छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यात जन्माला आलेले रामेश्वर मोठेपणी गहिरा गुरू म्हणून ओळखले जातात. आदिवासी समजाता शिक्षण, छात्रावास आणि धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. रामेश्वर ते गहिरा गुरू हा जीवनप्रवास मांडणारा हा लेख ..
- शोभा जोशी
(जनजाती - वनवासी कल्याण आश्रम पुणे महानगराची कार्यकर्ती, 9422319962)
'गहिरा गुरू ' हे नाव जरा वेगळंच वाटतंय ना?
छत्तीसगड मधील रायगड जिल्ह्यात ,पूर्वेकडे लैलुंगा ब्लाॅक आहे.तेथील दुर्गम पर्वतीय क्षेत्रात ,घनदाट अरण्यात गहिरा नावाचं गाव आहे.त्या गावातील कॅंवर जनजातीतील, बुडकी आणि सुमित्रा या दांपत्याच्या पोटी ,श्रावण अमावस्येच्या रात्री, शके १८२७ विश्र्वावसू संवत्सर म्हणजेच ३० ऑगस्ट १९०५ रोजी एक बालक जन्माला आले. त्याचे नाव रामेश्र्वर. मोठेपणी त्याचे अध्यात्मिक ज्ञान, भक्ती आणि समाजाप्रती असलेला त्यांचा प्रेमळ भाव पाहून लोक त्यांना गुरूस्थानी मानत म्हणून ते गहिरा गुरू.
रामेश्र्वरांचे बालपण ,जंगलातील इतर मुलांप्रमाणेच ,जंगलात गुरे चारण्यात गेले.लहानपणापासूनच ते धाडसी होते.गावात शाळा नसल्यामुळे शालेय शिक्षण नव्हतेच.
एकदा गावात आलेल्या साधूची दिनचर्या पाहून ते खूप प्रभावित झाले आणि ती दिनचर्या त्यांनी स्वतः अवलंबिली. त्यांनी स्वच्छतेला खूप महत्व दिले. इतरांनाही ते पटवून दिले. त्यांनी अंगणात तुळस लावून तिला रोज पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे असा दिनक्रम सुरू केला.त्यांचा आध्यात्माकडील ओढा वाढला.
वयात आलेल्या रामेश्र्वरांचे व्यक्तिमत्व मोहक होते. योग्य वयात त्यांचा विवाह झाला पण प्रथम आणि व्दितीय पत्नीच्या निधनानंतर तृतीय विवाह पौर्णिमांबरोबर झाला.काही वर्षं संसार झाल्यावर पौर्णिमाही आध्यात्माकडे वळल्या.त्यांनी वैराग्य पत्करले .पण त्यांचे आपल्या पतीवर नितांत प्रेम होते.त्यांच्या जीवनात पतीचे स्थान हारातल्या दोर्याप्रमाणे होते .हारातला दोरा दिसत नसला तरी त्यांचं हारात असणं महत्वाचं असतं अगदी तसंच.
साधूच्या प्रभावामुळे त्यांची पावलं लग्नाआधीच आध्यात्माकडे वळली होती.ते नियमित साधना करीत . रामेश्र्वरांनी सेंधडेराला जाऊन १५ दिवस सतत साधना केली.असं म्हणतात की १५ व्या दिवशी त्यांना सप्तॠषी आणि माता अरूंधतीने दर्शन दिले.त्यांच्या भोवती एक तेजोवलय निर्माण झाले.ते पाहून त्यांची मित्रमंडळी घाबरून पळून गेली.हळू हळू रामेश्र्वरांची साधना वाढत गेली.
नाना शास्रं पठे श्र्लोको ।नाना दैवत पूजनं ।आत्मज्ञानं विना पार्थ ।सर्व कर्म निरर्थकम्।।
कितीही शास्रं, श्र्लोक यांचं पठण केलं ,वेगवेगळ्या दैवतांची पूजा केली तरी आत्मज्ञानावाचून कोणतेही ज्ञान व्यर्थ आहे.या उक्तीनुसार ,अशिक्षित असलेल्या रामेश्र्वरांनी कोणतेही ग्रंथ वाचले नव्हते पण साधनेतून त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते.
१९४३ साली त्यांनी ' सनातन धर्म सन्त समाजा'ची स्थापना केली.या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सरगुजा,जशपूर इ. गावांसह शेजारील झारखंड, उत्तर प्रदेश यांना लागून असलेल्या क्षेत्रात राहाणार्या आदिवासींप्रमाणेच इतर समाजामध्ये जागरूकता आणण्यासाठी फार मोठे योगदान दिले.त्यांनी लोकांना शांती आणि सेवाव्रत अंगिकारण्यास प्रोत्साहन दिले.
राट गुहेतील शिवलिंग स्थापनेच्या वेळी त्यांना, प्रसंगवशात गंगा नावाच्या मुलीशी विवाह करणे भाग पडले . ' आधी प्रपंच करावा नेटका ' या समर्थांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड घातली होती.कमळाचं पान पाण्यात राहूनही पाण्यात बुडत नाही तसेच संसारात राहूनही ते अलिप्त होते.
त्यांना शिक्षणाचे खूप महत्व होते.त्यांनी कितीतरी शाळा आणि छात्रावास सुरू केले.त्यामध्ये संस्कृत शिकवण्यावर भर असे.
प.पू. गोळवलकर गुरूजी,स्व. बाळासाहेब देशपांडे इत्यादिंशी त्यांचे घनिष्ट संबंध होते.त्यांच्याशी नियमित झालेल्या चर्चेतून त्या क्षेत्रात ख्रिश्र्चन पाद्री करीत असलेल्या वनवासींच्या धर्मांतरणास पायबंद बसला.
शेवटपर्यंत कार्यरत असलेल्या गुरूंना वयाच्या ९२ व्या वर्षी २१ नोव्हेंबर १९९६ (देवोत्थान एकादशी) या पवित्र दिवशी देवाज्ञा झाली.त्यांचा मोठा मुलगा बब्रुवाहनने त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले आहे.
छत्तीसगड सरकारने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ' सरगुजा विश्र्वविद्यालया'चे नाव ' संत गहिरा गुरू विश्र्वविद्यालय 'ठेवले आहे.सरकारने 'इंदिरा गांधी सेवा पुरस्कार ', ' बिरसा मुंडा आदिवासी सेवा पुरस्कार ', ' शहीद वीरनारायण पुरस्कार ' या पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला. प.पू. गोळवलकर गुरूजींच्या स्मृतीप्रित्यर्थ ' गहिरा गुरू पर्यावरण पुरस्कार ' देण्यास प्रारंभ केला आहे.अशा या महान गहिरा गुरूंना त्यांच्या ३० आॅगस्ट या जन्मदिनी आदरांजली.