पुण्यात "तंजावरचे मराठे" या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत "छत्रपती शिवराय" हे स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा असल्याचे बोलत होते. त्यातच त्यांनी रायगडावरील समाधीचे आणि शिवमहोत्सवाचे लोकमान्य टिळकांनी पुनरूज्जीवन केल्याचे म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांनी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी क्रांतीज्योती महात्मा फुले यांनी शोधली की, लोकमान्य टिळकांनी? यावर मोठा वाद पेटला आहे. यातील तथ्य नक्की काय आहे, याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न...

१८१८ नंतर किल्ले रायगडावरील घडामोडी
१) १८१८ ला रायगड इंग्रजांनी जिंकून तो इंग्रज अंमलाखाली आणला. इंग्रजांनी रायगड जिंकल्या नंतर त्यावर कोणालाही जाण्यासाठी बंदी घातली जवळपास ६५ वर्ष रायगडावर कोणालाही जाण्यासाठी परवानगी मिळत न्हवती.
२) रायगडावरील बंदी निघाल्या नंतर जी व्यक्ती पहिल्यांदा रायगडावर गेली ती म्हणजे जेम्स डग्लस. हा डग्लस त्याच्या A book of bombay ह्या पुस्तकात सांगतो की मला रायगडावर पाचाड मधील श्रीधर भगवान शेट सोनार हे रायगड ला घेऊन जात व तो शिवाजीबद्दल अनेक दंतकथा सांगे .
३) इ. स १८८३ पर्यंत रायगडावर कोणी गेल्याचे रेकॉर्डस् मध्ये दिसत नाही. हिथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डग्लस त्याचा पुस्तकांत कोणी एक इंग्लिश महिला प्रवाशी हिने रायगड प्रवास केला होता असे सांगतो पण ती गडावर गेली न्हवती म्हणून हिथं कोणी ही गफलत करू नये.
४) इ. स १८८५ च्या सुमारास गोविंद बाबाजी जोशी हे रायगडावर गेले आणि त्यांनी नंतर रायगड वरच्या शिवसमाधीची बातमी वर्तमान पत्रातून प्रकाशित केली त्यांनी १८८७ मध्ये रायगडावर पहिले पुस्तकं लिहले त्यात त्यांनी समाधीचा व जगदीश्वर ( वडेश्र्वर् ) मंदिराचा जीर्णोध्दाराचा अंदाजे खर्च त्यात दिला.
५) इ. स १८८५ मध्ये शिवसामधीची बातमी वर्तमान पत्रातून प्रकाशित झाल्यावर तत्कालीन मुंबईचे गवर्नर सर रिचर्ड टेंपल ह्यांनी रायगडला भेट दिली त्यांचा बरोबर कॅप्टन पिट हे होते. त्यांना समाधी बघून खेद झाला असं ते त्यांच्या पुस्तकांत लिहतात.
६) इ. स १८९५ पर्यंत समाधीचा प्रकरण रेंगाळत होता. नंतर टिळकांनी हा प्रश्न हाती घेऊन आणि हा प्रश्न निकाली लावला.
7) इसवीसन 1885 साली न्यामुर्ती रानडे आणि कोल्हापूरचे छत्रपती गादीचे आबासाहेब घाटगे यांच्या पुढाकाराने पुणे येथे शिवसमाधी जिर्णोधारासाठी सभा झाली. आबासाहेब घाटगे यांनी रायगडावर मनुष्य पाठवून शिवसमाधीवरील छत्रीसाठीचा खर्च वर्तविला. परंतु, 1886 साली त्यांच्या मृत्यूनंतर जिर्णोद्धाराचे काम होऊ शकले नाही
8) एप्रिल 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवस्मारकाबाबत लेख लिहिण्यास सुरूवात केली. पंतप्रतिनिधी सेनापती दाभाडेंच्या वंशंजांनी हिराबागेतील सभेत लोकमान्यांकडे जबाबदारी दिली.
9) लोकमान्यांनी 1896 मध्ये शिवजन्म आणि शिवपुण्यतिथीचा सोहळा सुरू केला. शिवजयंती उत्सवाला कुलाब्याचे कलेक्टर लॅब साहेब यांनी परवानगी नाकारली. लोकमान्यांनी महाबाळेश्वरचे गवर्नर यांना विनंती करून परवानगी मिळवली. आणि 15 एप्रिल 1896 मध्ये शिवजयंतीचा उत्सव रायगडावर झाला. त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकला. त्यांना 18 महिन्यांची शिक्षा झाली.
