आर्य हे मूळ इथलेच आहे. हा शब्द वंशवाचक नसून, गुणवाचक आहे, असे ठणकावून सांगणारे संत गुलाबराव महाराज. वेळप्रसंगी त्यांनी लोकमान्य टिळकांशीही प्रतिवाद केला. मराठी, हिंदी, वऱ्हाडी, ब्रज आणि संस्कृत भाषेवर साहित्य रचणाऱ्या गुलबावराव महाराजांचे जीवन प्रेरणादायी आहे.
- डॉ. सतपाल विजयराव सोवळे
यवतमाळ, 7719918982

महाराष्ट्राला एक थोर संत परंपरा लाभलेली आहे.संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम, समर्थ रामदासांपर्यंत. या संत परंपरेतील अलीकडच्या शतकातील तीन संत विदर्भात होऊन गेले, त्यामध्ये प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचा समावेश आहे.
'असणियाहुनी दाखविणे सोपे'
'मज तुझ्या कृपे साधिले ते'
असे संत गुलाबराव महाराज म्हणत असत. हे त्यांच्या बाबतीत अगदी सार्थ आहे. कारण केवळ 34 वर्ष आणि दोन महिने एवढे आयुष्य असलेल्या, वयाच्या नवव्या महिन्यात अंधत्व प्राप्त झालेल्या, कोणतीही आध्यात्मिक, शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबात जन्माला आलेल्या संत गुलाबराव महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विपुल अशी साहित्य निर्मिती केलेली आहे. संत गुलाबराव महाराजांची प्रतिभा असामान्य होती, त्यांनी जवळपास 130 लहान मोठ्या ग्रंथांची निर्मिती केली. मराठी व संस्कृतवर महाराजांचे सारखेच प्रभुत्व होते.संस्कृत आणि मराठीसह हिंदी, वऱ्हाडी, आणि ब्रजभाषा या पाच भाषांमध्ये त्यांनी केलेल्या साहित्याची यादी स्तिमित करणारी आहे. पत्रे 118, अभंग 2099, पदे 2052, गीत 1250, श्लोक 1000, ओव्या 23000 असे एकूण 6000 पृष्ठ भरतील एवढे मौलिक साहित्य त्यांनी निर्माण केले, संत गुलाबराव महाराजांच्या विलक्षण प्रतिभेचा विलास असा आहे की त्यांनी आपल्या लेखनामध्ये भक्ती, वेदांत, तत्वज्ञान, विज्ञान, संगीत, व्याकरण, काव्यशास्त्र,आरोग्य, न्याय, सांख्य, नीतिशास्त्र, योग, आयुर्वेद, साहित्य, नाटक, शिक्षण, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, लघुलिपी, क्रीडा, सौंदर्यशास्त्र, मनोविज्ञान, उत्क्रांतीवाद इत्यादी अनेक विषयात सूत्ररचनेपासून तर भाष्यरचनेपर्यंत ग्रंथरचना केली. ज्ञानशाखांमध्ये समन्वयाचा विचार त्यांनी दिला सर्व साहित्य प्रकारांचा अत्यंत कुशलतेने वापर त्यांनी केला. ज्यामध्ये आत्मकथा, कविता, छंद, रचना, पत्र ,साहित्य, वऱ्हाडी, बोली, नावंग नावाची सांकेतिक लिपी, अभंग, पदे, तुंबडी, आर्या, दोहे ,दिंडी, चौपाई, विरहीणी, गौळणी इत्यादी अनेक साहित्य प्रकारांचा समावेश करता येईल.*
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर म्हणतात की,"श्री गुलाबराव महाराजांची प्रज्ञा, प्रतिभा, स्मरणशक्ती, ज्ञानलालसा, चिकित्सकबुद्धी, खंडन मंडन युक्ती व त्यातून तयार झालेली ग्रंथसंपदा अद्भुत्व,अलौकिक आहे. ज्यावेळी महाराजांचे संपूर्ण साहित्य इंग्रजी व महत्त्वाच्या सर्व भारतीय व जागतिक भाषेमध्ये उपलब्ध होईल व त्याचे सखोल तौलनिक अभ्यास वैश्विक संदर्भात जगासमोर येतील जगासमोर येतील, त्यावेळी श्री गुलाबराव महाराजांचे नाव तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहिले असेल"
जन्म व कौटुंबिक पार्श्वभूमी
अमरावती जिल्ह्यातील माधान या गावच्या मोहोड वंशातील संत गुलाबराव यांचा जन्म त्यांच्या आजोळी म्हणजे लोणी टाकळी येथे शके १८०३ मधील आषाढ शुद्ध दशमीला म्हणजेच ६ जुलै १८८१ ला झाला. आई आलोकाबाई ,वडील गोदुजी यांच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले, अत्यंत सुंदर लोभसवाणी ही बालमूर्ती, पाणीदार डोळे ,सरळ नासिका, सावळा वर्ण, पुष्ट व गोंडस हातपाय. शेजारी त्याला सुंदर नारायण म्हणून संबोधित असत.
