कराडमध्ये ‘संपूर्ण वंदे मातरम्’ पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
१५ शाळांची नोंदणी सहभाग; २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

कराड, दि. ३ ऑगस्ट : ज्ञानभारती-कराड, जिजामाता स्मारक समिती, पुणे आणि शिक्षण मंडळ, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संपूर्ण वंदे मातरम्’ पाठांतर स्पर्धा सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी शिराळकर हॉल, शिक्षण मंडळ, कराड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्र सेविका समिती, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या बौद्धिक प्रमुख सौ. मैत्रेयीताई शिरोळकर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ, कराडचे सचिव श्री. चंद्रशेखर देशपांडे होते. स्पर्धेत कराड परिसरातील १५ शाळांतील ३० समूहांनी सहभाग घेतला. प्रत्येकी सहा विद्यार्थ्यांच्या समूहांनी संपूर्ण वंदे मातरम् सादरीकरण केले. गायक व वादक मिळून सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सुरेल गायन, स्पष्ट उच्चार, शिस्तबद्ध सादरीकरण आणि पारंपरिक वेशभूषेमुळे स्पर्धेला विशेष रंगत आली.

देशभक्तीची प्रेरणा विद्यार्थ्यांच्या मनात दृढ व्हावी, वंदे मातरम् विषयी आदर व अभिमान निर्माण व्हावा आणि भारतीय संस्कृती व राष्ट्रनिष्ठेचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे ज्ञान भारती, कराडच्या समन्वयक मंजिरी सबनीस यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञान भारतीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ज्ञान भारती कराड तर्फे सुषमाताई काळे, डॉ सुचेता हुद्देदार, सुवर्णा देशपांडे, सुखदा विदार, अनघाताई बर्डे, माधुरीताई साने, स्वाती भागवत, राजश्री शेंडे, आरती कुलकर्णी, डॉ नेहा वाचासुंदर, प्रबोधिनी किरपेकर, नम्रता कंटक, पूनमताई वास्के, यांचा सक्रिय सहभाग होता.
प्रमुख पाहुण्या सौ. मैत्रेयीताई शिरोळकर यांनी वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व संस्कार जागविण्यात या गीताचे महत्त्व विशद केले. बंकीमचंद्रांच्या भावावस्थेतून स्फुरलेलं हे गीत एक दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा महाम़ंत्र होईल ही त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांनी विद्यार्थ्यांना आपण भारताचे सुपुत्र आणि सुपुत्री आहोत हा भाव नेहमी मनात ठेऊया असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. चंद्रशेखर देशपांडे यांनी शालेय शिक्षणाबरोबरच सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. वंदे मातरम् हे केवळ गीत नसून राष्ट्रभक्ती जागविणारा मंत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुवर्णाताई देशपांडे आणि डॉ सुचेता हुद्देदार यांनी केले. राष्ट्रगीताची पार्श्वभूमी, इतिहास, त्यावेळची परिस्थिती आणि काही शब्दांचे अर्थ अशी सुंदर गुंफण घातली. आलापिनी जोशी, गायत्री कुलकर्णी आणि शुभांगी पटवर्धन यांनी परीक्षण केले तर पाहुण्याचे परिचय आणि आभार प्रदर्शन नम्रता कंटक यांनी केले. कार्यक्रमाला योगेश कदम सह प्रायोजक लाभले. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला. विजेत्या संघांना पदक, प्रमाणपत्रे आणि वंदे मातरम् पुस्तिका प्रदान करण्यात आली. तर शाळांना ट्रॉफी देण्यात आली
निकाल :
लहान गट : प्रथम – जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर आणि विद्यालय, द्वितीय – एस.एम.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, तृतीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल.
मध्यम गट : प्रथम – जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर आणि विद्यालय, द्वितीय – शेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला, तृतीय – एस.एम.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल
मोठा गट : प्रथम – जनकल्याण प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर आणि विद्यालय, द्वितीय –शेठ रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला , तृतीय – टिळक हायस्कूल.
स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान आणि सामूहिक सादरीकरणाची भावना अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली