कहाणी समर्पणाची, सेवाभावाची - बाया (आनंदीबाई ) कर्वे

(दि. ५ जून - बाया कर्वे जयंती निमित्त विशेष लेख)
स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे यांची बाया (आनंदीबाई) ही द्वितीय पत्नी. १८९३ मध्ये अण्णांनी बायाशी पुनर्विवाह केला तेव्हा बाया बालविधवा होती. त्या काळात पुरुषाच्या पुनर्विवाहाला समाजमान्यता होती, परंतु विधवा स्त्रीने पुन्हा लग्न करणे ही गोष्ट मात्र समाजास अमान्य होती. या विवाहानंतर दोघांनाही सामाजिक बहिष्कार व प्रखर टीकेला सामोरे जावे लागले होते.
बायाचा (गोदू जोशी) जन्म देवरुख येथे १८६४ साली झाला. वयाच्या आठव्या वर्षी लग्न होवून सासरी गेलेल्या गोदू जोशीस अवध्या तीन महिन्यात वैधव्य प्राप्त झाले. केशवपनासारख्या भयंकर प्रथेची ती बळी ठरली. वडील आणि भाऊ सुधारक विचारांचे असल्यामुळे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमध्ये शिक्षणाकरिता तिला पाठविण्यात आले. अण्णांची पहिली पत्नी निवर्तल्यावर, लग्न करीन तर विधवेशीच असा निश्चय त्यांनी केला होता. बायाच्या वडिलांनी शारदा सदनात तिची आणि अण्णांची भेट घडवून आणली. किरकोळ प्रकृतीच्या अण्णांकडे पाहून ते वर्षभर तरी जगतील की नाही अशी शंका रमाबाईंना आली होती. त्यामुळे वर्षभरानंतर लग्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. एवढंच नाही तर बायाच्या नावानं तीन हजार रुपयांचा विमा उतरविण्याची अट अण्णांना घातली होती. अशी अट घालणाऱ्या रमाबाई आणि कोणताही पुरुषी अहंकार मनात न आणता ती मान्य करणारे अण्णा दोघंही धन्य होते. पुन्हा बायाच्या पदरी वैधव्य व एकटेपण नको इतकाच काय त्यात विचार होता.
लग्नानंतर बायाच्या नावामागे सौभाग्याचं बिरुद लागलं होतं, पण हातात मात्र सतीचं वाण आलं. स्त्री शिक्षणासाठी अव्याहत धडपडणाऱ्या अण्णांचा पाय घरात ठरत नसे. पैशांची कायम चणचण असे. मात्र संसाराच्या सुरुवातीला परस्परांकडूनच्या अपेक्षा समजल्या आणि त्या पूर्ण व्हायच्या मर्यादा लक्षात आल्या की, भावी सहजीवनाचा पाया अधिक भक्कम होत जातो हे या उभयतांच्या कृतीतून सतत दिसत आले. बायाचा समंजसपणा, सयंमीवृत्ती व वैचारिक प्रगल्भता त्यांच्या वैवाहिक जीवनास व अण्णांच्या कार्यास अधिक अर्थपूर्ण करण्यास मोलाची ठरली.
एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे दोघेही ओळखून होते. त्यातील अधिकउण्या स्वभाववैशिष्टय़ांकडे खिलाडूवृत्तीनं पाहायची विलक्षण हातोटी बायापाशी होती. त्यामुळेच अण्णांच्या तक्रारी सांगतानाही त्यामध्ये कडवटपणाचा सूर कधी उमटतला नाही उलट अथक समजूतदारपणाचा प्रत्यय त्यांचे लिखाण वाचताना नेहमी येतो. अण्णांच्या स्वभावातील एककल्लीपणा, हिशोबीपणा, एका बाजूने मनस्वी भिडस्तपणा तर दुसरीकडे टोकाचा आग्रह यामुळे बाया आणि मुलांचं अनेकवेळा नुकसानच होत परंतु तेही अत्यंत परखडपणे सांगण्याचे धाडस त्या दाखवत. तितक्याच ममत्वानं अण्णांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आयुष्यात किती नानाविध गोष्टी मी करू शकले याचाही उल्लेख त्या सतत करीत. हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य; त्यांना अनेक कटू प्रसंगातून बाहेर पडण्यास पुरक ठरले. पती म्हणून अण्णांकडुन काही अपेक्षा अपूर्ण राहत असताना त्या मोठ्या मिश्किलपणे त्यातील सामाजिक - सांस्कृतिक मान्यतांवर बोट ठेवून आपले मन मोकळे करीत.
