संत तुकाराम महाराज, सुप्रसिद्ध अभंगातून वृक्ष,वेली यांची महती सांगतात.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती

हिरवागार निसर्ग आणि वर्षाऋतू यांचं एक अनोखं नातं आहे. हिरवा शेला पांघरलेली सृष्टी किती मोहक दिसते! पण वाढतं शहरीकरण, लोकसंख्या व वाढत जाणारी‘एकदा वापरा व फेकून द्या’ वृत्ती - यामुळे कारणांमुळे नैसर्गिक जंगलांची जागा सिमेंटच्या जंगलाने घेतली. निसर्गाचा विनाश ओढवू लागला. परिणामी त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत.
वायूनां शोधका: वृक्षा: रोगाणाम पहारका:!
तस्माद रोपेण मेतेषाम रक्षणंच हितवहम्!
या संस्कृत श्लोकाचा अर्थच वृक्षाचं असणं आरोग्यासाठी किती महत्वाचं हे सांगतो. वृक्ष वायुला शुद्ध करतात आणि रोगांनाही दूर करतात. वृक्षवेली लावणे त्यांची निगा राखणे यासाठीच गरजेचं आहे. झालेली जंगलतोड वर्ष-दोन वर्षात भरून निघणार नाही व निसर्गाशिवाय मानवी जीवन अशक्य... मग यावर उपाय काय तर...
१) अगदीच तुरळक प्रमाणात शिल्लक असलेली घनदाट जंगले आणि नैसर्गिक देवराया, त्यापैकी एकही झाड तोडायचं नाही. *''झाडं लावा झाडं जगवा'' सगळं खरं हो, पण सगळ्यात आधी, झाडं तोडणं पूर्ण थांबवलं गेलं पाहिजे. एक मोठा वृक्ष येण्यास अनेक वर्षे लागतात.
२) आपल्या राहत्या सदनिकेच्या गच्चीमधे कुंडीत फुलझाडं, भाजीपाला, औषधीवनस्पतींची रोपं लावू शकतो. आंब्याच्या पानातून भरपूर ऑक्सिजन पुरवठा होतो. त्याचप्रमाणे बेल, तुळस ही आपल्याला पूजेला लागतो. बेलाचे अनेक औषधी उपयोग आहेत. आपल्या पूर्वजांनी अध्यात्माला आरोग्याची जोड देऊन वनस्पती, वृक्ष, वेली यांचे महत्व अधोरेखित केले आहे. आपल्या बागेत उमललेली फुलं बघून आपल्याला किती आनंद होतो ना! दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न करतात ही फुलं. म्हणून घरात फुलझाडं असावीतच. घरात मुलं आणि कुंडीतील फुलं यासारखा निर्मळ आनंद देणारं दुसरं कोणी नाही!

जिथे बागेसाठी जागा नाही तिथे एखादा कोपरा देशी रोपटी लावून हरित सजवावा.
3) घरी वापरलेल्या फळांमधील बिया साठवून पावसाळ्याच्या सुरवातीस त्या रुजवून रोपटी तयार करावीत व 2-3 वर्षां पर्यन्त त्यांची वाढ झाल्यानंतर ती मोकळ्या जागेत लावून सक्षम होईपर्यंत त्यांचे संगोपन करावे म्हणजे पुढे त्यांची नैसर्गिकपणे वाढ होऊन त्यांचा वृक्ष नक्कीच होईल.
आपल्या घरातील, गॅलरीमधील बागेत रोपं लावताना, त्यांची वाढ होताना आपल्या घरातील बच्चे कपंनीना सहभागी करून घ्यावं. रोप कसं लावावं, कुंडी कशी भरावी, खत घालणं, पाणी देणं या सर्वात मुलांना सहभागी करून घ्यावं. लहान मुलांना फुलझाडं, फळझाडं, भाजीपाला याची ओळख करून द्यावी. यामुळे त्यांचं निसर्गावरील प्रेम वाढेल. या कामात त्यांचा सहभाग, पुढील पिढी निसर्गप्रेमी होण्यास नक्कीच मदत होईल. निसर्गाचे संगोपन व रक्षणही करण्यास आपण मुलांना शिकवू शकू.
चला तर पावसाळा सुरु झालाय लागूया कामाला.
- निलिमा नंदूरकर, अभ्यासक
खूप खूप धन्यवाद
Nilima Nandurkar
07 Jul 2025 10:30