समाजातील नव्हे तर समाजाचे संघटन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 100 वर्षे कार्यरत आहे. संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय? असा प्रश्न विरोधकांकडून कायम विचारला जातो. प्रसिद्धी परान्मूखता असली तरी राष्ट्रीय प्रवाहातील स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या नोंदी आजही सापडतात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाचे काय योगदान होते? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती...
➡ संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे काँग्रेसचे विदर्भातील नेते होते. काँग्रेसच्या अनेक चळवळीत त्यांचा सहभाग होता. ते आपल्या पूर्वायुष्यात कलकत्त्याला डॉक्टरीचे शिक्षण घेत असताना त्यांचा क्रांतिकार्याशीही संबंध आला होता.
➡ डॉक्टरांना अशी हिंदू संघटना बनवायची होती की तिच्या आधारावर ते भारत स्वतंत्र करतील व पुन्हा कोणीही भारताला गुलाम करू शकणार नाही. संघाच्या सुरुवातीच्या प्रतिज्ञेतही 'हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी संघाचा घटक झालो आहे', असे वाक्य होते.
➡ डॉक्टरांना असे वाटत होते की, देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मॅझिनी-गॅरिबाल्डीच्या इटलीप्रमाणे किंवा डी. व्हलेराच्या आयर्लंडप्रमाणे अधिक काळ सशस्त्र संघर्ष करावा लागेल. त्यामुळे त्यांचा लष्करासारख्या प्रशिक्षण व कार्यक्रमांवर जोर होता.
(संदर्भ : संघ आणि राजनीती – रा. स्व. संघ महाराष्ट्र प्रांत पुस्तिका)
➡ पुरेशी शक्ती तयार होईपर्यंत संघाच्या शक्तीचा क्षय करण्याची डॉ. हेडगेवारांची तयारी नव्हती. संघ स्थापन व्हायच्या अगोदर ते स्वतंत्रता आंदोलनात होतेच, पण संघ स्थापन झाल्यावरही त्यांनी स्वतंत्रता आंदोलनात स्वयंसेवकांबरोबर भाग घेतला तो संघाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून.
➡ ३० जानेवारी १९२७ नागपूर शहर काँग्रेसने ब्रिटिशांनी भारतीय फौजा चीनला पाठविण्याविरोधात एक सभा घेतली. त्या सभेत संघ नेते ल. वा. परांजपे यांनी सरकारविरोधी प्रस्ताव मांडला होता.
➡ १९२८-२९ च्या सायमन विरोधी आंदोलनात काँग्रेसने नागपूर व मध्य प्रांतातील प्रचाराचे काम डॉ. हेडगेवार यांच्याकडे सोपविले होते. ते डॉक्टरांनी व स्वयंसेवकांनी यशस्वी रीतीने पार पाडले. (मध्यप्रांत व बेरार यांचा प्रशासनिक रिपोर्ट १९३१-१९३२, खंड-२ पृष्ठ ९ : गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेस, नागपूर १९३३)
➡३ डिसेंबर १९२९ ला काँग्रेसने आपल्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला व सर्व भारतीयांना २६ जाने. १९३० रोजी देशभर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून २६ जाने. १९३० रोजी सर्व संघ शाखांवर स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला.
➡ १९३० च्या संघचालकांच्या बैठकीत संघकार्य व स्वातंत्र्य चळवळ या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे स्पष्ट करण्यात आले व सविनय कायदेभंग सत्याग्रहात स्वयंसेवकांना व्यक्तिगतरीत्या भाग घेण्यास सांगण्यात आले. स्वत: डॉ. हेडगेवारांनी जंगल सत्याग्रहात भाग घेतला. हा जंगल सत्याग्रह डॉक्टर हेडगेवारांनी २१ जुलै १९३० रोजी दहा हजार लोकांसोबत केला. या सत्याग्रहात त्यांना ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती.
➡ १९३१-३२ मध्ये दारूच्या दुकानांवरील निषेधार्थ स्वयंसेवकांनी अभियान चालविले. त्यामुळे दारूची विक्री ६० टक्के कमी झाली होती. (संदर्भ: पाक्षिक रिपोर्ट मध्यप्रांत १९३२ राष्ट्रीय अभिलेखागार. नवी दिल्ली.)
