शून्याच्या शोधाचे गुढ रहस्य...
आर्यभट्टाने दशमान पद्धतीचा पाया रचत शून्याची संकल्पना वापरली होती. ब्रह्मगुप्ताने त्याचा उल्लेख स्पष्ट केला असला, तरी पाश्चिमात्य जगाला हे ज्ञान अरबांकडून मिळाले असे मानले जाते. पण शून्याचे हे ज्ञान अरबांपर्यंत कसे पोहोचले असावे? काही जण असे मांडतात की भारतीय उपखंडात आणि अरब द्वीपकल्पात व्यापारी संबंध असल्यामुळे ज्ञानाची देवाण घेवाण झाली असावी. परंतु याची तपशीलवार मांडणी केली व सर्व बाजूंचा अभ्यास केला की या गृहितकात चुका असल्याचे लक्षात येते.
सत्य हे आहे की अरबांकडे हे ज्ञान कश्यप ऋषींच्या ‘कश्यप मारू’ म्हणजेच आजच्या काश्मीर मधून बर्माकच्या माध्यमातून अब्बासीदांकडे पोहोचले. मात्र हे ज्ञान सहजासहजी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही.
आज जर असे म्हटले की यासाठीही अब्बासीदांनी ‘जिहाद’ केला होता, तर कदाचित त्याकडे दुर्लक्ष केले जाईल. पण इतिहासातील या घटनेची माहिती फार कमी लोकांना आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने, ‘शून्याच्या ज्ञानाच्या’ जागतिक प्रसाराबद्दल फारशी ज्ञात नसलेला हा इतिहास जाणून घेऊया:
बल्ख प्रांतात (म्हणजे आजच्या काश्मीर पासून अफगानिस्तान पर्यंतचा भूभाग) ‘बर्माकिद’ नावाचा एक सांप्रदाय वास्तव्यात होता. ‘बर्माकिद’ पहिल्या शतकातील समाजाच्या बौद्धिक वर्गातील महत्वाचे घटक होते. ते मूळचे बौद्ध तत्वज्ञानाचे अनुयायी होते. त्यामुळे, गणित, खगोलशास्त्र, भूगोल अशा विविध विज्ञानांमध्ये ‘बर्माकिद’ पारंगत होते व भारताबाहेर दुर्लभ असलेल्या ‘संस्कृत’ भाषेचे देखील त्यांना ज्ञान होते.
परंतु उमय्याद सैन्यांच्या ‘जिहादी’ हल्ल्यांमुळे या सांप्रदायाला नाईलाजास्तव इस्लामचा स्वीकार करावा लागला. त्यांचे ज्ञान पाहता अब्बासीद खलिफात मध्ये ‘बर्माकिद’ना प्रशासनात महत्वाचे स्थान देऊन संस्कृतमधील वैज्ञानिक दृष्ट्या सर्व महत्वाच्या ग्रंथांचे अरबी भाषेत त्यांच्याच माध्यमातून भाषांतर करून घेण्यात आले व त्यानंतर या सर्व महत्वाच्या संस्कृत साहित्याचा नाश करण्यात आला. अशा प्रकारे हे सर्व ज्ञान पाश्चिमात्य जगासाठी मूळतः ‘अरबी’ झाले. ही केवळ कथा नाही तर खरा खुरा इतिहास आहे. या घटनांचा तपशील पुढे पाहूया.
मूळ विषयात हात घालण्या आधी, ‘शून्याचा’ इतिहास काय ते जाणून घेऊया :
शून्याचा इतिहास काय सांगतो?
संशोधनातून असे देखील पुढे आले आहे की “शून्याच्या शोध नक्की कोणी लावला आणि कधी लागला याचे निश्चित उत्तर जरी सध्या माहीत नसले तरी संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे की शून्याचा शोध भारतातच लागला. काही कथा सांगतात की प्रथम शून्याचा शोध बाबिलोनमध्ये लागला आणि नंतर मायान संस्कृतीतही त्याचा शोध लागला. मात्र, या दोन्ही शोधांचा संख्यात्मक पद्धतीवर कोणताही प्रभाव पडला नाही. पाचव्या शतकाच्या मध्यकालीन काळात हिंदूंनी भारतात तिसऱ्यांदा शून्याचा शोध लावला.