अण्णांबरोबर संसार करताना वैयक्तिक सुखदु:खाला थारा देऊन चालणार नाही हे बाया समजून होती, परंतु काही प्रसंग मात्र तिच्या मनावर खोलवर ओरखडे उठवून जात हे नक्की. पुनर्विवाह केला म्हणून समाजाने कितीही घाव घातले तरी आपल्या नवऱ्याने काढलेल्या आश्रमात आपल्याला अशी वागणूक मिळू नये अशी तिची किमान अपेक्षा असायची. अण्णांचे कार्य निर्विघ्नपणे सुरु रहावे म्हणून ते कधीही समाजाच्या पुढे दोन पावले टाकत नसत. त्यामुळे अगदी घरातही अनेकदा बायाला अस्पृश्याची वागणूक मिळत. अगदी याचे मात्र तिला तीव्र दुःख होतं. परंतु पतिच्या कार्यात बाधा येवू नये म्हणून तिने नेहमीच स्वतःला या सगळ्यातून अलिप्त ठेवण्याची वृत्ती बाळगली. पुरुषाचा पुनर्विवाह समाजाला मान्य होता पण स्त्रीचा नाही हे कटू सत्य ती समजून होती. समाज परिवर्तन करायचं असेल तर वैयक्तिक मानापमानाला एका ठराविक मर्यादेबाहेर स्थान देऊन चालत नाही हे बहुधा दोघांनीही समजून घेतले असावे. खरंतर अशा सामंजस्यासाठी एक आध्यात्मिक बैठक लागते, आत्मिक बळ लागतं ते दोघांपाशी होतं हे नक्की.
एकमेकांच्या मतांचा आदर करण्याचा सुरुवातीपासून घेतलेला वसा अण्णा आणि बायानी शेवटपर्यंत सोडला नाही आणि नात्यातील आपलेपणा हरवू दिला नाही. दोघांनीही, दोघांकरिताचा म्हणून असलेला हक्काचा वेळ एकमेकांना शेवटपर्यंत दिला.
आज आजूबाजूला पाहिलं की लक्षात येतं की, एका घरात राहूनही एकमेकांसाठी असा वेळ देणं अनेकांना जमत नाही. या दोघांनी मात्र अण्णांच्या आजारपणात वेगळ्या घरात राहूनही सहजीवनातील मैत्रभाव सहजपणे जपला होता. ही सहजता, हाच त्यांच्या सहजीवनाचा स्थायीभाव होता.बायाच्या सेवाभावी वृत्तीचं अण्णांना अपार कौतुक होतं. तिची समंजस साथ लाभल्यामुळे आपण आपलं काम निश्चिंत मनानं करू शकलो याची जाणीवही त्यांना होती. बाया धोरणी व व्यवहारी होत्या, त्या काटेकोरपणे आश्रमाचे व्यवस्थापन पहात होत्या.काटकसरीने पै-पै जोडत होत्या.अडचणीच्या काळात आपल्याकडे ही एखादे शिक्षण असावे म्हणून त्यांनी नागपूरला डफरीनया कॉलेजमध्ये जाऊन सुईणीचा डिप्लोमा ही पुर्ण केला.

वेळप्रसंगी आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन अण्णांना त्या उसने पैसे सव्याज देत. बरेचदा ते पैसे बुडीत खात्यातच गेलेले असत, पण त्या काळात एक स्त्री स्वतः बचत करुन आपल्या पतीला अडचणीच्या काळात पैसे देते ही गोष्ट किती मोठी आहे नाही? बायाच्या धोरणीपणाचे अण्णांना कौतुकही होते.बरेचदा ते वैतागतसुद्धा. पण बायाच्या निर्णयक्षमतेवर त्यांचा पुर्ण विश्वास होता. हळूहळू आश्रमाचा व्याप वाढत होता.आर्थिक चणचणीतुन मार्ग काढण्यासाठी बायानी भाऊबीज फंडा करीताही निधी संकलनात सहभाग दिला. ह्या भाऊबीज फंडाला बायाच्या भगिनी पार्वतीबाईंनी खूप मोठा हातभार लावला आणि हया फंडामुळे अनेक माताभगिनींचे आयुष्य उजळून निघाले.अण्णा आणि बायांच्या अथक कष्टाचे फळ म्हणून अण्णांनी पहिले महिला विद्यापीठही सुरु केले.
