रामायण केवळ ग्रंथ नाही तर जीवनपद्धती आहे - किर्तनकार प्रशांत पाटील महाराज

पुणे:
रामायण आपल्याला केवळ पुण्य देत नाही, तर जगण्याची कला शिकवते. रामायणात जातीपातींचे भेद विसरून 'सामाजिक समरसता' जपली आहे. त्यामुळे रामायण केवळ ग्रंथ नाही तर जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन ह. भ. प. प्रशांत पाटील महाराज यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलन व राम नवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक शोभायात्रेने झाली. या शोभायात्रेत पाळण्यात प्रभू श्रीरामांची सुंदर प्रतिमा ठेवण्यात आली होती. भजन, कीर्तन आणि लाठी-काठीच्या पारंपरिक प्रात्यक्षिकांनी वातावरण भक्तिमय व उत्साही झाले होते. यावेळी व्यासपीठावरून धर्माचार्य प्रशांत पाटील महाराज, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्या बागेश्री मंठाळकर आणि प्रिमिअर इन्स्टिट्यूट प्रचारक प्रतिक धात्रक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पाटील महाराजांनी उपस्थितांना संबोधित करताना रामायणाचे महत्व समजावून सांगितले. प्रभू रामांनी शबरीची उष्टी बोरे खाऊन समरसतेचा आदर्श ठेवला, तोच आदर्श आपण जपला पाहिजे. हिंदू समाज असंघटित असल्यामुळेच असुरक्षित आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतराची कीड संपवण्यासाठी प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन साप्ताहिक सत्संग आणि धर्मग्रंथांचे वाचन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मंठाळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पंच परिवर्तन' या संकल्पनेवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, "सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या पाच स्तंभांवर समाजाला कार्य करण्याची आवश्यकता आहे. लव्ह जिहादसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्या मुलींना दुर्गा आणि काली बनवण्याचे संस्कार दिले पाहिजेत." भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी धात्रक यांनी हिंदू संघटना ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आपण संघटित नसलो तर आपण शक्तिशाली होऊ शकत नाही, आणि शक्ती नसल्यास राष्ट्राचे वैभवाचे स्वप्न साकार होणार नाही. पंच परिवर्तन या संकल्पना केवळ भाषणापुरत्या मर्यादित नसून त्या आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आणि प्रत्येक हिंदूने आपले सामाजिक कर्तव्य ओळखले, तरच समाजात खरा बदल घडू शकतो.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन विठ्ठल हिवराळे यांनी केली. तर कार्यक्रमाची सांगता दयाल सैनी यांनी गायलेल्या 'वंदे मातरम'ने झाली. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.