परंतु वयाच्या नवव्या महिन्यात त्यांचे डोळे आले. चुकीची औषध योजना झाली आणि त्यांना कायम अंधत्व आले. बाह्यदृष्टी गेली तरी आंतरदृष्टीने आणि विलक्षण तल्लख बुद्धीने त्यांनी अंधत्वावर सुद्धा मात केली.
़श्री गुलाबराव महाराज चार वर्षाचे असताना त्यांची आई सौ आलोका बाई यांचे दुसऱ्या बाळंतपणात बाळांतव्याधीमुळे निधन झाले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे वडील गोदुजींनी दुसरा विवाह केला सावत्रआई भागीरथीबाई घरी आल्यानंतर या अंध बालकाचा त्यांनी सुरू केला. सावत्र आईचा जाच इतका वाढला की त्याच्यावर विष प्रयोग करण्याचा देखील प्रयत्न झाला.. शेवटी त्यांना घर सोडावे लागले.
शिक्षणः
संत गुलाबराव महाराजांची बुद्धी विलक्षण तीव्र होती. एकदा ऐकलेली गोष्ट ते विसरत नसत. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. परंतु गावातील पंतोजींनी पाढे तोंडी हिशोब त्यांना शिकवले पुढे गावातील उपाध्ये श्री जोशी यांच्याकडे जाऊन त्यांनी श्लोक शिवलीलामृताचा अकरावा अध्याय , व्यंकटेश स्तोत्र पाठ केले, धर्मग्रंथांच्या वाचनासाठी ते गावातील साक्षर व्यक्तीला विनंती करीत असत, त्यासाठी पाहिजे तेवढा वेळ आणि परिश्रम खर्च करण्याची त्यांची तयारी असे. साक्षर व्यक्तीच्या दाराशी तासनतास ते ताटकळत असत. आणि त्याला वाचन करायला भाग पाडत. माधान सारख्या छोट्याशा गावात संस्कृत ग्रंथ वाचून दाखवणारा कोणी मिळाला नाही तर आपण गोळा केलेल्या पुस्तकांची पेटी डोक्यावर घेऊन हा अंध ज्ञानपीपासू रात्रीच्या वेळी तिथून पाच-सहा किलोमीटर दूर असलेल्या चांदूरबाजार या गावी जात असे आणि तेथे कुर्याभाई नावाचे गुजराती पंडित राहत असत त्यांना ते ग्रंथ वाचून दाखवण्याची विनंती करीत आणि अनेकदा त्यांना न उलगडलेला अर्थ हा छोटा गुलाब सांगत असे
संत गुलाबराव महाराजांचे पुस्तकांवर फार प्रेम होते.अनेक विषयांवरच्या पुस्तकांचा त्यांचा संग्रह होता.. अनेकदा पै पै जमा करून, लोकांना याचना करुन पुस्तकांची किंमत ते चुकवत असत
ज्ञानेश्वरकन्या
संत गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणून घेत इस 1901 मध्ये महाराजांना स्वप्नदृष्टांत झाला. त्यांच्या स्वप्नात संत ज्ञानेश्वर आईचे रूप घेऊन आले ते म्हणतात,"मला ज्ञानेश्वर माऊलीने मांडीवर घेतले कृपा कटाक्षाने निहाळिले, माझी पात्रताही पाहिली नाही, त्यांना माझी करुणा आली आणि आपल्या स्वनामाचा मंत्र त्यांनी मला दिला' या प्रसंगाचे वर्णन त्यांच्या 'नित्यतीर्थ आळंदमहिमा' या ग्रंथामध्ये त्यांनी केला आहे
ज्ञानदेवांनी मंत्र देण्यापूर्वी महाराजांना ऊहबुद्धी- सिद्धीची स्फूर्ती नव्हती. त्यामुळे लोकांना विनवणी करून ग्रंथ वाचायला लावित पण या प्रसंगानंतर ते इतक्या जबरदस्त आत्मविश्वासाने म्हणतात की,' धर्मविचाराच्या ठिकाणी मला केव्हाही भ्रम उत्पन्न होत नाही. मोठमोठ्या महंत लोकांचे दोष चटकन दिसू लागतात, कोणाप्रमाणे? तर सत्यवती सूत व्यासांप्रमाणे'
ज्ञानेश्वर माऊलीला महाराज सर्वस्व मानत, ज्ञानेश्वरांवर सर्व भार टाकून महाराज म्हणतात
"तू माझे सर्वस्व स्वामी ज्ञानेश्वर"
"बुडवा तारा निजासत्ता "
*गोपीभाव आणि कात्यायनी व्रत
श्री गुलाबराव महाराज स्वतःला ज्ञानेश कन्या समजत असत.तसेच स्वतः गोपिका आहे असे ते मानत. ईश्वराची म्हणजेच श्रीकृष्णाची मी पत्नी आहे या भावनेत निमग्न असत एखादी वेळेस स्त्रीवेश देखील धारण करत.. त्यांनी १९०२मध्ये 'कात्यायनी' या महाव्रताचा आरंभ केला. भागवताच्या दशम स्कंधात हे व्रत दिले असून अतिशय प्राचीन असे व्रत आहे.
