
एक सामाजिक खेळ संघटन म्हणून क्रीडा भारती ही 1992 पासून क्रीडा क्षेत्रात काम करते आहे. या काळात आपण भारतीय क्रीडा धोरणाबद्दल अनेक अभ्यासपूर्ण गोष्टी वेळोवेळी विविध स्तरावर सरकार समोर मांडल्या आहेत आणि त्याबद्दल अपेक्षा ही व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही वर्षात, खेलो इंडिया आणि फिट इंडिया यातून आपल्या अपेक्षांबद्दल मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाचा अनुभव आपण घेतला आहे. आता "खेलो भारत नीती - 2025" मधून एक नवी दिशा आणि आशा घेऊन खेळ विश्वातील उज्ज्वल भविष्य आणि उभरत्या सामर्थ्यशाली भारताची गाज ऐकू येते आहे. क्रीड़ा भारतीच्या व्हिजन मधील अनेक विषय या नीतीमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसत आहेत. खेळाच्या माध्यमातून साकार होणाऱ्या भविष्यात क्रीडा भारतीचे 32 वर्षाचे चिंतन आणि प्रयत्न याची दिशा योग्य असल्याचा आनंददायी अनुभवही येतो आहे.
या खेळ नीती मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, खेळ हा फक्त काही निवडक खेळाडूंसाठी आहे या मानसिकतेच्या पलिकडे जाऊन खेळला देशातील प्रत्येक बालक बालिका, युवक युवती, ज्येष्ठ, दिव्यांग म्हणजेच प्रत्येक व्यक्तीशी जोडणे. देशासाठी हा एक मोठा बदलाव आहे. स्पर्धात्मक प्राविण्य मिळवत असताना किंबहुना ते मिळवण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे देशात खेळ संस्कृती निर्माण करणे आणि रुजवणे. खेळ हा समाजाचा स्वभाव होणे, संस्कृतीचा अविभाज्य भाग होणे हे फार आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी मैदानावर येऊन खेळावे, याने देशासाठी अधिक संख्येने अधिकाधिक गुणवत्तापूर्ण खेळाडू निर्माण होतीलच परंतु त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपल्या सर्वांचे शरीर आणि मन सुदृढ होईल आणि देशाचे आरोग्य ठणठणीत राहील. सर्वव्यापी, सर्वसमावेशी खेळ हे सामाजिक समरसतेसाठी ही महत्वपूर्ण आहे आणि या साठी सर्वांपर्यंत पोहोचण्याची योजनाही या खेळ नीती मध्ये आहे.
खेळाला (फक्त शारीरिक शिक्षणाला नव्हे) शिक्षणात अभ्यासाबरोबर दिलेले स्थान हे पण योग्य दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. देशाच्या शिक्षण नीती मध्ये सुद्धा हे अंतर्भूत आहे. उपलब्ध मैदाने, साधने यांचा खेळासाठी अग्रक्रमाने उपयोग, स्पोर्ट्स साठी असलेल्या इन्फ्रास्ट्रक्टरचा समानतेने उपयोग, गुणवत्ता शोधन आणि विकास या साठी सक्षम यंत्रणा, खेळाडूंप्रमाणेच प्रशिक्षक, प्रशासक यांचेही प्रशिक्षण, प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, असे अनेक महत्वपूर्ण मुद्दे या खेळ नीती मध्ये आहेत. खेळाला फक्त खेळाडूं पुरते मर्यादित न ठेवता त्याला प्रशिक्षक, प्रशासक, इन्स्टिट्यूटस, शिक्षण, संशोधन आणि उत्पादन असे सर्वसमावेशक करून इकॉनॉमिशी जोडणे हा निश्चितच एक टर्निंग पॉईंट ठरेल.
खेळात पर्यटन संधी शोधणे हे भारताची भाषा, खाद्य, निसर्ग, उत्सव, परंपरा, खेळ यातील विविधता एका सूत्रात गुंफून जगासमोर ठेवण्याचा अद्भुत प्रयोग वाटतो. स्पर्धा मधून पर्यटन यात व्यावसायिक समीकरण सुद्धा आहे. त्यालाच जोडून खेळ साहित्याच्या उत्पादनावर सुद्धा भर दिलेला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासारखाच भारत येणाऱ्या काळात आता खेळ साहित्याचा उत्पादक म्हणून पुढे येताना दिसेल. खेळ आणि संबंधित सर्व्हिसेस यांचा करिअर म्हणून केलेला विचार हा युवकांसाठी जॉब आणि प्राविण्य या दोन्हीसाठी नवीन संधी मिळवून देणारा ठरेल. स्वदेशी आणि पारंपरिक खेळांचा विकास, त्यांच्या कौशल्य बिंदूना समोर आणणे, त्यांचा रचनात्मक अभ्यास करणे, त्यांचा प्रचार प्रसार करणे हे सुद्धा या नीतीचे वैशिष्ट म्हणावे लागेल. लहानपणापासून खेळ आणि शारीरिक साक्षरता (Sports and physical literacy) विकास कार्यक्रम याचा राष्ट्रीय शिक्षण नीती मध्ये समावेश खरे तर खूप आधीच होणे आवश्यक होते. समाजातील दुर्बल घटक, जनजाती, दिव्यांग यांना समान संधी मिळावी यासाठी विशेष व्यवस्थेचा विचार सुद्धा स्वतंत्र पणाने मांडला आहे.
"क्रीडा से निर्माण चरित्र का और चरित्र से निर्माण राष्ट्र का" हे क्रीडा भारतीचे बोध वाक्य राष्ट्रीय खेल नीति 2025 च्या व्हिजन स्टेटमेंट मध्ये प्रतिबिंबित झाले आहे : Sports for Nation Building - Harness the Power of Sports for Nation's Holistic Devlopment! खेळ नीती 2025 हा खरोखर एक महत्वपूर्ण बदलाव आहे. येणाऱ्या काळात यात अजूनही चांगल्या आवश्यक गोष्टी नक्कीच जोडल्या जातील. सुदृढ शरीर, स्वस्थ मन, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास यातून सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माणाचा महामार्ग खेळाच्या मैदानातून जातो यावर क्रीडा भारतीचा दृढ विश्वास आहे. नवीन "खेलो भारत नीती - 2025 मध्ये हा महामार्ग अधिक प्रशस्त आणि वेगवान होताना दिसतो आहे. आओ, मिलकर साथ चले!
विजय पुरंदरे
क्रीडा भारती
अखिल भारतीय प्रचार प्रमुख आणि नियामक मंडल सदस्य
अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र
If we want our india became powerful country in the world Every village must be sports Ground, Every school must be sports Teacher.
Every sports council not a included in a any politics..
Sunil appaso patil
20 Jul 2025 09:50
"व्यक्ती- समाज आणि राष्ट्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ"
Khune Bhaurao Narayan
18 Jul 2025 19:04