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली असून सर्व प्रकारच्या व्यवस्थेला अंतिम रूप देण्यात आले आहे.
* सोमवार, १५ जून: पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक
- मानाचा शेडा आणि प्रस्थान (पहाटे ०२:०० वाजता): जेजुरी गडकोटामधून पारंपारिक पद्धतीने मानाचा शेडा दिल्यानंतर मुख्य पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल.
- ग्रामप्रदक्षिणा व मार्गक्रमण: गडकोट सोडल्यानंतर पालखी पायरी मार्गाने खाली उतरून जेजुरी नगरीत ग्रामप्रदक्षिणा करेल आणि त्यानंतर कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होईल.
- कऱ्हा तीरावरील स्नान विधी (सकाळी ०६:०० ते ०६:३०): कऱ्हा नदीवर श्रींच्या उत्सव मूर्तींना विधीवत आवर्तन करून पवित्र स्नान विधी, पूजा, अभिषेक आणि भव्य आरती संपन्न होईल.
- मुख्य दर्शन (दुपारी १२:०० वाजता): कऱ्हा नदीवरील स्नान आटोपून पालखी पुन्हा गडाकडे मार्गस्थ होईल. गडावर पोहोचल्यानंतर उत्सव मूर्ती भंडार गृहात नेण्यात येतील व रोजमुरा वाटप होईल. प्रतिपदा तिथी असल्याने गाभाऱ्याची 'पाखाळणी' (स्वच्छता) करून दुपारी १२ च्या सुमारास भाविकांसाठी मुख्य दर्शन खुले केले जाईल.

* भाविकांसाठी महत्त्वाची सूचना: तीन दिवस शिफारस पास बंद!
सोमवती अमावस्येच्या निमित्ताने गडावर होणाऱ्या अलोट गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवार दिनांक १३ जून, रविवार दिनांक १४ जून आणि सोमवार दिनांक १५ जून या तीनही दिवशी देवसंस्थानकडील सर्व 'शिफारस दर्शन पास' पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
* गडावर नयनरम्य सजावट; 'शुद्ध भंडारा' वापरण्याचे आवाहन
तब्बल दीड वर्षांनंतर हा सोहळा होत असल्याने देवसंस्थानच्या वतीने संपूर्ण जेजुरी गडावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि मनमोहक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. सोहळ्याचे धार्मिक पावित्र्य टिकून राहावे यासाठी देवसंस्थानने सर्व भंडार विक्रेते आणि भाविक-भक्तांना कडक आवाहन केले आहे की, देवाच्या चरणी आणि संपूर्ण सोहळ्यात केवळ शुद्ध व भेसळ विरहित भंडाराच वापरावा.