आपल्या पाठीमागे बायाला कुणावर अवलंबून राहायला लागू नये म्हणून तिला खर्चासाठी दरमहा पंधरा रुपये मिळतील, अशी व्यवस्था त्यांनी केली. परंतु बायाच्या जेव्हा लक्षात आलं की, लहानमोठी कामं करून तिनं गुंतवलेल्या ठेवींवरील व्याज तिला पुरेसं आहे तेव्हा तिनं अण्णांकडून दरमहा पैसे घेणं बंद करून टाकलं आणि आपल्या पश्चात सर्व ठेवी आश्रमाला मिळाव्यात अशी व्यवस्था केली. वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी बायाची जीवनज्योत मालवली. आश्रमाच्या परिसरात तिला अग्नी देण्यात आला. तिथं तुळशीवृंदावन बांधण्यात आलं. त्यानंतर अण्णा जेव्हा जेव्हा हिंगण्याला जात तेव्हा तिथून निघताना ‘बायाला भेटून येतो’ असं म्हणून तुळशीवृंदावनाचं दर्शन घेत. शंभरसव्वाशे वर्षांपूर्वीचं अण्णा आणि बायाचं सहजीवन आजच्या काळातही किती आदर्शवत आहे.
बाया कर्वे यांचा अण्णांच्या कार्यातील सहभाग हा नेहमीच पुरक व सातत्यपूर्ण राहिला. व्रत अण्णांचे होते, पण तपास्विनी म्हणून उजळून निघाली ती बाया. अण्णांची सावली म्हणून आयुष्यभर त्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या बायाचे अस्तित्व आजही संस्थेच्या प्रत्येक कोप-यात जाणवते. संस्थेतील त्यांच्या लेकींना स्वतःच्या इच्छा व उर्मी जपण्याचे बळ देते. पुढे बाया कर्वे यांनी ‘माझे पुराण’ या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग जगापुढे मांडले. आत्मभानी, परखड,व्यावहारिक आणि तेवढेच रोखठोक असलेले आत्मचरित्र म्हणजे बायाच्या नितळ मनाचे प्रतिबिंबच. बाया आणि अण्णांनी तर काळाच्या पुढे जाऊन आपलं सहजीवन कसं फुलवलं आणि उत्तर आयुष्यातही त्यातील ओलावा नि प्रेम कसं ताजंतवानं ठेवलं याची ही सफल संपूर्ण कहाणी आहे.
२००४ साली संस्थेने बाया कर्वे यांचे अण्णांच्या कार्यातील महत्त्व जाणून त्याच्या नावाने स्त्री अभ्यास केंद्राची स्थापना केली. स्त्रीकेंद्रीत व स्त्रीविषयक अभ्यास, संशोधने, लेखन, प्रकाशने इ. ला प्रोत्साहन देणारी ही आज पुण्यातील एक नामवंत संस्था आहे. सन २००६ पासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील महिलांना बाया कर्वे यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. आज या पुरस्काराला मोठी सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे. ३५००० हुन अधिक बायाच्या लेकी आज तिच्या पाऊलवाटेवरून चालू पहात आहेत.शांत तितकीच कणखर, तितकीच समर्थ, अतिशय सयंमी, स्वतःचे स्त्रीत्व जपत अनेक स्त्रियांना आधार देणारी बाया आजच्या पिढीलाही तितकीच जवळची वाटते हेच तिच्या स्वभावातील व कार्यातील वैशिष्ट्य आहे.
देवरुखची गोदु,सकेशा विधवा गोदु मग अण्णा कर्व्यांचे कुटुंब असलेली बाया आणि मग अनेक उपेक्षित जीवांचा आधारवड झालेली बाया.
अखेरीस आश्रमातील आपल्या कुटीत ३० सप्टेंबर १९५० साली शांतपणे निजधामास गेली. किती सुंदर प्रवास. जीवनाचे मांगल्य साफल्य म्हणजे कृतार्थता हे जगणारी बाया.आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा झालेला विशाल वटवृक्ष म्हणजे अण्णा आणि बायाच्या पावन स्पर्शाने, त्यांनी ओतलेल्या रक्त आणि घामाने पुनित झालेले शैक्षणिक तीर्थस्थळच. बाया कर्वे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस व कार्यास त्रिवार वंदन
स्मिता बाळकृष्ण कुलकर्णी (लेखिका महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत)