•  15 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी : सामाजिक समरसतेची कृतिशील राज्यकर्ती

विश्व संवाद केंद्र - पुणे 18 days ago
राष्ट्र संत   व्यक्तिविशेष  

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी : सामाजिक समरसतेची कृतिशील राज्यकर्ती

 

          श्रीहरिहरभक्ता तू देवि अहिल्ये, वरा धरा भूषा। पूषा तुज साधु म्हणे ख्याता तुजसम न बाणतनुभूषा।। 
         देवी अहिल्याबाई झालीस, जगत्रयात तू धन्या। न न्याय धर्मनिरता अन्या कलिमाजी ऐकिली कन्या। 
         धर्मार्थ गोत्रजन्या किंवा झालीस तू धराजन्या तुज देवि भेटली जी सत्कीर्ती कधीच हे न राजन्या।

१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात, भारताची सामाजिक आणि राजकीय रचना मोठ्या बदलांमधून जात होती. परकीय आक्रमणांनी देश अस्थिर झाला असला, तरी या अंधारातही आशेचा दीप प्रज्वलित करणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आपल्या धर्मनिष्ठ, सेवाभावी आणि समरस दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आत्म्याला नवा श्वास दिला.

त्यांच्या नेतृत्वाने सामाजिक न्याय आणि स्त्री-सन्मान आदी मूल्यांना बळ दिले. त्यांनी केवळ राजसत्ता चालवली नाही, तर धर्म आणि समाज यांचं सर्जनशील पुनरुज्जीवन केलं. पानिपतच्या आघातानंतर खचलेल्या आणि जातिभेदांनी विखुरलेल्या समाजात आत्मभान निर्माण करून, अहिल्यादेवींनी हिंदू समाजाला पुन्हा समरसत्तेच्या धाग्याने एकत्र बांधले . त्यांच्या घरातील व्यक्तींना देखील त्यांनी समतेचे धडे दिले. त्यांच्या मुलीचा आंतरजातीय विवाह हे एक मोठे क्रांतिकारी उदाहरण आहे.

आज आपण त्यांच्या याच अद्वितीय समरसतेच्या कार्याचा आढावा घेणार आहोत ज्यामुळे समाजात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आणि भारतीय संस्कृतीने पुन्हा एकदा उभारी घेऊन महाराजांच्या “हिंदवी स्वराजाला” एक वाटचाल मिळाली. अहिल्यादेवींची व्यापक दृष्टि आणि सर्वसमावेशक कर्तृत्व हे आजही आपल्याला समता, सेवा आणि संकल्पाची प्रेरणा देते.

बालपणात रोवलेली समरसतेची बीजे रामायण, महाभारत तसेच छत्रपती शिवराय आणि शूरवीरांच्या कथा ऐकून प्रेरणा घेणाऱ्या अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वात सामाजिक समरसतेचे बीज बालपणातच रोवले गेले होते. चौंडी गावातील शिवभक्त माणकोजी शिंदे आणि त्यांची धर्मनिष्ठ पत्नी सुशीलाबाई यांनी आपल्या कन्येला केवळ धार्मिक आचारधर्म शिकवला नाही, तर त्यामागची नीती, मानवतेचा मूलमंत्र आणि समाजप्रेम याचाही संस्कार केला. गोरगरिबांची परिस्थिती जाणून घेणे, त्यांना मदतीचा हात देणं, स्त्री-पुरुष भेद न मानता प्रत्येक माणसात ईश्वरदर्शन करणं हे तिच्या स्वभावाचा अविभाज्य भाग बनले होते. या बालवयातील शिकवणी मुळेच समरसतेचे मूल्य हे अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराच्या मध्यवर्ती तत्त्वांपैकी एक होत.