10) 1906 मध्ये होणाऱ्या उत्सवाचे अध्यक्ष दाजी आबाजी खरे यांनी ब्रिटीश सरकारकडे समाधीच्या जिर्णोद्धारासाठी परवानगी मागितली. 2 मे 1907 रोजी सरकारने ठराव क्रमांक 4454 नुसार 5000 रूपये देण्याचे मान्य केले. इ.स. 1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालून त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली. इ.स.1911 रोजी करे यांनी सरकारकडे चौकशी केली. सरकारने नकाशे अंदाजपत्रक व स्मारकाचे प्रत्यक्ष काम सरकारमार्फत झाले पाहिजे, ही अट ठेवण्यात आली. त्यामुळे कमिटीने टिळक येईपर्यंत स्मारकाचे कार्य तहकूब ठेवले होते. या दरम्यान स्मारक कमिटीकडे 25000 रूपये जमा केली होते. ते पैसे डेक्कन बॅंकेत ठेवले होते. परंतु डेक्कन बॅंक बुडीत निघाली. 1920 मध्ये टिळक निधन झाले.
11) टिळकांच्या मृत्यूनंतर नानासाहेब देशमूख स्मारक कमिटीचे अध्यक्ष झाले. चार वर्ष सतत पत्रव्यवहार केल्यानंतर सरकारी ठराव नं 7023 ता. 6-2-1925 अनुसार समाधीच्या जिर्नोद्धाराला परवानगी मिळाली. अंदाजे 19000 रूपये ठरवला गेला. त्यातील 12000 रूपये स्मारक समिती, 5000 रूपये मुंबई सरकार व 2000 रुपये पुराणवस्तू खाते यांनी द्यावे असे ठरले.
------
नंदूरबार येथील सार्वजनिक कला व वाणिज्य महाविद्यालय, विसरवाडी (ता. नवापूर) येथील समाजशास्त्राचे प्राध्यापक राकेश बी. पाटील यांनी धेतलेला हा धांडोळा..
महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवसमाधी शोधली या दाव्याला एकही समकालीन पुरावा नाही. महात्मा फुले हयात असतांना म्हणजे 1890 पर्यंत एकाही पुस्तकात, पत्रात, शासकीय दस्तऐवजात, गॅझेटियरमध्ये, आत्मचरित्रात, रोजनिशीत अथवा सत्यशोधक समाजाच्या कोणत्याही कागदपत्रात म. फुले यांनी प्रत्यक्ष रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे कुठेही लिखित स्वरूपात मुळी आढळलेच नाही.
माधवराव बागल यांनी तसा उल्लेख केला आहे, पण 1930 नंतर आणि त्यासाठी त्यांनी कोणताही म. फुलेंना समकालिन संदर्भ दिलेलाच नाही. त्यामुळे ते अधिकृत मानता येणार नाही. तसेच म. फुले समग्र वाङमयातही तसा उल्लेखच नाही. महात्मा फुलेंविषयी आदर आहे. परंतू त्यांनी शिवसमाधी शोधली हे ऐतिहासिक तथ्य वाटत नाही.
प्रतापगडावरील अफझलखानाची समाधी हरवत नाही, पण रायगडावरील शिवरायांची समाधी हरवली होती. महाआश्चर्य. म. फुलेंनी 1869-70 साली (काहींच्या मते 1880 साली) शिवसमाधी शोधली असा दावा केला जातो. त्याची नोंद 1930 नंतर (म्हणजे त्यानंतर पन्नास साठ वर्षांनी) माधवराव बागल नोंद घेतात. आणि माधवराव बागलांचा जन्म म. फुलेंच्या मृत्यूनंतर 1895 मध्ये झाला आहे. त्यामुळे म. फुलेंशी त्यांची भेट झालीच नाही. तसेच 1930 नंतर म. फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली हे माधवराव बागल यांना कसे कळले? त्याचा ते कोणताही संदर्भ देत नाहीत.
