•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त विनम्र अभिवादन

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 4 days ago
दिन विशेष  

आद्यकवी महर्षी वाल्मिकी
जयंती निमित्त विनम्र अभिवादन


महर्षी वाल्मिकींची कथा खूपच रोचक आणि अर्थपूर्ण आहे. चांगल्या संगतीत राहिल्याने माणसाचा कसा उद्धार होतो, याचे वाल्मिकी हे एक उत्तम उदाहरण आहे. देवर्षी नारदमुनींच्या सहवासात आल्यानंतर वाल्मिकी एक थोर संत झाले, ब्रम्हर्षी झाले आणि त्यांनी सर्व जगाला अलौकिक असे 'रामायण' नावाचे महाकाव्य दिले. हिंदू धर्मात एक पवित्र धार्मिक ग्रंथ म्हणून 'रामायण'ला अनन्यसाधारण महत्व आहे. ऐतिहासिक संशोधनानुसार रामायणाचा रचना काळ  इ.स.पू. ५०२२ ते इ.स.पू. ५०४० यादरम्यान निर्धारित केला गेला आहे. रामायणाच्या अभ्यासाने माणसाच्या जीवनात शुभ परिवर्तन घडून येते. जगातील अनेक देशांतले लोक हे महाकाव्य आपल्याला भाषांतून वाचतात. अशा श्रेष्ठ संत वाल्मिकींनी आपल्याला रामायणासारखे महाकाव्य दिले, त्यांना आपण कदापीही विसरू शकत नाही. म्हणूनच महर्षी वाल्मिकींच्या जयंतीच्या निमित्ताने या महान, आद्यकवींना मनोभावे वंदन करूयात!
श्रीराम कथांचा सुंदर गुच्छ म्हणजे रामायण. खरे तर रामराज्य हेच मुळी समरसतेच्या आधारावर आहे. १० व्या शतकातील ओक्कुत रामायणात रामाची समता आणि समदृष्टी याचा उल्लेख आहे, तर तमिळ रामायणात राम सर्वराजा आहे. तेलुगू भाषेतील द्विपद रामायणामध्ये 'राज्याचा आधार म्हणजे सर्वांचे उत्थान' असा आहे. रंगनाथ रामायणात भरत-हनुमान संवादामध्ये समरसतेचा भाव दिसतो. उत्तर रामायण, मोल्ल रामायण, गोपीनाथ रामायण ही सर्व तेलुगू भाषेतली रामायणे आहेत. त्यामध्ये श्रीरामाच्या समरसतावादी चरित्राचा उल्लेख आहे. १२ व्या शतकातील कंबनकृत रामायण सांगते की, प्रभू श्रीरामाच्या राज्यात कोणत्याही प्रकारचे भेद नव्हते. सर्व प्रकारची रामायणे १० व्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत रचलेली आहेत. मल्याळी भाषेत अध्यात्म रामायण, कानडी भाषेत जेमिनी भारत रामायण, आसामच्या बोडो जातीचे 'बोडो रामायण' तिथे खूप प्रसिध्द आहे. संथाल जातीमध्ये 'संथाल रामायण' प्रचलित आहे. विर्होर जातीमध्ये शबरीच्या कथेचा सन्मानपूर्वक उल्लेख असलेले 'विर्होर रामायण' प्रसिध्द आहे. मुंडा जातीमध्ये 'मुंडा रामायण' आहे. दि बुलेटिन ऑफ ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आदिवासी, भटके-विमुक्त अशा जातींमध्ये विविध अशा २४ प्रकारच्या रामायणांचा उल्लेख आहे. सर्व भाषांमध्ये रामायण लिहिले गेले आहे. त्यातील रामकथांना समरसतेचा आधार आहे. महर्षी वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण याशिवाय जितकी म्हणून रामायणे देशभरात विद्यमान आहेत त्या सर्व रामायणांमध्ये रामाचे चरित्र आणि रामकथांचे वर्णन आहे त्या सगळ्यांचा आधार वाल्मिकी रामायण आहे, म्हणून ते  आद्य आहे.
 
हिंदू पंचांगानुसार महर्षी वाल्मिकींचा जन्म महर्षी कश्यप आणि अदितीचे नववे पुत्र असलेल्या वरुण आणि त्यांची पत्नी चर्षिनी यांचे घरी अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेच्या तिथीला झाला. महर्षी भृगु हे वाल्मिकींचे बंधू होत, तेही अत्यंत ज्ञानी होते. वाल्मिकींचा जन्मदिवस 'वाल्मिकी जयंती'  म्हणूनच देशभर साजरा केला जातो. वैदिक काळातील महान ऋषी परंपरेतील महर्षी वाल्मिकी हे 'रामायण' या महाकाव्याचे विश्वविख्यात निर्माता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते संस्कृत भाषेमध्ये निपुण होते.


