देशसेवेच्या बळावरच संघाचे शताब्दी वर्षात पदार्पण
अभयराव माटे यांचे प्रतिपादन; सिंहगड भागात ५६ संस्थांचा 'सेवा संगम' संपन्न

पुणे : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासूनचा प्रवास हा प्रचंड संघर्ष आणि धैर्याचा राहिला आहे. संघावर आलेल्या विविध बंदीच्या अत्यंत कठीण आणि प्रतिकूल काळातही स्वयंसेवकांनी कमालीचा संयम आणि शिस्त पाळली. त्याच देशभक्तीच्या, धैर्याच्या आणि अविरत देशसेवेच्या बळावर आज संघ शताब्दी वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे," असे प्रतिपादन सहकार भारती संस्थेचे अखिल भारतीय सहकारी बँक प्रकोष्ठ प्रमुख अभयराव माटे यांनी केले.
सिंहगड रस्ता परिसरातील अभिरुची मॉल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सिंहगड भागातर्फे आयोजित 'सेवा संगम' विशेष कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर कुटुंब प्रबोधन युवा शक्ती सह आयाम प्रमुख प्रिया लोणकर, सिंहगड भाग सहसंघचालक सचिन नागपुरे आणि भाग कार्यवाह विवेक गद्रे उपस्थित होते. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र सेवा विभाग प्रमुख शैलेंद्र बोरकर, पुणे महानगर सेवा प्रमुख महेश मानेकर आणि सहसेवा प्रमुख सुहास दिवेकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
माटे यांनी आपल्या उद्बोधनात संघ स्थापनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी श्रोत्यांसमोर मांडली. डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांचे बालपण, शिक्षण आणि तत्कालीन पारतंत्र्यातील परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी संघाच्या ध्येयवादी वाटचालीवर प्रकाश टाकला.
- देश प्रगतीसाठी 'पंच परिवर्तना'ची गरज : प्रिया लोणकर
कार्यक्रमाच्या दुसऱ्या वक्त्या प्रिया लोणकर यांनी 'पंच परिवर्तन' या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, "केवळ शासकीय पातळीवर बदल घडवून देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पंच परिवर्तनाचा अंगीकार करणे गरजेचे आहे. पाणी बचत, पर्यावरण रक्षण, प्लास्टिकमुक्ती आणि सामाजिक समरसता यांसारख्या सोप्या कृतींतूनच समाजात सकारात्मक बदल घडेल आणि देश एकसंध होईल."
- ५६ सेवा संस्थांचा सहभाग :
या 'सेवा संगम' महोत्सवात 'स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान', 'पूर्णम इको व्हिजन फाउंडेशन' आणि 'रिजन ट्रॅफिक फाउंडेशन' या सहयोगी संस्थांसह पुण्यातील एकूण ५६ सेवा संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेले 'गोसेवा उत्पादन' आणि 'पुस्तक विक्री' केंद्रांचे स्टॉल्स नागरिकांचे मुख्य आकर्षण ठरले. तसेच विविध संस्थांच्या सामाजिक कामांची आणि 'पंच परिवर्तना'च्या आयामांची माहिती देणारे एक अभ्यासपूर्ण प्रदर्शनही येथे भरवण्यात आले होते.
विविध उपक्रमांचा आढावा
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांना 'संघ संदेश' ही पुस्तिका आणि 'पूर्णम इको व्हिजन'तर्फे तयार करण्यात आलेली पर्यावरणपूरक कापडी पिशवी भेट देण्यात आली. त्यानंतर, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या 'किशोरी दर्पण' वर्गातील विद्यार्थिनींनी अत्यंत नयनरम्य 'गणेश वंदना' नृत्य सादर करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केली. भाग कार्यवाह विवेक गद्रे यांनी प्रास्ताविकात सिंहगड भागाच्या भौगोलिक परिसराची माहिती दिली. तसेच शताब्दी वर्षानिमित्त भागात राबवण्यात आलेल्या 'गृह संवाद' आणि 'हिंदू संमेलन' या उपक्रमांच्या यशाचा थोडक्यात आढावा मांडला. मुख्य प्रबोधनानंतर उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रिया भुजबळ यांनी केले.