समरसतेचा राजकीय संकल्प: “प्रजा हीच कुटुंब”

अहिल्यादेवी होळकर यांचा समतेचा दृष्टिकोन म्हणजे त्या काळातील सामाजिक व्यवस्थेवर एक सुसंस्कृत, धाडसी आणि परिवर्तनवादी प्रहार होता. त्यांच्या राज्यकारभाराचे मूळ तत्त्व “सर्व प्रजा ही माझी संतती आहे” या भावनेत होत. त्यांनी राजसत्तेला केवळ अधिकाराचा माध्यम न मानता, धर्मप्रेरित सेवा म्हणून स्वीकारले.

त्यांच्या राज्यकारभारात जाती, धर्म, वर्ण, पंथ किंवा लिंग या आधारावर कुठलाही भेदभाव होऊ दिला गेला नाही. न्यायालयीन प्रकरणांपासून ते महसूल वसुली, जमीन वाटप, सरकारी मदत आणि जनहिताच्या निर्णयांपर्यंत सर्व व्यवहारात तत्त्वनिष्ठ पारदर्शकता होती. त्यांच्या दरबारात दलित, शूद्र, भिल्ल, गोंड समाजातील लोकही आपल्या तक्रारी घेऊन थेट पोहोचू शकत. एखादा अधिकारी जर जातीवरून भेद करत असेल, तर अहिल्यादेवी स्वतः हस्तक्षेप करून त्याच्यावर कारवाई करत. त्यांचं ब्रीद होतं – "प्रजेचा अपमान म्हणजे धर्माचा अपमान." यामध्ये त्या धर्म आणि प्रशासन यांचं समतोल समीकरण प्रस्थापित करत. त्यांच्या निर्णय प्रक्रियेत नीति, सेवा आणि समरसतेचे तत्त्व कायम केंद्रस्थानी होते.

मंदिरे: सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेची केंद्रे

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासाठी मंदिर हे केवळ ईश्वरपूजेचे ठिकाण नव्हते. ते होते समाजमनाला एकत्र आणणारे, संस्कृतीला चेतना देणारे आणि राष्ट्रभावनेला स्वरूप देणारे केंद्र. त्यांनी उभारलेली मंदिरे म्हणजे सनातन हिंदू परंपरेच्या पुनर्जागरणाची जिवंत स्मारके होती, ज्या सामाजिक समरसतेच्या, सांस्कृतिक संवादाच्या आणि आध्यात्मिक शक्तीच्या आधारावर उभ्या राहिल्या. मुघल आक्रमण, इस्लामी सत्ता, आणि राजकीय अस्थैर्यामुळे जी मंदिरे उद्ध्वस्त झाली, जीर्थ झाली किंवा विस्मृतीत गेली होती, त्या सर्वांना काशी विश्वनाथ, सोमनाथ, द्वारका, रामेश्वर, गयाजी यांसारख्या स्थळांवर अहिल्यादेवींनी भव्य, सामूहिक आणि धर्मनिष्ठ रूप दिले.

जात-पंथ, वंश-भाषा या साऱ्या भिंती तिथे झिरपल्या. मंदिरे म्हणजे एकत्र येण्याचे, ओळख विसरण्याचे आणि भारत म्हणून जाणिवेने जगण्याचे केंद्र बनले.या स्थळांचे केवळ निर्मितीपर्यंतच योगदान न देता, त्यांनी त्याच्या टिकावासाठी आणि सातत्यासाठी पुजारी, धर्मसेवक, व्यवस्थापक यांना वंशपरंपरेने शेतजमिनी दिल्या. पूजाअर्चा, दिवाबत्ती, नैवेद्य, मंदिरसंभार यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची स्वायत्त, दीर्घकालीन व्यवस्था त्यांनी उभी केली जेणेकरून पुढच्या पिढ्यांना धर्माची, संस्कृतीची आणि एकात्मतेची साखळी अबाधित ठेवता येईल. या मंदिरे व स्थापत्यांत कोणत्याही जाती, वर्ग, वर्ण, पंथाचा प्रतिबंध नव्हता. त्यांनी श्रद्धेची केंद्रे तथाकथित श्रेष्ठ जातींच्या मक्तेदारीतून मुक्त करून, ती सर्व हिंदू समाजाच्या सामूहिक आध्यात्मिक हक्काचे स्थान बनवली.