महर्षींनी रामकथा लिहिली, त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या मनातील प्रेम, आपुलकी, माया आणि संवेदना किती तीव्र होत्या हेच पहायला मिळते. एके दिवशी महर्षी वाल्मिकी तमसा नदीवर स्नानासाठी जात असताना सारस पक्षांची जोडी विहार करताना, प्रणयक्रीडा करताना त्यांच्या दृष्टीस पडले. काही वेळाने एका शिकाऱ्याच्या बाणाने त्यातील नर सारसाचा वेध घेतल्याने, त्या पक्षाला तडफडून आपल्या प्राणास मुकावे लागले. त्याच्या वियोगाने सैरभैर झालेल्या मादी सारसाचा  धीर - गंभीर आवाजातील शोक आसमंतात घुमला. शिकाऱ्याची क्रूरता पाहून आणि मादी सारसाचा आक्रोश ऐकून महर्षी विव्हल झाले, त्यांचे हृदय पिळवटून गेले. त्या पक्ष्यांबद्दल त्यांच्या मनात अतीव करुणा दाटून आली. प्रणयक्रीडेमध्ये रममाण झालेल्या पक्षाची हत्या करत, त्यांना दुःखसागरात ढकलून, त्यांना एकमेकांपासून अलग करणे हे अत्यंत कठोर तर आहेच, त्यापेक्षा हा मोठा अधर्म आहे.  या प्रसंगाच्या प्रभावाने त्यांच्या मुखातून अतिशय उस्फुर्तपणे आणि उत्कटतेने शब्द प्रकटले :
मा विषाद प्रतिष्ठांत्वगम: शाश्वतीः सम:। यत् क्रौंचमिथूनादेकमवधीरू काममोहितम् ।।
 भावार्थ:- हे शिकाऱ्या (निषाद)! 'तुला कधीही शांती मिळणार नाही कारण, तू कोणताही अपराध नसताना, कामक्रीडेमध्ये मग्न असलेल्या सारस (क्रौंच) पक्षाच्या जोडीतील एकाची हत्या केली आहेस.'
 अगदी अचानक आणि सत्वरतेने आपल्या मुखातून असे श्लोक कसे बाहेर पडले असा विचार करतच महर्षी आपल्या आश्रमात पोहोचले. पुनः पुन्हा त्यांचे मन त्या श्लोकाभोवती फिरू लागले. 
 काही वेळाने आश्रमात भगवान ब्रम्हाजींचे आगमन झाले. त्यांनी महर्षींना सांगितले की, 'आपल्या मुखातून सहज गाता येईल असे तुमचे हे छंदोबद्ध काव्य श्लोकासारखे झाले आहे. माझ्या प्रेरणेतूनच तुमची वाणी अशा प्रकारे श्लोकरूपी झाली आहे. म्हणूनच आपण श्लोक रुपाने श्रीरामाच्या संपूर्ण चरित्राचे वर्णन करायला सुरुवात करा.' अशा प्रकारे भगवान ब्रम्हाजींच्या सांगण्यावरून महर्षी वाल्मिकींनी रामायण महाकाव्य लिहिण्याचा श्रीगणेशा केला.                                                                                                                                                        वाल्मिकींना जिज्ञासा झाली, त्यांनी नारद मुनींना विचारले, “ या भूतलावर सर्वश्रेष्ठ गुणसंपन्न असा कोण आहे?” तेव्हा नारदमुनी म्हणाले, “इक्ष्वाकू वंशात उत्पन्न झालेला, अयोध्यापती श्रीराम हा सर्वश्रेष्ठ गुणांनी युक्त असून सर्वांना प्रिय आहे.” हे सांगून नारदमुनींनी श्रीरामाचे गुणवर्णन करत त्याचे चरित्र थोडक्यात सांगितले. ते ऐकून अत्यंत प्रभावित झालेल्या वाल्मिकी मुनींनी आपल्या अलौकिक प्रतिभेने संपूर्ण श्रीरामचरित्र लिहिले. महर्षी वाल्मिकीरचित ऐतिहासिक रामायण महाकाव्यातील २४ हजार श्लोक आणि उत्तर रामायण खंडासहित एकूण ७ खंडांमध्ये असलेली श्रीरामांची गाथा म्हणजे तत्कालीन भारतीय उच्च संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन  होय.
प्रभू श्रीराम सफल शासक म्हणून प्रसिद्ध होते. आजही आपण रामराज्याची चर्चा करतो, त्याचे कारण म्हणजे संयत, संतुलित आणि वैयक्तिक सुखाचा त्याग करून सत्य आणि न्यायाची सदैव साथ देणाऱ्या मर्यादापुरूषोत्तमांची सहनशीलता आणि धैर्य अनुकरणीय आहेच. त्यांनी केलेला संघर्ष पाहिला तर त्यांनी राजसी सुखाचा त्याग करून संन्यासी जीवन अनुसरले, हे आज कुणालाही शक्य नाही. 
आपल्या असामान्य प्रतिभेने महर्षी वाल्मिकींनी आदर्श, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामाचा जीवनपट अत्यंत कुशलतेने उलगडलाच, परंतू ते त्या महाकाव्याचे महत्त्वपूर्ण भागीदारही  बनले.  महाराणी सीतेची स्वतःच्या कन्येसमान देखभाल करत, सेवा करत तिच्या कुश आणि लव, जे सर्वात पहिले त्यांचे शिष्य बनले, अशा या दोन सुपुत्रांना त्यांनी सत्शील आणि सन्मार्गाचे धडे देत  त्यांच्याकडून रामकथेचे गायन  करवून घेतले.
सत्वगुणी प्रवृतीच्या महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहून समस्त भारतीय समाजजीवनामध्ये 'रामराज्य' या महत्वपूर्ण शब्दाला आदर्श बनवले आहे. खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम आणि त्यांची रामकथा समग्र भारतीयांच्या हृदयामध्ये अखंड ज्योत बनून प्रज्वलित राहिली आहे. आपल्या सर्वांसाठी प्रभू श्रीरामांना, हृदयस्थ आणि प्रात:स्मरणीय केले ते महर्षी वाल्मिकींच्या विशाल आणि करुणामय ओतप्रोत भरलेल्या समरस भावनेने. खरंतर देशभरातील प्रभू श्रीरामांच्या प्रत्येक मंदिरांमध्ये महर्षी वाल्मिकींची प्रतिमा विराजमान व्हायला हवी, त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. 
महान आद्यकवी महर्षी वाल्मिकींना जयंतीदिनी शत शत वंदन!


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • महर्षी वाल्मिकी
  • कथा
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (126), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.