•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक : एक चिंतन (भाग – एक)

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 20 days ago
भाष्य  

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक : एक चिंतन (भाग – एक)


ये ये बाळा ये ! क्षेम असो ! हो शतायू कुलतिलका ।
भरते ये दाटुनी किती ? स्वास्थ असे कीं गुणानुकुलटिळका ।।
एकेक मोजुनि दिन अब्दवरी अंतरासी साहियेले ।
पळभरही धीर न धरावे तोच सुदैवे मुखासी पाहियेले ।।
' श्री बाळ ' बहूप्रेमे धावें तो आर्यजननी घेच करी ।
सप्तमी दिनीं सकाळी भेटीला दाटली घनश्चकरी ।।

--- स्वा. विनायक दामोदर सावरकर (१८९८)

 ब्रिटिश साम्राज्याशी राजद्रोह केल्याच्या कारणाने १८ महिने तुरुंगवास भोगून आलेल्या आपल्या सुपुत्राचे स्वागत साक्षात भारतमाता करत आहे, अशी कल्पना या काव्यातून साकारली आहे. अर्थात हे काव्य नेमके कोणासाठी केले आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. पण ते नाव उच्चारताच राज्यकर्त्यांनी अनीती, अत्याचार, भ्रष्टाचार यांच्या विरोधात बंड करून उठण्याची सहज ऊर्जा प्राप्त होते आणि म्हणूनच ते नाव पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते; नरकेसरी बाळ गंगाधर टिळक, अर्थातच लोकमान्य टिळक. १ ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळकांचा स्मृतिदिन.

 टिळकांना आदरांजली वाहताना त्यांच्या चरित्रातील काही महत्त्वाचे पैलू नकळत समोर येतात. टिळकांची सर्वसामान्य माणसांत असलेली प्रतिमा ही "स्वातंत्र्य संग्रामातील एक अग्रणी" अशीच आहे, पण याव्यतिरिक्त लोकमान्य टिळक हे वेदाभ्यासी, ज्योतिषशास्त्र पारंगत, गणितज्ञ, संस्कृत भाषा पंडित देखील होते. त्यांचे संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व होते, पण त्यातही शास्त्रीय संस्कृतवर त्यांचा अधिक भर असे. कोणत्याही संस्कृत मास्तरविना त्यांनी संस्कृतमधील शास्त्रीय ग्रंथांचे बारकाईने अध्ययन केले होते. हे अध्ययन इतके बारकाईने केले होते की, एखादा संस्कृत शब्द वेदांतसूत्रात नेमका कुठे आला आहे, हे ते अचूक सांगत. याबाबत तत्कालीन शास्त्रीमंडळींना देखील याचे विशेष वाटत असे. वेद-वेदांतातील श्लोकांचा सखोल अभ्यास करत असतानाच त्यांनी वेदांची काल निश्चिती देखील केली होती.

 

टिळकांना जोतिषाची आवड जरी असली तरी ती ज्योतिर्गणिताची, फलज्योतिषाची नव्हे. त्यांना भारतीय ज्योतिर्गणित पद्धतीचा अभिमान होता. याच ज्योतिर्गणिताच्या साहाय्याने, प्राचीन संस्कृत ग्रंथातील श्लोकांचा अर्थ घेत त्यांनी वेदकाल, महाभारत काल निश्चिती केली होती. त्याचप्रमाणे पंचांग मांडणीच्या पद्धतीमध्ये संशोधन देखील केले होते. याच नवीन संशोधनाचा अंगीकार करून मांडल्या जाणाऱ्या पंचांगांना 'टिळक पंचांग' असे म्हटले जाते. आम्ही वाचकांना हे पुन्हा सांगू इच्छितो की, टिळकांना केवळ गणकज्योतिषाचाच अभिमान होता, फलज्योतिषावर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे एखाद्याची कुंडली मांडून "बघू तुझे ज्योतिष काय?" असले उद्योग त्यांनी कधीही केले नाहीत.

   टिळकांची पत्रकारिता, लेखन आणि ग्रंथनिर्मिती याबद्दल बहुतेक बाबी ज्ञात आहेत, पण त्यांच्या लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये म्हणजे रोखठोक भाषा, प्राकृताचा शुद्ध उहापोह, साधी सरळ मांडणी इत्यादी. त्यामुळे त्यांचे लेख वाचताना टिळक स्वतः समजून सांगत आहेत असे वाटत असे. पण त्यांच्या या साध्या सोप्या मांडणीनेही ब्रिटिशांना घाम फोडला होता, हे वेगळे सांगायला नको. लेखन कार्याबाबतीत त्यांची चिकाटी तितकीच जबरदस्त होती. एकदा लेखन सुरू केले म्हणजे त्यांना इतर कसलेच भान राहत नसे. काही वेळा तर ३६-३६ तास सतत वाचन-लेखन केल्याचे उल्लेख त्यांच्या चरित्रातून दिसतात. लेखनच नव्हे, तर कोणत्याही कार्याच्या बाबतीत त्यांचा उत्साह दांडगाच असे. अखंड ऊर्जेचा स्रोत त्यांच्यामध्ये आजन्म वास करत होता हे सत्य आहे.