विशेषतः, गंगेचे पवित्र जल दरवर्षी भारतभर प्रसिद्ध तीर्थस्थळांवर पाठवण्याची परंपरा त्यांनी सुरू केली ही परंपरा उत्तर आणि दक्षिण भारताच्या दरम्यान आध्यात्मिक पूल बांधणारी होती. गंगा आणि रामेश्वर यांचे एकत्रीकरण, हे केवळ धार्मिक नव्हते ते सांस्कृतिक राष्ट्रवादाचे सत्त्व होते.

धार्मिक सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता : समरसतेच्या आध्यात्मिक मुळाशी जोडलेले नेतृत्व

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नेतृत्व हे धर्माधिष्ठित होते. ते सर्वसमावेशक, सहिष्णू आणि समरस होते. त्यांच्या दृष्टिकोनात धर्म म्हणजे केवळ पंथविशिष्ट श्रद्धा नव्हे, तर सर्व जीवांमध्ये एकत्वाचा अनुभव होता. त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान राखला. शासनाच्या कोणत्याही निर्णयात कोणत्याही धर्माविरोधी भूमिका घेतली गेली नाही. शैव, वैष्णव, शाक्त, स्मार्त अशा विविध संप्रदायांना त्यांनी समान महत्त्व दिलं. त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत मंदिरे बांधून हिंदू धार्मिक परंपरेतील सर्व प्रवाहांना सामावून घेतलं. त्यांच्या अन्नछत्रांमध्ये, धर्मशाळांमध्ये कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या व्यक्तीस प्रवेश नाकारण्यात आला नाही. ही कृती त्या काळातील वर्णव्यवस्थेला सौम्य पण ठाम उत्तर होती.

भिल्ल समाजाचे पुनर्वसन

अहिल्यादेवी होळकरांचे राजकारण केवळ सत्ता चालवणे नव्हते, तर समाजातील दुर्बळ घटकांना सन्मानाचे नागरिकत्व देणारे सर्वसमावेशक धोरण होते. त्यावेळी तत्कालीन समाजाने भिल्ल, गोंड, कोल, परधान यांसारख्या वनवासी जमातींना दरोडेखोर, विध्वंसक आणि असभ्य मानले होते. अहिल्यादेवींनी हा दृष्टिकोन पूर्णपणे नाकारला. त्यांनी या समाजाकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिले आणि त्यांच्या सामर्थ्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी केला.

पूर्वी भिल्ल समाज डोंगर-दऱ्यांमध्ये राहून वाटसरूंना लुटणे आणि घोडेस्वारांवर हल्ले करणे अशा कृत्यांसाठी ओळखला जाई. परंतु अहिल्यादेवींनी त्यांच्यातील शौर्य, निसर्गाचे ज्ञान आणि सहनशीलता ओळखली आणि त्यांना समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली. अहिल्यादेवींनी त्यांच्या जीवनात स्थिरता आणि आर्थिक सुरक्षितता यावी यासाठी त्यांना शेतजमिनी, शेतीची उपकरणे आणि घरे बांधण्यासाठी मदत पुरवली. हे केवळ त्यांचे पुनर्वसन नाही, नवीन मूल्यांची रुजवणूक होती

त्यांना 'भिलकवडी' नावाचा खास कर वसूल करण्याचा हक्क देण्यात आला. या अंतर्गत, वाटसरू आणि यात्रेकरू यांना संरक्षण पुरवण्याच्या बदल्यात भिल्ल आपली उपजीविका चालवण्यासाठी कर घेऊ शकत होते. मात्र, त्याचबरोबर कोणत्याही प्रवाशावर अन्याय झाल्यास किंवा लूट झाल्यास त्याची जबाबदारी भिल्लांवरच राहील, अशी कठोर पण न्याय्य अट घालण्यात आली होती. ही एक सामाजिक कराराची रचना होती, जी विश्वास, जबाबदारी आणि सन्मानावर आधारित होती. अहिल्यादेवींनी समाजावर दाखवलेला हा विश्वास केवळ एक शासकीय धोरण नव्हते, तर तो माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा धर्म होता.