प्रबोधनकार ठाकरेंच्या 'रायगडयात्रा दर्शन माहिती' या पुस्तकात कुठेही म. फुलेंच नाव आलेलं नाही. वास्तविक पाहता प्रबोधनकार हे सत्यशोधक समाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते. तरीही आपल्या "रायगडयात्रा दर्शन माहिती" या पुस्तिकेत शिवरायांच्या समाधीचा सविस्तर इतिहास स्पष्ट करतांना त्यात म. फुलेंचा उल्लेखच ते करत नाहीत. उलट कै. तात्या टिपणीस यांनी 1896-97 मध्ये ही समाधी शोधून काढली असं प्रबोधनकार सांगतात.
म. फुले समग्र वाङमयात कोणत्याही पानावर शिवरायांच्या समाधीचा उल्लेखच नाही आणि रायगडाचा उल्लेख त्यात फक्त एकदाच आला आहे. तो शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाच्या निमित्ताने.पंढरीनाथ पाटील यांनी यांनी आपल्या 'म. जोतिराव फुले' या पूस्तकात फुलेंनी शिवसमाधीचा शोध लावल्याचा उल्लेख केला असला तरी त्याविषयी त्यांनी कोणताही समकालिन संदर्भ दिलेला नाही. तसेच म. फुलेंनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधल्याचे आणि ती समाधी मोडकळीस आल्याचे त्यांनी दिनबंधू पत्रिकेच्या कोणत्या अंकात लिहिले आहे, ते पंढरीनाथ पाटील यांनी सांगितलेच नाही. तसेच म. फुले यांनी कोणत्या वर्षी रायगडावर जाऊन शिवसमाधी शोधली हे येथे नमूद केलेलेच नाही. काही ठिकाणी हे वर्ष 1869-70 सांगितले जाते. महात्मा फुलेंच्या जीवनाशी संबंधित बारीकसारीक गोष्टींच्या अगदी तारखेनुसार समकालिन नोंदींसह पुरावे उपलब्ध आहेत, परंतू त्यांनी शिवसमाधीला भेट दिल्याच्या घटनेची आणि त्यानंतर आयोजित केलेल्या हिराबागेतील सभेची तारीखच कुठे सापडत नाही. हा विरोधाभास नाही का? त्यामुळे पंढरीनाथ पाटील यांचे सदर लिखान वैध आणि वैश्वासार्ह वाटत नाही. त्यामुळे ते पुरेशा संदर्भाअभावी एक ऐतिहासिक तथ्य म्हणून ग्राह्य धरता येणार नाही.
पेशवेकाळात (फुलेंच्या कारकिर्दीच्या पूर्वी) त्या समाधीला दिवाबत्ती केली जात असल्याच्या नोंदी आहेत. विशेष म्हणजे जेम्स डग्लस या इंग्रजाने आपल्या 'A Book of Bombay' या पुस्तकात नमूद केल्यानुसार 1882 मध्ये त्या शिवसमाधीला त्याने भेट दिल्याचा उल्लेख आहे आणि ती धुळ खात पडलेली त्याला आढळली. परंतु त्याही पुस्तकात कोणत्याही पानावर म. फुलेंचा उल्लेखच नाही. आणि विशेष म्हणजे फुलेंनी 1882 पूर्वीच (1870 किंवा 1880 मध्ये) शिवसमाधीला भेट देऊन तिची साफसफाई केल्याचा दावा केला जातो. मग त्यानंतर 1882 मध्ये ती समाधी धुळ खात पडलेली कशी आढळली? मधल्या काळात (1870 ते 1882) फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही का? हे 'Book of Bombay' पुस्तक माझ्याकडे आहे, म्हणून खात्रीने सांगू शकतो.
- प्रा. राकेश पाटील
--------
महापुरूषांना त्यांच्या ऐतिहासिक कालखंडात जाऊन अभ्यासायला हवे. जातीय राजकारणाच्या चष्म्यातून पाहाणे महापुरूषांचा अवमानच आहे...
--------
संदर्भ
१) रायगडाची जीवनकथा
२) रायगड दर्शन
३) बॉम्बे इंग्लिश रेकॉर्ड
४) ए बुक ऑफ बॉम्बे
५) shivaji and the rise of the mahrattas – sir Richard temple
सोबत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने घेतलेली पत्रकार परिषदेची व्हिडीओ लिंक..
https://www.youtube.com/watch?v=tOlt5dZeqno