आणीबाणी विरोधात रा.स्व.संघाचे लोकशाही पुनर्स्थापनेचे बहुमोल कार्य :दिलीप क्षीरसागर
भानुदास येवला यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

सटाणा:आणीबाणीच्या अंध:कारमय कालखंडात संघर्ष करुन लोकशाही पुनर्स्थापनेचे आव्हानात्मक कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी येथे काढले.
आणीबाणीत मिसाबंदी म्हणून अटक झालेल्या ज्येष्ठ संघकार्यकर्ते भानुदासजी वामन येवला यांच्या कारागृहातून मुक्त होण्याच्या ४९ वर्षपूर्ती निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
काळा कालखंड
आणीबाणी मध्ये लोकशाहीच्या चारही स्तंभांचे अवमूल्यन करण्यात आले. संविधानाची हत्या करण्यात आली. लोकसभेची मुदत एक वर्षांनी वाढवून घेण्यात आली. असे अनेक गैरप्रकार घडले. सत्ताबाह्य घटना केंद्रामुळे काँग्रेस पक्षांतर्गतच असंतोष निर्माण झाला. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र होत चालले होते. त्यातच इंदिरा गांधींची लोकसभेवरील निवडणूक न्यायालयाने रद्द झाली. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली.
आणीबाणी मध्ये व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आली. देशात दहशतीचे वातावरण तयार झाले.
त्यामुळे प्रक्षुब्ध जनमताने १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस पक्षाचा पराभव झाला.
आणीबाणीत विरोधात संघर्ष
आणीबाणी विरोधातील संघर्षात कारागृहात गेलेल्या जवळपास सव्वा लक्ष कार्यकर्त्यां पैकी एक लाखाच्यावर संघ स्वयंसेवक होते.भूमिगत कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व कार्य केलेले आहे. आणीबाणीच्या विरोधात केलेल्या संघर्षामुळे लोकशाही पुन्हा प्रस्थापित झाली.
ही लोकशाही अबाधित ठेवण्याचे काम पुढच्या पिढीला करायचे असल्याने आणीबाणीचा इतिहास अभ्यासला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी भानुदास येवला लिखित "आणीबाणी व मी" या कारागृहातील आठवणींच्या संकलन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुस्तकाचे संपादक डॉ. गजानन होडे,सत्याग्रही व आयुर्वेद सेवा संघाचे अध्यक्ष डॉ मधुकर आचार्य, व नरेंद्र(नाना) वाणी,तसेच आप्तेष्ट आशा ततार(मनमाड) सुनिता कोठावदे (कळवण), आर. टी. सोनवणे(सटाणा) यांनी मनोगत व्यक्त केले.
आणीबाणीत सत्याग्रह केलेले लोकतंत्र सेनानी डॉ. मधुकर आचार्य(वणी),रमाकांत भावसार (येवला), नरेंद्र वाणी(नाशिक), अण्णा गजभार(पेठ), अनिल जोशी(मालेगाव) यांचा सन्मान करण्यात आला. दिवंगत लोकतंत्र सेनानी परिवारातील श्रीमती जयश्री गणोरे (नासिक), श्रीमती रोहिणी शिंत्रे, श्रीमती नीता तिळवणकर, श्रीमती वंदना भावसार (मालेगाव) या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनीकुमार येवला यांनी केले.
परिमल जोशी व गौरांग जोशी यांनी मंत्रघोषात आशिर्वाद दिले.
रमाकांत भावसार यांनी व कुशल येवला यांनी गीत सादर केले. सूत्रसंचालन भरत भालेराव यांनी केले तारकेश्वर येवला यांनी स्वागत केले. यावेळी सटाणा शहरातील अनेक मान्यवर बंधू -भगिनी उपस्थित होते
चौकट
पुस्तक प्रकाशन अभिनव पद्धतीने करण्यात आले. श्री संदिप पगारे यांनी नाशिक कारागृहाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती मंचावर साकारली होती.
या प्रतिकृतीचा दरवाजा उघडून पुस्तके बाहेर काढून त्याचे प्रकाशन करण्यात आले.
२१ मार्च १९७७ रोजी लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी सरकारचा पराभव झाला व जनता पक्षाचे बहुमत आले. २२ मार्च रोजी कारागृहातून अनेक मिसाबंदींना सोडण्यात आले. त्यात श्री भानुदास येवला यांचा समावेश होता.
त्याचे औचित्य साधून २२ मार्च रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला.
भानुदास येवला हे नाशिक कारागृहात असताना त्यांच्या पत्नी या दोन वर्षाच्या अश्विनीकुमार व कडेवरील तारकेश्वर यांना कारागृहात भेटीस घेऊन जात असत हे ऐकल्यावर सभागृह भारावून गेले.
आणीबाणीविरुद्धचा संघर्ष विषम होता. एकीकडे बलाढ्य सरकार, सर्वत्र भीतीचे वातावरण, संघावर बंदी, अनेक प्रमुख कार्यकर्ते कारागृहात होते.भूमिगत कार्यकर्त्यांना अत्यंत सावधपणे जनमत संघटित करावे लागत होते. आणीबाणी विरोधात न्यायालयात देखील दाद मिळत नव्हती. वृत्तपत्रांवर पोलिसांची सेन्सॉरशिप आल्यामुळे देशात काय चालले आहे काही कळत नव्हते. बंदिवासातील अनेक संघ कार्यकर्त्यांच्या नोकऱ्या- व्यवसाय बंद पडले. कुटुंबीयांचे हाल झाले. अशा विपरीत परिस्थितीत संघ कार्यकर्त्यांनी मनोधैर्य टिकवले होते असे क्षीरसागर यांनी सांगितले.