सामाजिक एकतेसाठी डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार यांचे प्रयत्न समांतर

डॉ. रमेश पांडव यांचे प्रतिपादन; मालेगावात 'बंधुता परिषद' उत्साहात संपन्न
मालेगाव (जि. नाशिक) : "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार या दोन्ही महापुरुषांनी सामाजिक एकतेसाठी केलेले प्रयत्न हे एकमेकांना समांतर होते. राष्ट्र म्हणून प्रगती करायची असेल, तर जातीभेद गाडून प्रत्येक भारतीयामध्ये 'भ्रातृभावना' जागृत होणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधीचे मंडळ सदस्य डॉ. रमेश पांडव यांनी येथे केले.
मालेगाव येथील राष्ट्रीय विकास मंडळाच्या वतीने आयोजित 'बंधुता परिषदेत' प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. २ जानेवारी १९४० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या कराड येथील शाखेला भेट दिली होती, त्या ऐतिहासिक घटनेच्या औचित्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघचालक अशोकलाल कांकरिया होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. आबा महाराज सोनवणे उपस्थित होते.
डॉ. पांडव पुढे म्हणाले, "महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा अधिकार नसून, हिंदू समाजातील जातीव्यवस्थेला छेद देऊन संघटन उभे करण्याचा डॉ. बाबासाहेबांचा प्रयत्न होता. २५ नोव्हेंबर १९४९ च्या आपल्या ऐतिहासिक भाषणात त्यांनी स्पष्ट केले होते की, मनुष्य जर जातीपातीत अडकून पडला तर तो रसातळाला जाईल. आपण सर्व एकाच मातेची लेकरे आहोत ही भ्रातृभावना विकसित झाल्याशिवाय आपण एक समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नाही."
एकात्म भारताचा संकल्प डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा दाखला देत डॉ. पांडव यांनी नमूद केले की, प्रत्येक भारतीयाच्या मनात तो कोणत्याही जाती-धर्माचा असला, तरी भारतमातेविषयी मातृभावना जागृत असणे महत्त्वाचे आहे. अध्यक्षीय भाषणात अशोकलाल कांकरिया यांनीही सामाजिक समरसतेचा धागा पकडून संघकार्यामागची भूमिका स्पष्ट केली.
या परिषदेला मालेगाव शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.