आंतरजातीय विवाहाला दिलेला पाठिंबा : समतेचा क्रांतिकारी आरंभबिंदू
लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी व्यक्तीच्या जात-धर्मापेक्षा गुणवत्ता, निष्ठा आणि पराक्रम या गुणांना अधिक महत्त्व दिले. हे त्यांचे केवळ वैचारिक अधिष्ठान नव्हते, तर त्यांनी ते आपल्या प्रत्यक्ष जीवनात कृतीत उतरवले. याचा उत्तम दाखला म्हणजे त्यांनी आपली मुलगी मुक्ताबाईचा विवाह हिचा आंतरजातीय विवाह. पराक्रमी सरदार यशवंतराव फणसे हे अहिल्यादेवी यांचे जावई होते. त्यावेळच्या सामाजिक रूढींना छेद देणारे हे एक अत्यंत धाडसी कृत्य होते. हा केवळ त्यांचा वैयक्तिक निर्णय नव्हता, तर समाजात सुधारणा घडवून आणणारा एक क्रांतिकारी विचार होता.

त्या काळात हा निर्णय प्रचलित असलेल्या सामाजिक व्यवस्थेला आव्हान देणारा होता. कारण, स्त्रियांचे विवाह सामाजिक प्रतिष्ठेशी जोडलेले होते आणि ते केवळ जातिव्यवस्थेच्या चौकटीतच मान्य होऊ शकत होते. मात्र, अहिल्यादेवींनी स्पष्टपणे सांगितले की, "जे लोक समाजासाठी शौर्य दाखवतात आणि निष्ठेने त्याचे रक्षण करतात, तेच आपले खरे धन आहेत आणि त्यांनाच समाजात मान-सन्मान मिळायला हवा."

या भूमिकेतून त्यांनी समाजात रूढ असलेला जातिभेद, सामाजिक प्रतिष्ठा आणि तथाकथित उच्च कुळाचा मुखवटा फाडला आणि समतेवर आधारित विवाह संस्थेचा एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांच्यासाठी कन्यादान केवळ एक कौटुंबिक कर्तव्य नव्हते, तर तो सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग होता आणि त्यांनी त्याचा उपयोग एकात्मता साधण्यासाठी केला. 

 अहिल्याबाई होळकर यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे सामाजिक समतेचा, सर्वसमावेशकतेचा आणि माणुसकीचा जगता-जागता आदर्श होय. त्यांनी शासन करताना कधीच जाती-धर्माचा भेद केला नाही. मंदिरांचे बांधकाम असो, पाण्याच्या सुविधा असोत, वा आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह – प्रत्येक कृतीतून त्यांनी सामाजिक समरसतेचे बळकट पायाभूत मूल्य मांडले.त्यांच्या संपूर्ण प्रशासनाचे अधिष्ठान होते – भेदभावमुक्त न्याय, धर्माधारित सेवा आणि सर्वसमावेशक नेतृत्व. या मूल्यांमुळेच अहिल्याबाईंचं नेतृत्व आजच्या काळातही सामाजिक विषमता, लिंगभेद, राजकीय अस्थिरता अशा समस्यांवर उपाय दाखवणारा एक आदर्श ठरतो.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं जीवन आणि कार्य हे केवळ इतिहासातील एक सुवर्णपान नाही, तर न्याय, करुणा आणि समतेच्या अधिष्ठानावर उभा असलेल्या उत्तम शासनाचा कालातीत आराखडा आहे.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी : सामाजिक समरसतेची कृतिशील राज्यकर्ती
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (35), संस्कृती (34), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.