मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट.

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती या गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने. याच सह्याद्रीच्या मदतीने मोठमोठी आक्रमणे परतावून लावली. आमच्या वीर मावळ्यांच्या रक्ताने व शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गडकोट म्हणजे आमचे प्रेरणास्थान. या किल्ल्यांवर पाऊल ठेवल्याच मनामनांत राष्ट्राभिमानी विचार जागृत होतात आणि मनगटे सळसळतात. या गडाच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर मुखातून एकच जयघोष निघतो तो म्हणजे जय भवानी जय शिवराय, हर हर महादेव.
हे आमचे गडकोट भग्नावस्थेत होते. जागोजागी गडावरील ऐतिहासिक बांधकामे काळाच्या ओघात कोसळत चालली होती, दुर्जनांचे अड्डे बनले होते, काही ठिकाणी गडकोटांवर लोकवस्ती वाढत चालली, स्वतःच्या फायद्यासाठी तटबंदी देखील लोकांनी तोडली आहेत, त्यामुळे हे गडकोट भविष्यात नष्ट होतील की काय अशी भीती वाटत होती, अशा वेळी केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, पुरातत्व विभाग व सांस्कृतिक विभाग यांनी कंबर कसून गड किल्ल्यांचे महत्व जागतिक पातळीवर आज नेऊन ठेवले आहे. अतिशय शिस्तबद्ध रित्या, शिवमय होऊन, आई भवानीचा आशीर्वाद घेऊन केंद्र व राज्यसरकारने महाराष्ट्रातील ११ गडकोट आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश कसा होईल यासाठी नियोजन केले. आमचे गडकोट मुळातच जागतिक वारसाचे हकदार आहेत. हिरा ओळखण्यासाठी एखादा जवाहरी लागतो. नाहीतर तो हिरा काचेच्या भावात जातो. असेच काही आमच्या गडकोटांबद्दल झाले. असो देर से आये दुरुस्त आये. महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्यासाठी हा प्रसंग अतिशय अभिमानाचा आहे. आम्ही किल्ले लढवू शकलो नाही, आम्ही किल्ले बांधू शकलो नाही, गड किल्ल्यावर जाऊन पराक्रम करणे ही गोष्ट तर खूप अशक्य आहे. त्यामुळेच आम्ही किमान आमच्या गडाची निगा राखली, आमच्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची ही पवित्र भूमी आम्ही राखू शकलो आणि या पवित्र वारश्याचे कुठेही नुकसान केले नाही तरी आमच्यासाठी हे खूप आहे. मधल्या काळामध्ये गड किल्ल्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा होता. गडावर गेलो की सगळीकडे प्रेमी युगांची नावे, दारूच्या बाटल्या, चिकन मटणाचे तुकडे हे सर्वत्र पाहायला मिळायचे. परंतु शिवप्रेमी जागृत झाल्यामुळे या गोष्टी आता कमी झाल्या आहेत. आता अनेक शिवप्रेमी संघटना गड किल्ल्यांवर काम करून गडाची काळजी घ्यायला लागले आहेत. पण त्यांच्या कामाला शेवट मर्यादा आहे. कारण गडकोटांचं काम करायचं म्हणजे प्रचंड निधीची आवश्यकता असते. त्यामुळे आता केंद्र सरकार, राज्य सरकार, मुख्यमंत्री, सांस्कृतिक विभाग, पुरातत्व विभाग यांनी एकत्रित येऊन चांगले नियोजन करून गड किल्ल्यांसाठी जे पाऊल टाकले हे प्रत्येक शिवप्रेमीसाठी व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आता मराठा इतिहासाला आज जागतिक व्यासपीठ मिळाले आहे. शिवरायांच्या महापराक्रमाची, त्यांच्या न्याय निवडयाची, त्यांच्या चारित्र्याची आणि त्यांनी उभे केलेले हिंदवी स्वराज्य याचा अभ्यास जगभरात केला जाईल. त्यांच्या सारखा जाणता राजा दुसरा नाही हे जगाला कळेल. यानिमित्ताने भारताचा गौरवशाली इतिहास जगापुढे येईल. मराठा साम्राज्याच्या युद्ध कौशल्याचा, मुत्सद्देगिरीचा व रणनीतीचा प्रमुख भाग म्हणजे हे गडकोट किल्ले आहेत. या किल्ल्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी व संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे या किल्ल्यांना युनोस्कोचा जागतिक वारसा स्थळांचा जो दर्जा प्राप्त झाला त्यामुळे मराठी इतिहासाला, गड-किल्ल्यांना जागतिक व्यासपीठावर मोठा गौरव प्राप्त होणार आहे. आज हे १२ गडकोट युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट केल्यामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतीला व स्थापत्यशैलीला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आजचा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आहे.
