मध्ययुगातील भारतीय संत परंपरेत संत कबीरांचे स्थान अनन्य साधारण आहे. “कबीराचे दोहे” हे सुमारे पंधराव्या शतकापासून भारतीय समाज जीवनावर प्रभाव टाकतात. संत कबीरांनी अनेकांच्या अध्यात्मिक, भौतिक, सामाजिक जीवनाला दिशा दिली. त्यामुळेच रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेकांनी कबीरांना वैचारिक गुरु मानले. रवींद्रनाथ टागोरांनी कबीरांच्या दोह्यांचा इंग्रजीत अनुवाद करुन ते जगभर पोहचविले. गांधीजींच्या विचारांचा उगम कबीरांच्या संस्कारांमध्ये सापडतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना आपले गुरु मानले होते. महाराष्ट्रात घरोघरी रोज मोठ्या श्रद्धेने ज्ञानोबा ते तुकोबांचे अभंग म्हटले जातात, तसेच उत्तर भारतात घराघरात कबीरांचे दोहे मोठ्या भक्तीभावाने म्हटले जातात. संत कबीरांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे इस्लाम विषयक विचार दोन भागांच्या मालिकेतून जाणून घेऊ.

- संत कबीरांचा जन्म :
संत कबीरांच्या (Sant Kabir) जन्माबाबत अनेक दंतकथा आणि लोककथा आहेत. त्यांचा जन्म आणि जन्म तारखेविषयी अनेक मतमतांतरे आहेत. काही लोकांच्या मते, कबीर एका विधवेच्या पोटी जन्माला आले. जननिंदेच्या भीतीने तिने त्या बालकास तळ्याकाठी सोडून दिले. तळ्याकाठी ठेवलेले हे बालक निरु व निमा या मुस्लिम विणकर पतीपत्नीस सापडले व पुढे त्यांनी त्याला वाढविले, त्याचा सांभाळ केला.
कबीरांच्या जन्माप्रमाणे त्यांच्या जन्मतारखेविषयी ही मतमतांतरे आहेत. कबीरांच्या तीन वेगवेगळ्या जन्मतारखा सांगितल्या जातात. कबीर इ.स.१४४० मध्ये जन्मले असे रवींद्रनाथ टागोर मानतात. अनेक भक्त त्यांचा जन्म सन १३९८ मध्ये काशी क्षेत्री झाला यावर विश्वास ठेवतात. त्यासाठी पुरावा म्हणून कबीराचा पुढील दोहा उद्धृत केला जातो:-
चौदह सौ पचपन साल गए। चंद्रवार इक ठाठ उए। जेठ खुदी बरसायत को। पुरन मासी प्रगट भए।
या दोह्याच्या आधारे अनेक कबीरपंथी विक्रम संवत १४५५ (इ.स.१३९८) मध्ये सोमवारी ज्येष्ठ शुध्द पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कबीरांचा जन्म झाला असे मानतात व याच दिवशी ज्येष्ठ पौर्णिमेस कबीर जयंती साजरी करतात.

- कबीरांचे शिक्षण :
कबीरांच्या कालखंडात समाज जीवनात प्रत्येक पातळीवर भेदभाव होत असे. गोरगरीब तसेच वंचित वर्गातील लोकांच्या लेकरांना शिक्षणाची दारे उघडली जात नसत. कबीर तर 'निरु निमा' सारख्या मुस्लिम विणकरांच्या घरात वाढत होते. साहजिकच त्यांना तत्कालीन औपचारिक शिक्षणापासून दूर राहावे लागले.
तथापि, समाज जीवनाचे सखोल निरीक्षण, अनुभव व बहुश्रुतता यांच्या आधारे लौकिकार्थाने निरक्षर असणाऱ्या कबीरांनी सर्व समाजाला अध्यात्माचा, बंधुतेचा, माणुसकीचा मार्ग दाखवला. आपल्या शिक्षणाविषयी सांगताना कबीर एका दोह्यात म्हणतात:-
मसि कागद छुयो नहीं, कलम गहि नहीं हाथ। चार ही युग की महातम, मुखहि जनाई बात।
(मी शाई वा कागदाला स्पर्श ही केला नाही, कधी लेखणी हातात धरली नाही. पण चारही युगातील ज्ञान मी केवळ ऐकून प्राप्त केले.)
लिहिता वाचता येत नसले तरी कबीरांनी अनुभवातून आणि सत्संगातून ज्ञान प्राप्त केलेले होते. दोहे, साखी या माध्यमातून ते आपले विचार बोलून दाखवत आणि त्यांचे शिष्य ते लिहून ठेवत. त्यांचे हे विचार बानी, वचन, आदेश या नावाने ओळखले जातात. कबीरांचे शिष्य भगवानदास यांनी कबीरांच्या ६०० पदांचा संग्रह केला. तो 'बीजक' या नावाने ओळखला जातो. कबीरपंथीय 'बीजक' हा आपला धर्म ग्रंथ मानतात.
कबीर ग्रंथावली हा देखील एक महत्वपूर्ण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात कबीराचे ४०० दोहे व ८०० साख्या व इतर पदांचा समावेश आहे. कबीरांच्या रचना पुरबि हिंदी या बोलीभाषेत आहेत. या भाषेत अवधी, व्रज, भोजपुरी, खडीवाले, अरबी, फारसी अशा तत्कालीन सर्व भाषेतील शब्द मोठ्या प्रमाणात आढळतात. या भाषेला 'सुधुक्कडी' असेही म्हटले जाते. कबीरांच्या अनेक रचनांचा 'श्री गुरुग्रंथ साहेब' मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

