साताऱ्याच्या इतिहासात आठ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे. आठ सप्टेंबर रोजी १८५७ च्या बंडात सहभाग असणारी सतरा नररत्ने या पवित्र मातीत विसावली. या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याचे काम गेंडामाळ येथील फाशीचा वड अव्याहतपणे करीत आहे. स्मारकामध्ये या थोर विभूतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात येते.
- गुंजन हरी देव, सातारा

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे सातारा. क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून सातारा जगभर ओळखला जातो. इंग्रजांनी राजकीय सत्ता तर मिळवली परंतु ती टिकवायची असेल तर इथल्या दिव्य परंपरा नष्ट करायला हव्यात हे देखील जाणले होते. त्यानुसार इंग्रजांनी भारतीय शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक व्यवस्था यात सुधारणा करण्याच्या नावाखाली, भारतीय लोकांचा स्वाभिमान ठेचण्याचे काम केले. भारतीय समाज मानसिकदृष्ट्या दुर्बल राहिला तर राज्य करणे सोपे आहे हे इंग्रज पुरेपूर जाणून होते.
साता-याच्या इतिहासात आठ सप्टेंबर हा महत्त्वाचा दिवस आहे. आठ सप्टेंबर रोजी १८५७ च्या बंडात सहभाग असणारी सतरा नररत्ने या पवित्र मातीत विसावली. या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याचे काम गेंडामाळ येथील फाशीचा वड अव्याहतपणे करीत आहे. स्मारकामध्ये या थोर विभूतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात येते. १८५७ चा लढा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्त्वाचा टप्पा होता. देशावरील प्रत्येक संकटावेळी सातारा जिल्हा धावून आला. ८ सप्टेंबर १८५८ रोजी, १८५७ च्या बंडात सहभागी असणा-या १७ क्रांतीवीरांना जुलमी ब्रिटिश सरकारने मृत्यूदंड दिला.
खरेतर या १७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती. जुलमी इंग्रजांनी यातील पाच जणांना फाशी दिली, सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले तर सहा जणांना गोळ्या घातल्या. ८ सप्टेंबर १८५८ रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळवर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. दरम्यान, प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिशांनी पदच्युत केल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागितली. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. क्रांतिकारक १८५७ च्या उठावासाठी माणसे, पैसे व सामुग्री मिळविण्यासाठी फिरत होते. इंग्रजी सैन्यात फितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारूगोळा तयार करणे असे नियोजन केले.
१८५७ चा उठाव अयशस्वी झाला. १८५८ मध्ये तीन जणांचे एक लष्करी न्याय मंडळ नेमून चौकशी सुरू झाली. रंगो बापूजी सापडले नाहीत. त्यांचा मुलगा सीताराम गुप्तेला बोरगाव येथे पकडण्यात आले. ‘मी बंडात भाग घेतला होता, अशी कबुली त्यांनी निर्भीडपणे दिली. मार्च १८५८ मध्ये हा खटला चालवला गेला. ऑगस्टमध्ये पकडल्या गेलेल्या क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. मानवतावादाचा खोटा मुखवटा पांघरणाऱ्या पश्चिमी संस्कृती किती अमानुषपणे इतरांवर अत्याचार करत होत्या याचेच हे उदाहरण आहे. आज ही हौतात्म्यभूमी नवीन पिढ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देते आहे.
नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते यांना फाशी. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाबा कानगी रामोशी, नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे) पर्वती पोटाले (पाटोळे), पाटलू येशू यांना गोळ्या घालण्यात आल्या.
अशा अनेकांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्यप्राप्ती झाली. अनेकांनी आपल्या सुखी संसारावर निखारा ठेवला.
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना।
असा भूतकालीन सिद्धांत जाणा।
स्वराज्येच्छुनें पाहिजे युद्ध केलें।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
करावा परांचा वृथा प्राण नाश।अशी होति कां?
हौस त्या श्री शिवास।
किती बंधुंचे रक्तबिंदू गळाले।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?
.........स्वातंत्र्यशाहीर गोविंद
लेखक - गुंजन हरी देव
सातारा