युनोस्को चा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता आपली मोठी जबाबदारी वाढली आहे. कारण आता गडकोटांवर प्रचंड पर्यटन वाढणार, देश विदेशातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणार आहेत त्यामुळे किल्ले परिसराला खूप महत्त्व येणार आहे. गड किल्ले परिसरात मोठी आर्थिक देवाणघेवाण होऊन व्यवसाय प्रचंड वाढ होणार आहेत. हॉटेल, लॉजिंग व टुरिझम या व्यवसायांना तेजी येणार आहे. व्यवसायिकतेच्या नादात आपण आपली तत्वे ही पाळली पाहिजे. मर्यादा सोडून बेबंद पर्यटनाच्या आहारी जाऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यामुळे गडकोटांना जाणारे रस्ते व सोयी सुविधा यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. गडकिल्ल्यांच्या माहितीसाठी गाईड योजना पुढे येईल त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. गड किल्ल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. हे जंगल आपणा सर्वांना जपावे लागणार आहे.
आज युनेस्कोच्या १२ किल्ल्यांमध्ये ज्या किल्ल्यांची निवड झाली त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड हा किल्ला आहे. अतिशय सुंदर असा हा किल्ला आहे. याचा संपूर्ण परिसर हा निसर्गाने नटलेला आहे. या किल्ल्याची बांधणी अतिशय सुंदर आहे. या किल्ल्याचा इतिहास जर आपण पाहिला तर हा किल्ला प्रथम निजामशाही मध्ये होता व नंतर तो १६३७ मध्ये आदिलशाही मध्ये आला. १६४८ च्या दरम्यान तो स्वराज्यात आला. पुढे मिर्झाराजांबरोबर झालेल्या तहामध्ये हा किल्ला पुन्हा मोगलांकडे गेला. शिवरायांनी पुन्हा हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. सुरतची संपत्ती देखील या किल्ल्यावर ठेवली गेली होती, नेताजी पालकर, कान्होजी आंग्रे यांचे काही काळ गडावर वास्तव्य होते. पेशवे काळात नाना फडणवीसांनी येथे काही डागडुजी केल्याचा उल्लेख आहे. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. या किल्ल्यावर पाच दरवाजे आहेत. त्यामध्ये प्रथम गणेश दरवाजा, महादरवाजा, नारायण दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, हनुमान दरवाजा आहेत. त्यापैकी गणेश दरवाजा व हनुमान दरवाजा हा पुरातत्व विभागाने ऐतिहासिक पद्धतीने पुन्हा नवीन बसवला आहे. मुख्य प्रवेशद्वाराला भक्कम दरवाजा असणारा हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला आहे. गडावर १६ कोनी तलाव आहे. गडावर सुंदर शिवमंदिर आहे. गडावर लक्ष्मी कोठी आहे ज्यामध्ये सुरतची संपत्ती ठेवली गेली होती. गडावरील तटबंदी अतिशय सुंदर आहे तसेच विंचू कडा ही माची आहे. गडावर छोटे-मोठे अनेक पाण्याची टाके आहेत. गडावरून निसर्ग सौंदर्य त्याचबरोबर पवना धरणाचा परिसर अतिशय सुंदर दिसतो.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाची स्थापना २००१ साली झाली. संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे या ब्रीदवाक्यानुसार गड किल्ल्यांचे संवर्धन, त्याची पावित्रता व त्याला पुन्हा वैभवशाली करणे या ध्येयाने कार्यरत आहे. याला कारणही तसेच होते. मंचाची स्थापना होण्या अगोदर आम्ही कार्यकर्ते राजगड किल्ल्यावर गेलो असता तेथे अनेक ग्रुप आलेले होते. रात्री अनेकांच्या दारू पार्ट्या रंगल्या होत्या. या सगळ्या गोष्टी कल्पने बाहेरच्या होत्या. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे अशा मनात भावना जागृत झाल्या. मग आम्ही कार्यकर्त्यांनी संकल्प केला की, आपल्या तालुक्यातील लोहगड किल्ला सर्वप्रथम दुर्गसंवर्धनेचा आदर्श नमुना म्हणून निर्माण करायचा. कारण लोहगडला देखील असे गैरप्रकार चालायचे. लक्ष्मी कोठीमध्ये कायम दारूच्या बाटल्या, चिकन व मटणाचे तुकडे पडलेले असत. गडावरती बऱ्याच वेळा धांगडधिंगा सुरू असायचा. गडावर मोठ्या प्रमाणावर धार्मिक उन्माद कार्यक्रम चालायचे. त्यामुळे या किल्ल्याचे पावित्र्य नष्ट होऊन नावलौकिक खराब झाला होता. कार्यकर्त्यांनी कंबर कसून गडावर प्रामाणिक काम उभे केले. गडावरील शिवमंदिराचा सर्वप्रथम मंच व स्थानिक ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे जीर्णोद्धार केला. गडावर महाशिवरात्र यात्रा सुरू केली. गडावरील गैरप्रकार थांबवण्यासाठी मंचाने गडाला दरवाजा बसवण्याची मागणी केली. या मागणीला पुरातत्व विभागाने चांगली साथ दिली व सर्वप्रथम गणेश दरवाजा बसला. गडाला भेट देण्याच्या वेळेचे बंधन आले. त्यामुळे रात्री अपरात्रीचे गैरप्रकार थांबले. पुरातत्व विभागाने गडाला सुरक्षा रक्षक नियुक्त केल्यामुळे गड नियंत्रित झाला. पुरातत्व विभागामार्फत गडावर जाण्यासाठी पायऱ्या, तटबंदी व बुरुजांची डागडुजी करण्यात आली. मंचाच्या संकल्प शक्तीचा परिचय म्हणजे गड पायथ्याला उभे राहिलेले शिवस्मारक. आता या ठिकाणी शिवसृष्टी उभी करण्याचा मंचाचा मानस आहे. त्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे. लोहगडला आता जागतिक वारसा दर्जा मिळाल्यामुळे शिवसृष्टी अत्यंत आवश्यक आहे. कारण यानिमित्ताने जगभरातल्या पर्यटकांना शिवरायांचा इतिहास व त्यांचा पराक्रमाची माहिती मिळेल. जागतिक वारसा मिळाल्यामुळे आता लोहगडची ओळख जगभरात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता रस्ते, पाणी व स्वच्छताग्रह या मूलभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. कारण या गोष्टीची येथे वानवा आहे. माहिती केंद्र व सुरक्षा व्यवस्था येथे चोख ठेवावी लागणार आहे. किल्ल्यांची माहिती देण्यासाठी येथे चांगले गाईड तयार करावे लागतील. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला अभिमान वाटावा असा अनुभव देता आला पाहिजे. कारण त्याच्यामार्फत जगभरातल्या सर्व पर्यटकांकडे चांगला संदेश जाणार आहे. लोहगड किल्ला व त्याचा परिसर या सर्वांची काळजी शासन व स्थानिक जनतेने घेणे आवश्यक आहे. तरच हा किल्ला जागतिक वारसा स्थळांमध्ये कायम स्वरूपी राहील. उद्योगधंद्याच्या नावाखाली, वैयक्तिक फायद्यासाठी किल्ला व परिसराची वाट लागता काम नये यासाठी सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.
सचिन टेकवडे (संस्थापक, लोहगड विसापूर विकास मंच)
9922426960