आणीबाणीतील लोकशाही रक्षणाचे कार्य संघाने केले - प्रमोद कुलकर्णी
कराडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे “शताब्दी मंथन”;

कराड, दिनांक २३ मे २०२६ ः
"आणीबाणीच्या काळात राजकीय विचारधारांच्या पलीकडे जाऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संघाने दिलेला लढा असो, की अयोध्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने जाती-पंथांच्या भिंती तोडून हिंदू समाजाच्या संघटित शक्तीचे केलेले प्रकटीकरण असो; संघाने गेल्या शंभर वर्षांत प्रत्येक संकटकाळात समाजहितासाठी संघर्ष केला आहे," असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र प्रांत सद्भाव गतिविधी सह-संयोजक प्रमोदराव कुलकर्णी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कराड जिल्हा प्रचार विभागाच्या वतीने दि. २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक संघ कार्यालयात “शताब्दी मंथन” या विशेष विचार संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संघाच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेताना ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला कराड परिसरातील लेखक, कवी, कलाकार, पत्रकार, सोशल मीडिया ब्लॉगर आणि व्याख्यानमाला संयोजक अशा विविध बौद्धिक व विचार क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती लावली होती. आपल्या मार्गदर्शनात प्रमोद कुलकर्णी यांनी संघाच्या शताब्दी वाटचालीतील महत्त्वाच्या कालखंडांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पूजनीय गुरुजींच्या पुढाकाराने देशातील सर्व संत-महंतांनी एका व्यासपीठावर येत 'हिंदवा: सोदरा: सर्वे न हिंदू पतितो भवेत' (सर्व हिंदू बांधव आहेत, कोणीही पतित नाही) अशी घोषणा करून जातीभेदाच्या अंताचा पाया रचला. पुढे पूजनीय बाळासाहेब देवरसांनी वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून जातीभेदमुक्त आणि समरसतायुक्त समाज उभारणीची आग्रही मांडणी केली. हाच विचार पुढे नेत आगामी काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सशक्त समाज निर्माण करणे हेच संघाचे ध्येय आहे."

- हिंदू संघटन करणार: विजय जोशी
कोल्हापूर विभाग कार्यवाह विजयराव जोशी यांनी संवादात्मक पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला. "संघाला स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवायचे नसून, आपले अस्तित्व विलीन करून संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे," असे ते म्हणाले. देशासमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी 'पंच परिवर्तनाचा' (समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरिक कर्तव्य आणि स्वबोध) मंत्र प्रत्येकाने स्वतःपासून सुरू करून घरोघरी घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले. यानंतर झालेल्या खुल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात दोन्ही वक्त्यांनी उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजनाने आणि गिरिधर सुतार यांनी सादर केलेल्या वैयक्तिक गीताने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय जिल्हा प्रचार प्रमुख वैद्य मिहीर वाचासुंदर यांनी करून दिला, तर प्रास्ताविक कराड जिल्हा संघचालक डॉ. मकरंदजी बर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सह-प्रचारप्रमुख श्रेयस महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन कराड नगर प्रचार प्रमुख सुयोग किरपेकर यांनी केले. या कार्यक्रमास कोल्हापूर विभाग प्रचार प्रमुख विवेकजी मंद्रूपकर आणि कराड जिल्हा कार्यवाह वैभवजी डुबल यांची विशेष उपस्थिती होती. आराध्य गिजरे याने गायलेल्या संपूर्ण वंदेमातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
पुस्तिका वाटप व ग्रंथ प्रदर्शन:
सभागृहाबाहेर कराड जिल्हा प्रचार मंडळ सदस्य अमित घळसासी यांच्या वतीने 'भारतीय विचार साधना' प्रकाशनाच्या पुस्तकांचा स्टॉल मांडण्यात आला होता. तसेच, कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना 'अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या' वृत्ताची पुस्तिका प्रदान करण्यात आली.
-----------