स्व-बोधातूनच भारत जगाचा दीपस्तंभ होईल
'संघ शताब्दी मंथन' कार्यक्रमात डॉ. मनमोहनजी वैद्य यांचे प्रतिपादन

पुणे, दिनांक १९ एप्रिल २०२६
"आपला देश प्राचीन काळापासून उद्योगप्रधान होता. कापड, धातू आणि रसायन अशा विविध क्षेत्रात भारताचे जागतिक बाजारपेठेत प्रभुत्व होते. एका देशाला दोन नावे असणे हे जगाच्या पाठीवर कुठेही नाही, त्यामुळे 'इंडिया' नव्हे तर 'भारत' हीच आपली खरी आणि गौरवशाली ओळख आहे. याच 'स्व-बोधा'तून आणि सेवाभावातून भारत आगामी काळात जगाचा दीपस्तंभ बनेल," असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहनजी वैद्य यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पर्वती भागाच्या वतीने मुकुंद नगर येथील चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात 'संघ शताब्दी मंथन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन निदा शेख व ज्योति वाघमारे - शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व समाजापर्यंत पोहोचून भारतीय नागरिकांना समाजहितासाठी सक्रिय करणे आणि संविधानिक कर्तव्यांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. वैद्य म्हणाले की, भारताचे औद्योगिक वैभव किती मोठे होते, याचा उल्लेख डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथ मंदिर उद्घाटनावेळी केला होता. आपली संस्कृती एक असली तरी उत्सव विविध आहेत. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण जगाने भारताची आध्यात्मिक शक्ती अनुभवली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिक सेवाकार्यासाठी ज्या पद्धतीने बाहेर पडले, ते राष्ट्र जिवंत असल्याचे जिवंत उदाहरण आहे.
संजयजी कुलकर्णी यांनी 'पंच परिवर्तन' विषयावर आपली मते मांडली. ते म्हणाले की, "आज पाश्चात्य देशांमध्ये कुटुंब व्यवस्था कोलमडली आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्येही ही व्यवस्था संपवण्याचे भाष्य केले गेले होते, मात्र भारताने आपली कौटुंबिक मूल्ये जपणे ही काळाची गरज आहे. आपल्याकडे झाडूलाही नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्याची उदात्त संस्कृती आहे." यावेळी त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हा मंत्र जपत पाणी वाचवणे, व प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक समरसता वाढवण्यासाठी घरेलू कामगारांना सन्मानाची वागणूक देणे आणि सामाजिक नीतिमत्तेचा भाग म्हणून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास पर्वती भागातील गणमान्य नागरिक, संघ स्वयंसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.