➡ सत्याग्रहात सहभागी झालेले इतर संघ पदाधिकारी नागपूर संघचालक आप्पासाहेब हळदे, सिरपूर संघचालक बाबूराव वैद्य, रामभाऊ वखरे, विठ्ठलराव गाडगे, सीताराम पंत मेहकर वगैरे. (संदर्भ: केसरी, २२ जुलै व २ ऑगस्ट १९३०)
➡ स्वा. सावरकरांचे प्रतिबंधित साहित्य सार्वजनिकरीत्या वाचून स्वत:ला अटक करवून घेणार्यांमध्ये संघाचे सरकार्यवाह जी. एम. हुद्दार यांचा समावेश होता. (संदर्भ: केसरी, ९ डिसेंबर १९३८).
➡ १९३२ साली संघाला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. देशाच्या प्रत्येक प्रांतात संघाच्या शाखा सुरू झाल्या. संघाचे वर्धिष्णू रूप पाहून काँग्रेस व हिंदू महासभा दोघांनाही संघाने आपल्या नेतृत्वाखाली चालणार्या आंदोलनांत स्वयंसेवकांना पाठवावे असे वाटू लागले. परंतु नित्य कार्य व तत्कालीन कार्य हा फरक डॉक्टरांना व संघ नेत्यांना माहीत होता. त्यानुसार भय्याजी दाणी यांच्या नेतृत्वाखाली १०० स्वयंसेवकांच्या दलाने हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या भागानगर सत्याग्रहात भाग घेतला.
➡ अनुशिलन समितीने १९३९ साली दुसर्या महायुद्धाच्या वेळी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली क्रांती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विचारविमर्श करण्यासाठी काही क्रांतिकारक डॉ. हेडगेवारांना भेटले व त्यांनी त्यांची व सुभाषचंद्रांची भेट ठरविली.
➡ २० जून १९४० रोजी सुभाषचंद्र बोस जेव्हा त्यांना भेटायला आले तेव्हा डॉक्टर अत्यंत आजारी होते. त्यांचे काहीही बोलणे झाले नाही. थोडा वेळ बसून, डॉक्टरांना नमस्कार करून ते निघून गेले. दुसर्याच दिवशी डॉक्टरांचे निधन झाले (संदर्भ: हितवाद, २३ जून १९४०)
➡डॉ. हेडगेवारांच्या निधनानंतर श्री गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले.
तेव्हा त्यांचे वय ३४ होते व संघासारख्या विशाल संस्थेचे वेगळेपण जपत त्यांना संघटनेच्या ध्येयाकडे सर्वांना घेऊन जायचे होते.
➡ १९४२ साली चले जाव आंदोलनात संघाने सर्व शक्तीने सहभागी व्हावे म्हणून दोन कार्यकर्ते श्री गुरुजींना भेटले. पण श्री गुरुजींच्या आंदोलनाची योजना व इतर तपशिलासंबंधीच्या प्रश्नांवर ते योग्य माहिती देऊ शकले नाहीत. (स्वातंत्र्य आंदोलनात रा.स्व. संघ लेखक – सुधीर जोगळेकर) तेव्हा संघाच्या पूर्व धोरणानुसार ज्यांना या आंदोलनात भाग घ्यायचा होता त्या स्वयंसेवकांनी या आंदोलनात भाग घेतला.
➡ विदर्भात चिमूर तालुक्यातील कचेरीवर तिरंगा फडकविणारा, बंदुकीच्या गोळ्यांनी चाळण झालेला संघाचा स्वयंसेवक होता.
(संदर्भ: राष्ट्रीय संकट प्रसंगी श्री गुरुजी, संकलक – कृष्ण कुमार बवेजा).
➡ अनेक भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना संघ कार्यकर्त्यांनी आश्रय दिला. उदा. जयप्रकाश नारायण आणि अरुणा असफअली यांचे वास्तव्य दिल्लीचे संघचालक लाला हंसराज गुप्त यांच्या घरी होते. (दै. हिंदुस्तान ऑगस्ट १९६७ – अरुणा असफअली यांची मुलाखत)
➡ क्रांतीसिंह नाना पाटील यांचे वास्तव्य औंधचे संघचालक पंडित श्रीपाद सातवळेकर यांच्याकडे होते. किसन वीर वाईचे संघचालक दत्तोपंत गोखले यांचेकडे राहिले होते तर साने गुरुजी पुण्याचे संघचालक भाऊसाहेब देशमुख यांचेकडे होते. अच्युतराव पटवर्धन यांचीही व्यवस्था संघ स्वयंसेवकांकडे करण्यात आली होती.