भारतीय उपखंडात आजवर उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन गणितीय दस्तऐवज म्हणजे भक्षाली हस्तलिखित, जो १८८१ मध्ये पाकिस्तानातील पेशावरजवळील भक्षाली गावात सापडला. या ग्रंथाची अचूक तारीख निश्चित करण्यात अद्याप अपयश आले आहे. त्यात शून्याचा एक प्रतीक म्हणून उल्लेख आढळतो.
अनेक विद्वानांचे मत आहे की प्राचीन भारताने मानवसभ्यतेच्या प्रगतीस दिलेले सर्वात मौलिक योगदान म्हणजे शून्याचा शोध आणि दहाधारी संख्यापद्धतीचा विकास. या प्रणालीमध्ये ९ अंक आणि शून्याचे प्रतीक वापरून स्थानिक मूल्य प्रणालीचा आधार घेतला जातो, ज्यामुळे कोणतेही संख्यात्मक मूल्य अचूकपणे दर्शवता येते. ही प्रणाली वेदांमध्ये आणि वाल्मीकी रामायणातही आढळते.
इ.स.पूर्व ३००० च्या सुमारास हडप्पा, मोहनजो-दाडो आणि इतर सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या स्थळांवरील उत्खननात या गणितीय प्रणालीचा वापर असल्याचे पुरावे मिळाले आहेत. दहाधारी स्थानमूल्य पद्धती आणि शून्याचा वापर स्पष्टपणे दर्शविणारा सर्वात प्राचीन लिखित दस्तऐवज जैन ग्रंथ लोकविभाग आहे, जो इ.स. ४५८ मध्ये रचला गेला. या ग्रंथात संख्यांसाठी संस्कृत संख्यानामे वापरण्यात आली आहेत.
दहाधारी अंकांसाठी विशेष प्रतीकांचा आणि शून्यासाठी ठळक चिन्ह (लहान वर्तुळ) यांचा प्रथम ठोस पुरावा ग्वालियरच्या चतुर्भुज मंदिरातील इ.स. ८७६ मधील शिलालेखात सापडतो. या व्यतिरिक्त सहाव्या शतकातील तांब्याच्या फलकांवरही लहान 'o' चिन्हे आढळली असली, तरी त्यांची ‘शून्य’ म्हणून संबोधले गेले असण्याची शक्यता संशयास्पद मानली जाते.
बर्माकिदांचे मूळ काय?
बर्याच अरबी लेखकांच्या मते, बर्मक हे मूळचे इराणी होते आणि बल्खजवळील नौबहार येथील अग्निमंदिराचे प्रधान पुरोहित होते. ‘मुरुज उध धहब’ या ग्रंथात अल-मसूदी लिहितो की, बर्मक हे कुटुंबप्रमुख मुळात माजूस (झरथुस्त्र उपासक) होते आणि नौबहार येथील भव्य अग्निमंदिराचे मुख्य पुजारी होते. तो पुढे नमूद करतो, "या पदावर असलेल्या व्यक्तीला त्या प्रदेशातील राजे आदराने वागवत असत. तसेच, मंदिरासाठी दिलेल्या संपत्तीचे संपूर्ण व्यवस्थापन त्यांच्याच हाती असे. या उच्च पदाला ‘बर्मक’ असे संबोधले जाई, आणि याच पदनामावरून बर्मकी (बर्मकाइड) ही संज्ञा प्रचलित झाली. कारण खालिद बिन बर्मक हा अशाच एका महान पुरोहिताचा पुत्र होता.
" मात्र, अलीकडच्या संशोधनांनुसार, बर्मक हे इराणी नसून उत्तरेकडील भारताशी, विशेषतः काश्मीरशी संबंधित होते. तेहरान विद्यापीठातील प्रा. झबीउल्लाह सफवी यांनी आपल्या ‘बर्मिक्यन्स’ या महत्त्वपूर्ण ग्रंथात ही मांडणी केली आहे. तसेच, सय्यद सुलैमान (अरब-ओ-हिंद के ताल्लुकात, 1930) यांचाही याच मताकडे कल असून, नौबहार हे झरथुस्त्र उपासकांचे अग्निमंदिर नसून बौद्ध मंदिर होते, असे ते ठामपणे प्रतिपादन करतात. मध्य आशियाच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक डब्ल्यू. बार्थोल्डही या मताशी सहमत आहेत आणि नौबहार हे प्रत्यक्षात बौद्ध विहार असल्याचे ते मान्य करतात.
विद्वान आर. एस. पंडित यांच्या मते, ‘बर्मक’ हे नाव मूळ भारतीय असून त्याचा उगम भारतातच झाला आहे. ते पुढे स्पष्ट करतात की, "बर्मक कुटुंब जरी इस्लाममध्ये धर्मांतरित झाले असले, तरी त्यांचे समकालीन कधीही त्यांना खऱ्या अर्थाने मुस्लिम मानत नसत किंवा त्यांच्या धर्मनिष्ठेवर विश्वास ठेवत नसत" (इब्न-अल-नदीम याच्या अल-फिहिरिस्त या ग्रंथात याचा उल्लेख आहे).
बर्मक परिवाराने हिंदू विद्वानांना बगदादमध्ये आमंत्रित करून त्यांना आपल्या रुग्णालयांचे प्रधान वैद्य बनवले. तसेच, त्यांनी या विद्वानांकडून वैद्यकशास्त्र, विषविज्ञान, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील संस्कृत ग्रंथांचे अरबी भाषेत अनुवाद करवून घेतले.
‘बर्मक’ शब्दाचे उगम
प्रा. सी. एस. उपासक (अफगाणिस्तानातील बौद्ध धर्माचा इतिहास) यांच्या मते, 'बर्मक' हे नाव 'वरा-आरामिक' या संस्कृत शब्दावरून तयार झाले आहे, ज्याचा अर्थ 'आराम किंवा बौद्ध विहाराचे प्रमुख व्यवस्थापक' असा होतो. 'आरामिक' म्हणजे 'आराम' किंवा 'संघाराम' (बौद्ध विहार) ची देखभाल करणारा अधिकारी, जो संघाच्या नियुक्तीने त्या विहाराच्या संपत्तीची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतो'.
नवविहाराकडे सुमारे १५०० चौ. किमी एवढे विस्तीर्ण भू-संपत्तीचे स्वामित्व होते, त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी अनेक आरामिक नेमले गेले होते. या सर्व आरामिकांचा प्रमुख 'वरा-आरामिक' म्हणून ओळखला जात असे.
बर्माकिदांची ‘काश्मिरी’ पार्श्वभूमी आणि बर्माकचे धर्मांतरण
इ.स.च्या पहिल्या शतकात, महान कुषाण सम्राट कनिष्काने आयोजित केलेल्या बौद्ध महासभेतून परतताना, तोखारीय भिक्षू घोषकाने बल्ख येथे पश्चिम वैभाषिक परंपरेची स्थापना केली. ही परंपरा काश्मीरमध्ये फुललेल्या सर्वास्तिवाद पंथाची तत्त्वज्ञान शाखा होती. घोषकाने स्थापन केलेल्या ‘नव विहार’ या नव्या मठाने लवकरच रेशीम मार्गावरील बौद्ध अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रतिष्ठा मिळवली होती.
शतकानुशतके नव विहार एका विशिष्ट पुजारी घराण्याच्या नेतृत्वाखाली होते, जे काश्मिरी वंशाचे असल्याचे दिसते. हे वंशपरंपरागत प्रमुख प्रमुख म्हणून ओळखले जात; स्थानिक उच्चारानुसार त्यांना बर्मक म्हटले जाई.
नव विहारच्या अलीकडील धर्मांतरितांपैकी एक त्याच मठाचा मुख्य धर्मगुरू होता. इ.स. ७०८ मध्ये तुर्की शाही पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी इस्लाम स्वीकारलेल्या त्या मुख्य धर्मगुरूचा शिरच्छेद केला. त्या कुटुंबातील एकमेव उरलेले मूल त्याच्या मातेसह आधीच काश्मीरला गेले होते. काश्मीरमध्ये त्या पुढच्या बर्मकने ज्योतिष, वैद्यक आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.