प्रेमाचा करू कळस,
हरीस अर्पू ब्रम्हरस
श्रीकृष्ण पदी सावकाश
भृंगी होऊ चला!
मधुराद्वैताचार्य
श्री गुलाबराव महाराजांनी माधुर्य भक्तीचा पुरस्कार केला. विरहिणीच्या विरह प्रेमातील विषय भाग वेगळा करून ते प्रेम भगवंताला अर्पण केले की त्याला माधुर्य भक्ती म्हणतात.
माधुर्यभक्तीला जीवनातील प्रमुख अंग बनविल्यानेच श्री गुलाबराव महाराजांना मधुराद्वैताचे आचार्य होण्याचा मान मिळाला. कारण त्यांनी भक्ती पंथाचे पद्धतशीर शास्त्र मांडून दाखवले. भक्तीचा पदर न पदर त्यांनी उघडून दाखविला. भक्तीचे स्वरूप आणि प्रयोजन स्पष्ट केले. यालाच श्री गुलाबराव महाराजांचे मधुराद्वैत दर्शन म्हणतात. अद्वैत तत्वज्ञान आणि भक्ती यांची उत्तम सांगड त्यांनी घातली अद्वैत ज्ञानानंतरही भक्तीरूपाने उपासना कायम राहते. परमेश्वराच्या सगुण साकार रूपाला महाराजांनी 'अनध्यस्तविवर्त' म्हटलेले आहे संसारात राहून ईश्वर प्राप्ती करता येते ही अनध्यस्तविवर्त ची नवी संकल्पना नवा सिद्धांत महाराजांनी मांडला. श्री शंकराचार्यांचे अद्वैत तत्वज्ञान आणि संतांची परमप्रेमरूपाभक्ती यांचा मधुर संगम मधुराद्वैतात झालेला आहे.संत गुलाबराव महाराजांनी या नवीन भक्ती संकल्पनेच्या प्रचारासाठी 'श्री ज्ञानेश्वर मधुराद्वैत संप्रदाय' निर्माण केला.
आर्यांच्या सर्वसमावेशकत्वाचा सिद्धांत
श्री गुलाबराव महाराजांनी भक्ती आणि तत्त्वज्ञान या क्षेत्राशिवाय अन्य अनेक विषयांवर आपले मौलिक चिंतन मांडले, त्यामध्ये आर्य संस्कृती बद्दलचा विचार अभ्यासण्यायोग्य आहे. लोकमान्य टिळकांनी आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवावर होते हे मत मांडले टिळकांचा प्रतिवाद करणाऱ्यांच्या मते आर्य हे मूळचे इथलेच आहेत.
श्री गुलाबराव महाराज म्हणतात ,"तेव्हा जगभर आर्य पसरले होते त्यामुळे ते इथे होते, तिथे होते असा प्रश्न नाही. झाले फक्त असे की, संस्काराचा लोप होत गेल्यामुळे त्यांना अन्य स्थिती प्राप्त झाली. सगळे जगच आर्य होते आर्यत्वाचा पुढे संकोच होत गेला." हा नवीन सिद्धांत महाराजांनी मांडला. आचार्य गोविंद देवगिरी महाराज म्हणतात "श्री महाराजांनी आर्य शब्द हा वंश वाचक नाही, 'आर्यवंश गुणवाचक आहे' हे इतक्या कसोशीने सिद्ध केले की त्यांच्या या प्रतिभेची नाही कमाल वाटते. डॉ आंबेडकरांनी हेच मत स्वीकारले आहे आणि मांडलेले आहे."
श्री गुलाबराव महाराजांनी आर्य धर्माचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की ,आर्य धर्म हा सर्वात प्राचीन असल्यामुळे सर्व धर्मांची मूलतत्त्वे आर्य धर्मात सापडतात. कोणत्याही देशाच्या कोणत्याही शास्त्राचे मूलतत्त्व आर्यशास्त्रात आहे. त्यांनी साधू बोध ग्रंथात अन्य धर्ममतांच्या प्रचारातून आर्य देश कसा टिकला याचे विवेचन केले आहे. महाराज म्हणतात,"दुसरीकडे कितीही जड सुधारणा झाली तथापि तिचा जेव्हा कंटाळा येईल, तेव्हा सर्वांना शांती आर्यवर्तातच मिळेल व याचमुळे आर्य देश टिकला आहे व टिकणार आहे."