(संदर्भ: राष्ट्राय स्वाहा- प्रभात प्रकाशन)
➡ महात्मा गांधींनी डॉक्टर हेडगेवार हयात असताना संघाच्या वर्धा शिबिरात, तर श्री गुरुजी असताना दिल्लीत १३ सप्टेंबर १९४७ या दिवशी एका कॉलनीतील संघ शाखेला भेट दिली. (हिंदू १७-९-४७) तसेच १७ सप्टेंबरला त्यांनी दिल्लीतच संघ शिबिरात स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना संघाचे कौतुक केले होते. (हिंदुस्तान टाईम्स १७-९-४७ पृ.२)
➡ १९३९ च्या पुण्याच्या शिबिरात भेट द्यायला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले होते. डॉ. हेडगेवारही या शिबिरात होते. या शिबिरात सर्व जातींचे स्वयंसेवक एकतेने राहात असल्याचे पाहून त्यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले होते.
(संघच कां व कसा?- वसंतराव देवकुळे- उत्कर्ष प्रकाशन)
➡ १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. तरी गोवा मुक्त झाला नव्हता. पुण्याचे संघचालक विनायकराव आपटे यांच्या नेतृत्वाखाली, राजाभाऊ वाकणकर, बिंदूमाधव जोशी, संगीतकार सुधीर फडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे व इतर स्वयंसेवकांनी २ ऑगस्ट १९५५ रोजी दादरा नगर हवेली मुक्त करून केंद्र सरकारच्या ताब्यात दिली. (दादरा नगर हवेलीची मुक्ती, लेखक- शशिकांत मांडके)
➡ त्यानंतरच्या गोवा मुक्ती आंदोलनात सांगलीचे मोहन रानडे हे सशस्त्र आंदोलनात होते तर जगन्नाथराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वयंसेवकांनी भाग घेतला. त्यात कल्याणचे माधवराव काणे यांचाही समावेश होता. या आंदोलनात त्यांना एक गोळीही लागली होती.
(गोवा मुक्ती विशेषांक – कल्याण नागरिक)
➡ काश्मीरच्या भारतासोबत विलीनीकरणासाठी सरदार पटेलांच्या सहयोगाने गोळवलकर गुरुजी, उत्तर प्रदेशाचे संघचालक बॅ. नरेंद्रजीत सिंहजी, दिल्ली प्रांत प्रचारक वसंतराव ओक यांच्यासमवेत १७ ऑक्टोबर १९४७ ला श्रीनगरला पोहोचले. १८ ऑक्टोबरला कर्ण महालात त्यांची व महाराजांची विलीनीकरणाच्या विषयावर भेट झाली. त्यानंतर सहकार्यांशी विचारविनिमय करून २६ ऑक्टोबरला महाराजांनी विलीनीकरणावर सही केली. (राष्ट्रीय संकट प्रसंगी श्री. गुरुजी, संकलक – कृष्ण कुमार बवेजा).
➡ रा. स्व. संघाची वाटचाल देशाला परम वैभवाप्रत नेणे व त्यासाठी शाखांच्या माध्यमातून नि:स्वार्थी व देशासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करावयास सिद्ध असणारे कार्यकर्ते निर्माण करणे हे विशाल ध्येय डोळ्यासमोर ठेवून चाललेली आहे.
➡ भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे त्या वाटचालीतील एक उद्दिष्ट होते. त्यासाठी आवश्यक ते योगदान रा. स्व. संघाने आपल्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून दिले आहे.
➡ सर्वसामान्य भारतीयाला महात्मा गांधींनी स्वदेशी वापरण्यास सांगून स्वातंत्र्य आंदोलनात सामील करून घेतले. संघाने कधी गाजावाजा केला नाही. पण, स्वयंसेवकांतून अस्पृश्यता संपविली. जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद संपविले. स्वयंसेवकांना न सांगता निर्व्यसनी बनविण्याचा प्रयत्न केला. साधी राहणी व उच्च विचारसरणी प्रत्यक्षात आणली. आज त्याचा परिणाम देशवासीयांवर होत आहे. देशासाठी संघाने दिलेले हेही अनमोल योगदान नाही का?
रा. स्व. संघाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं म्हणजे सूर्याला सूर्य प्रकाशबाबत विचारण्यासारखे आहे. संघ आणि देशभक्ती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशविरोधी शक्तींच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे आरएसएस आहे. म्हणून ते संघाला बदनाम करण्यासाठी कायम खोट्याचा आधार घेतात.