संघाविरोधात डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून 'फेक नरेटीव्ह'

विशेष वृत्त, पुणे:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलीन करण्यासाठी सोशल मीडियावर एका विशिष्ट षड्यंत्राद्वारे 'फेक नरेटीव्ह' (खोटा प्रचार) पसरवला जात असल्याचे समोर आले आहे. जुलै २०२६ नंतर सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर्ससह काही डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म्स अर्धसत्याचा आधार घेत संघाविरोधात अपप्रचार करत आहेत. व्हीएसकेच्या ऑगस्ट २०२६ च्या सोशल मीडिया अभ्यास अहवालात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
या अभ्यासानुसार, द वायर, मानुशी इंडिया, कारवान, मोलिटीक्स इंडिया, निरज रिपोर्ट, द स्वतंत्रता, द रेड इंडिया, आणि द रॅशनल यांसारख्या विविध डिजिटल चॅनल्सचा या अपप्रचारात समावेश आहे. एकट्या महाराष्ट्रात डाव्या व विशिष्ट चळवळींशी निगडित १०० हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्सवरून संघाविरोधात खोटी माहिती पसरवली जात आहे. शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर संघाने देशभरात यशस्वीरीत्या राबवलेले गृहसंवाद अभियान, हिंदू संमेलने, प्रमुख जनसंगोष्टी आणि आगामी 'युवा संवाद' उपक्रमांमुळे विरोधकांमध्ये वैफल्य आले आहे. या जनसंपर्काची धास्ती घेत संघविरोधी विचारसंस्थांनी कुंभाड रचण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये संघाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, संघाची नोंदणी, राममंदिर आंदोलन आणि मुस्लिमविरोधी प्रतिमा तयार करणे अशा संवेदनशील मुद्द्यांवरून बुद्धिभेद केला जात आहे.
- 'डिजिटल व सोशल लिंचिंग'
१. बुद्धिभेदाचा प्रयत्न: "संघात प्रवेश केल्यावर व्यक्तीचे कौटुंबिक व वैयक्तिक जीवन संपते", अशा स्वरूपाचे तथ्यहीन आरोप करून तरुणांना संघापासून दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे. याशिवाय सरसंघचालक, संघाचे वरिष्ठ अधिकारी व स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.
२. प्रत्यक्ष हल्ले व अडथळे: केवळ डिजिटल विश्वातच नव्हे, तर प्रत्यक्ष क्षेत्रातही स्वयंसेवकांना लक्ष्य केले जात आहे. नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे 'जॉईन आरएसएस'चा टेबल उध्वस्त करून कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यात आली. विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमधील राष्ट्रीय कार्यक्रम उधळून लावणे आणि स्वयंसेवकांची माहिती सार्वजनिक करून त्यांचे 'सोशल लिंचिंग' करण्याचे प्रकार वाढले आहेत.
- वैफल्यग्रस्त इकोसिस्टीम
समाजाने पूर्णपणे नाकारल्यानंतर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काही संस्था, संघटना आणि परदेशी निधीवर चालणाऱ्या आस्थापनांकडून हे षड्यंत्र रचले जात आहे. सोशल मीडियावर पूर्णपणे खोटा व संदर्भाहीन मजकूर प्रसिद्ध करून वातावरण दूषित केले जात असून, येत्या काळात या अपप्रचाराची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
(संदर्भ - व्हीएसके सोशल मीडिया स्टडी, ऑगस्ट २०२६)