
नागपूर, दिनांक १२ मे २०२५ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा शुभारंभ नागपूर रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आज सोमवारी सकाळी झाला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहसरकार्यवाह तसेच वर्गाचे पालक अधिकारी आलोक कुमारजी, सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधरजी तसेच वर्ग सर्वाधिकारी व पुर्व उडीसा प्रांताचे संघचालक समीर कुमार मोहंती यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले.
यंदाच्या वर्गात देशभरातून आलेले ८४० शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधूनदेखील शिक्षार्थी वर्गात आले आहेत. या वर्गात संघाच्या प्रांत व क्षेत्र स्तरावरील वर्गांत प्रशिक्षण घेतलेले ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या २५ दिवसांच्या वर्गाचा सार्वजनिक समारोप ५ जून रोजी होईल. या प्रशिक्षण वर्गात समाज जागरण आणि सामाजिक परिवर्तन याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. देशभरातून शिक्षार्थींना श्री.आलोक कुमारजी यांनी संबोधित केले. कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय हा राष्ट्रीयतेची अनुभूती देणारा वर्ग आहे. येथे शिक्षार्थ्यांना देशातील विविधतेचे दर्शन होते. तसेच भारतात विविधता असली तरी मूळ विचार एकच आहे याचादेखील अनुभव सर्वांना होईल. या वर्गातील परिश्रमातूनच सिद्ध कार्यकर्ता बाहेर पडतो. सर्वांसाठी येथे भगवा ध्वज हाच गुरू असतो.
बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशीच या वर्गाची सुरुवात होत आहे. भगवान बुद्ध, गांधीजी आणि योग यांच्यामुळे देशात भारताची ओळख निर्माण झाली आहे. ठराविक कालावधीतच कार्यकर्त्यांचा लवकर विकास व्हावा आणि त्यांच्या माध्यमातून संघकार्याची वाढ व्हावी हाच या वर्गाचा उद्देश आहे. कार्यकर्ता क्रमशः विकसित होतो आणि त्यातूनच कार्यविस्ताराची गती वाढते. तामिळनाडू, केरळ व अनेक राज्यांत कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागला व तेथून तेथेदेखील संघटन वाढीस लागले. १९२७ मध्ये नागपुरात प्रशिक्षण वर्गाची सुरवात झाली. त्यानंतर आता देशभरात शेकडो वर्ग दरवर्षी होतात. मात्र नागपुरच्या पवित्र मातीतच कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचे आयोजन हे कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असते व येथील संस्कार घेऊनच ते समाजात जातात, असे सहसरकार्यवाह आलोक कुमार त्यांच्या संबोधनात म्हणाले.