इ.स. ७१५ मध्ये उमय्यद सैन्याने बल्खवर निर्णायक विजय मिळवला आणि नव विहारचा भीषण विध्वंस घडवला. जीव वाचवण्यासाठी, बर्मक व त्याच्या कुटुंबाने इस्लाम स्वीकारला असावा आणि त्यानंतर तो उमय्यद दरबारात पोहोचला. तेथे वैद्यकशास्त्रातील त्याच्या प्रवीणतेमुळे त्याला मोठे महत्त्व मिळाले. शिवाय, त्याच्या ज्योतिषज्ञानामुळे त्याच्या कुटुंबाचा दरबारात अधिकच प्रभाव वाढला, कारण असे मानले जाते की त्याने अब्बासीयांचा भविष्यातील विजय (इ.स. ७४५) पूर्वसूचित केला होता.
बर्माकच्या पुढील पिढ्यांचे योगदान
बर्माक यांचा पुत्र खालिद इब्न बर्मकने पहिले दोन अब्बासी खलिफांच्या काळात महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर काम केले आणि त्यांचे कुटुंब खलिफांच्या कुटुंबाशी अतिशय घनिष्ठ झाले. खालिदचा मुलगा याह्या हा तरुण हारुन अल-रशीदचा शिक्षक होता आणि पुढे जाऊन तो त्याचा वझीर (प्रधानमंत्री) बनला.
याह्याचे दोन पुत्र, अबू-फदल आणि जाफर, यांनीही प्रशासनात उच्च पदे मिळवली. अरेबियन नाईट्स च्या कथांमध्ये उल्लेख असलेला तो प्रसिद्ध वझीर दुसरा-तिसरा कोणी नसून जाफरच होता. इ.स. ८०३ मध्ये, बहुधा जाफर आणि खलिफा हारुनच्या बहिणी अब्बासा यांच्यातील नातेसंबंधामुळे, बर्मक घराण्याची प्रतिष्ठा आणि सत्ता कोसळली. मात्र, त्या आधी बगदादमध्ये खलिफानंतर सर्वांत प्रभावशाली कुटुंब म्हणून बर्मकीदांची ओळख होती.
याह्या इब्न बर्मकने संस्कृतमधील खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान आणि वैद्यकशास्त्रावरील ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर घडवून आणले — यातून त्यांच्या कुटुंबाच्या विद्वत्तेचा वारसा स्पष्ट दिसतो. याशिवाय, त्याने भारताबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्या शिष्टमंडळाला पाठवले आणि सिंध व काश्मीरमधून मोठ्या संख्येने आयुर्वेदाचार्यांना आमंत्रित केले.
संस्कृति चोरण्याचा अंतिम कळस
बगदादमधील ग्रंथसंग्रहालये आणि भाषांतर केंद्रे मंगोलांनी शहर उध्वस्त करेपर्यंत, म्हणजे इ.स. १२५८ पर्यंत, कार्यरत होती. असे सांगितले जाते की टायग्रिस नदीमध्ये हजारो ग्रंथ फेकल्यामुळे तिचे पाणी शाईने काळे झाले. मात्र याने हे देखील स्पष्ट झाले आहे की बहुतांश ग्रंथ मंगोलांनी उद्ध्वस्त करण्याऐवजी ताब्यात घेतले आणि बारकाईने अभ्यासले.
तथापि, याह्या बर्मकने ज्या जोमाने संस्कृत ग्रंथांचे अरबीमध्ये भाषांतर घडवून आणले, तसा उत्साह त्यानंतर फारशा कोणातही दिसला नाही—किमान दोन शतके उलटल्यानंतर अल-बिरूनीपर्यंत तरी नाही.
लवकरच आयुर्वेदाचा प्रभाव कमी होत गेला आणि गॅलेनच्या ग्रीक (युनानी) वैद्यकशास्त्राला अधिक महत्त्व मिळाले. मात्र, अरब विद्वानांनी भारतीय अंकपद्धती आणि स्थान-मूल्य प्रणाली आत्मसात केली, ज्यामध्ये शून्याच्या वापराचाही समावेश होता. या नव्या संख्यात्मक दृष्टिकोनाने लवकरच संपूर्ण जगात गणिताच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली व फिबोनाचीच्या माध्यमातून ही भारतीय अंकपद्धती तेराव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपपर्यंत पोहोचली.
तर ही होती गोष्ट भारतात उगम पावलेल्या ‘शून्याच्या जगभर झालेल्या प्रसाराची’.
----------------
संदर्भ ः