सर्वधर्म समन्वय विचार
श्री गुलाबराव महाराजांनी समन्वयाचा विचार दिला जगातील सर्व धर्मा मतांमध्ये हिंदू समाजातील विभिन्न पंथ संप्रदाय मतांमध्ये त्यांनी समन्वय करून दाखविला. परस्परांमधील द्वेषभाव कमी करण्यासाठी महाराजांचा समन्वय विचार चिंतनीय आहे.
'भिन्नानां समानरूपता समन्वय'
अशी समन्वयाची व्याख्या सांगून त्यांनी समन्वयाचे एकूण नऊ प्रकार सांगितले आहेत समन्वयाची प्रक्रियाच महाराजांनी सुरू केली.* *सांख्य योग न्याय वैशेषिक , पूर्वमिमांसा उत्तर मिमांसा, आणि वेदांत या वैदिक दर्शनांचा महाराजांनी समन्वय केला तसाच नारद, पंचतंत्र, शैव, शाक्त इत्यादी वैदिक संप्रदायांचा देखील समन्वय केला महानुभाव पंथ ,शीख पंथ, जैन मत ,बौद्ध मत याशिवाय ख्रिश्चन, पारशी, मुस्लिम इत्यादी धर्म मतांचा ही समन्वय करून दाखविला श्री महाराजांनी सर्वधर्माचा समन्वय करून जागतिक बंधू भावाला नवा आयाम दिला. सर्वच दर्शने एकाच आत्मतत्त्वाकडे कसे घेऊन जातात याचे स्पष्टीकरण केले इतकेच नव्हे तर इस्लाम, ख्रिश्चन, बुद्ध, जैन ,पारशी इत्यादी उपासना पद्धती कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड या तिन्ही दृष्टीने वैदिक सनातन धर्माची रूपे कशी आहेत हे सप्रमाण दाखवून दिले. सर्वधर्म षडदर्शने विज्ञानादिच्या सर्व शाखा एका वैदिक विचारातून कशा उत्पन्न झाल्या आहेत याचे सुरेख आणि विलोभनीय दर्शन घडवून दिले"*
जीवनाची भूमिका-
श्री गुलाबराव महाराजांनी श्रीनिवास शास्त्री हरदास यांना लिहिलेल्या एका पत्रात आपले जीवनविषयक भूमिका विशद केली आहे या पत्रामध्ये ते म्हणतात,"आर्यांचे म्हणणे योग्य आहे हे सिद्ध करण्याशिवाय मला व आपण प्रभूती माझ्या हितचिंतकांना दुसरे कोणतेही काम नाही योग सांख्य , वेदान्त जे काही असेल ते आमचे हेच आणि इतर कामाची टाळाटाळी करणारा मीही या कामात कधीही टाळाटाळी करीत नाही, एवढाच आपल्याला माझ्या एकंदर आयुष्यात नियमपणा दिसत असेल तेव्हा हे मी आपले काम बरोबर करीत आहे असा माझ्यावर विश्वास ठेवून मला एवढे सहाय्य करावे"
श्री गुलाबराव महाराजांनी शिष्य संप्रदायाला सोबत घेऊन आपले सिद्धांत लोकांपर्यंत पोहोचवले शिष्य पंचायतनामुळेच महाराजांची वांग्मयीन मूर्ती साकार होऊ शकली
- ब्रह्मस्थानी प्रस्थान..
श्री गुलाबराव महाराजांना २० सप्टेंबर १९१५ भाद्रपद शुद्ध द्वादशी, वामन द्वादशीला देवाज्ञा झाली. काही महिने यकृतवृद्धीच्या व्याधीमुळे त्यांनी अण्णासाहेब पटवर्धन यांच्याकडून आयुर्वेदिक उपचार करून घेतले होते. पण त्याचा गुण येऊ शकला नाही.
श्री गुलाबराव महाराजांनी आपल्या शिष्यांना कधी अंतर दिले नाही, अगदी शेवटच्या आजारातही त्यांनी स्वतःसाठी ज्ञानेश्वर माऊलींकडे काही मागितले नाही ते म्हणतात,"माऊली तुम्ही माझ्या करिता काही करू नका माझा उद्धार करा वा करू नका, पण ज्या लोकांनी माझा आधार स्वीकारला आहे, त्यांचा उद्धार मात्र अवश्य करावा"
"जयासी वाटतो माझाची आधार
तयांचा उद्धार आधी किजे!"
- डॉ. सतपाल विजयराव सोवळे
यवतमाळ, 7719918982