- स्वामी रामानंद आणि कबीर
स्वामी रामानंद हे काशी क्षेत्रातील कबीरांचे समकालीन महान सत्पुरुष होते. त्यांच्याकडे अनेक जाती-धर्मातील लोक जात येत असत. ते सर्वांना वेद, उपनिषिदे, शास्त्रे इत्यादींच्या आधारे मार्गदर्शन करत असत. त्यांनीही अनेक रचनांची निर्मिती केली आहे. त्यांच्याही अनेक रचनांचा समावेश 'गुरुग्रंथ साहेब' या ग्रंथात केला गेलेला आहे. कबीरांचे स्वामी रामानंद यांच्याकडे जाणे-येणे घडत असे. स्वामी रामानंद यांच्याकडूनच कबीरांना गंगाघाटावर रामनामाची दीक्षा मिळाली असे मानले जाते. आपल्या एका साख्यात गुरु महिमा गाताना कबीर म्हणतात:-
'तीन लोक नौखंडमे गुरु ते बडा कोड़। करता करै न करि सकै गुरु ते बडा न कोह।'
- संत कबीरांचा संघर्ष
आयुष्याच्या प्रारंभीच्या कालखंडात संत कबीरांना मुल्ला, मौलवी यांच्याबरोबर संघर्ष करावा लागला. हा संघर्ष वैचारिक स्वरूपाचा होता. या संघर्षामुळे कबीरांचे चरित्र अद्भुत रम्य झालेले दिसते.
स्वतः मुसलमान समाजात जन्मले असूनही कबीर रामाचे नामस्मरण करतात आणि हिंदूच्या देव-देवतांची पूजा-अर्चना करतात. ते मुसलमान समाजातील अनिष्ठ रुढी, धार्मिक कट्टरतावादी परंपरा, अत्याचारांवर कडाडून टीका करतात म्हणून मुसलमान समाजातील मुल्ला, मौलवी, अमीर उमराव यांनी त्यांना विरोध केला.

कबीरांच्या विरोधकांनी बादशहा सिकंदर लोदी यांच्याकडे खोट्या तक्रारी करुन त्याचे मत कबीरांविषयी कलुषित केले. बादशहाने कबीरांना गंगा नदीत बुडविण्याची, हत्तीच्या पायाखाली तुडवून मारण्याची अशा शिक्षा दिल्या. पण या सर्वांतून कबीर सुखरुप बाहेर पडले. बादशहाने कबीरांचे सामर्थ्य ओळखले आणि तो त्यांना शरण गेला. त्यानंतर सर्वत्र कबीरांचा लौकिक अजूनच वाढला. कबीर एका दोह्यात लिहितात:-
'कबीर ना हमा किआ न करहिगे, ना करि सके सरीरु। किआ आनऊ किछु हरि कोआ, भइओ कबीरु कबीरु ।।'
('मी काहीही केले नाही. काही करु ही शकणार नाही. जे काही केले. जे काही घडले. ते त्या प्रभु परमात्म्याने केले. पण लोकात मात्र कबीराचे नाव झाले.) कबीरांनी कायम हिंदूंवरच ताशेरे ओढले असे आपल्याला भासवले जाते. त्यासाठी मुद्दाम त्यांच्या एकतर्फी निवडलेल्या विचारांचे दाखले आपल्याला दिले जातात. मात्र, त्यांनी मुसलमानांवर देखील वेळोवेळी विचार प्रकट केले आहेत हे आपल्याला कधीच सांगितले जात नाही.
(साभार - वायुवेग)