    सार्वजनिक कामातील उत्साह, समाजाप्रती असणारी कळकळ, स्वराज्य प्राप्तीची धडपड, स्वदेशीचा यथार्थ स्वाभिमान यांमुळे टिळकांचा लोकसंग्रह दांडगा होता. पण त्यांच्याभोवती जमणारी मंडळी ही काही केवळ कलेसाठी-कला अशा दृष्टीने जमलेली नसत. त्यांची टिळकांवर नितांत श्रद्धा आणि प्रचंड विश्वास असे. बऱ्याचदा यात्रेकरता कोणी दीर्घकाळ गावाबाहेर जात असेल, तर ते आपले पैसे, दागिने, मौल्यवान चीजवस्तू टिळकांच्या स्वाधीन करून जात आणि परत आल्यावर घेऊन जात.

टिळकाना सार्वजनिक कार्यामध्ये मिळालेला जनाधार हा काही व्यक्तिसापेक्ष अंधभक्तीमधून मिळालेला नव्हता, तर टिळकांनी जनमानसाचा विश्वास संपादन केला होता, म्हणूनच. सर्वसामान्य जनता केवळ चळवळीपुरतीच टिळकांच्या पाठीशी उभी होती असे नाही, तर जनमानसाने प्रत्येक कार्यामध्ये तन-मन-धन अर्पून आपल्या या नेत्याला नेहमीच कार्यरत राहण्यास साथ दिली होती. टिळकांची लोकप्रियता ही काही पुणे-मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण देशभरातून त्यांचे नेतृत्व मान्य केले गेले होते.

संपूर्ण देशभरातून त्यांच्या एका भेटीसाठी, मार्गदर्शनासाठी लोक आतुर होत असत. म्हणूनच मुंबईतील झेंद-अवेस्ता हा पारशी ग्रंथ शिकवणारे बी. टी. अंकलकेसरीया हे टिळकांना वैदिक किंवा वैदिकोत्तर वाङ्मयातील एखादा संदर्भ मागत, तर कोलकात्यावरून मोतीलाल घोष बंगालातील दोन पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याची विनंती करत. कोणी कोल्हापूरहून एखाद्या विवाहासाठी शास्त्रार्थ मागत, तर कधी नासिराबादेहून श्रीशंकराचार्य त्यांच्या मठाला आश्रय देऊन धर्मकार्य करण्याचे आज्ञापत्र पाठवत. तर कधी अलाहाबादेवरून कॅप्टन बसू त्यांच्या एका ग्रंथामध्ये छापण्यासाठी टिळकांना वेदकालनिर्णय या विषयावर एखादा लेख लिहून देण्याची विनंती करत, तर कोणी एखादी ब्रिटिश महिला टिळकांना वैदिक गुरु मानून त्यांच्याकडून आपल्या वैदिक विषयातील शंका विचारत असे.

   एकंदरीत टिळकांचा पत्रव्यवहार पाहता, त्यांना देशभरातूनच नव्हे तर, लंडन, फ्रान्स येथूनही अनेकजणांची अनेक विषयावर मार्गदर्शन मागणारी, गाऱ्हाणी मांडणारी तर कधी मध्यस्थी करायची विनंती करणारी पत्रे, तारा येत असत, हे स्पष्ट होते. या साऱ्या पत्रव्यवहारावरून त्यांचा लोकसंग्रह, लोकप्रियता आणि लोकमान्यता स्पष्टपणे सिद्ध होते.

  लोकहितकारी राजकारण कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण टिळकांच्या चरित्रातून निश्चितच मिळते. हे असे राजकारण, समाजकारण करत असताना बऱ्याचदा त्यांच्यावर आरोपांची चिखलफेक झाली होती. टिळकांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात काही वर्षे या आरोपांचा फोलपणा समाजापुढे येत गेला, पण गेल्या काही वर्षांपासून टिळकांच्या भूमिकेचा, विचारांचा, लेखनाचा विपर्यास करून जातिवादाचा अजेंडा पुढे रेटण्याच्या कुटील कारस्थानाचे संचलन करण्यात काही स्वार्थी आणि धूर्त मंडळी यशस्वी होत आली आहेत.

टिळकांवरील आरोप, त्यातील तथ्य आणि मिथ्य यांबद्दल पुढील भागातून चर्चा करूयात.

- श्रीपाद श्रीकांत रामदासी
प्रवर्तन प्रतिष्ठान, पुणे


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • अनीती
  • अत्याचार
  • भ्रष्टाचार
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.