दिनांक २६/२७/२८ आॅगस्ट २०२५ या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांची तीन दिवसीय व्याख्यान माला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी निमित्त आयोजित केली होती.

प्रत्यक्ष भाषणे ही प्रबुद्ध जनांना निमंत्रण देऊन केलेली होती. परंतु समाज माध्यमांकरवी ती सामान्यपणे सर्वां पर्यंत पोहचली आहेत. व आपापल्यापरीने त्या भाषणांचे अन्वयार्थ सर्व जण लावण्यात मग्न आहेत. त्यात माझा हा अल्प प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुख्य ओळख तिची कार्यपध्दती ही आहे. पण या तीनही भाषणात त्यांनी कार्यपध्दती विषयी मांडणी केलेली नाही. याला माझ्या मते विशेष महत्त्व आहे. ही कार्य पध्दती प्रामुख्यानं कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने बनवली आहे. पण संघाचे कार्यकर्ते निर्माण हे काम ब-यापैकी पूर्ण झाले आहे. अता समाजाच्या अपेक्षांना सामोरे जाण्यासाठी संघ सिध्द झाला आहे हे सरसंघचालकांनी ध्वनित केले आहे. तशी कार्यकर्ता निर्माण ही एक अनैसर्गिक रचना आहे व त्यामुळे कार्यपूर्ति नंतर ही व्यवस्था ही अव्यवस्था ठरु शकते. अशा वेळी पुढचे पाऊल उचलणे हे आवश्यक व कालोचित आहे . म्हणून हे भाषण देशांकडून अपेक्षा, संघ व देशाचे संबंध, संघ व जनतेचे नाते, हिंदू शब्दाचे स्पष्टीकरण असे फिरले आहे. ही भाषणे प्रामुख्याने स्वयंसेवकांसाठी नव्हती. तर समाजासाठी होती. पण या भाषणांचा अन्वयार्थ स्वयंसेवकांना समजला पाहिजे. यापुढील काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम हे कार्यकर्ते निर्माण या पुरते मर्यादित न राहता, सामाजिक दायित्व या दिशेने प्रवास करणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना थोडी विचार शैली बदलावी लागणार आहे. हे या भाषणांमधून सुचित झालेले आहे.
यासाठी पंच परिवर्तनाची उद्देशिका समोर मांडली गेलेली आहे. समाज ज्या स्तरावर असेल ती त्या देशाची खरी ताकद असते व म्हणून समाज सुधृढ हवा असेल तर हे पंच परिवर्तन आवश्यक आहेत. व ही आपोआप होणारी, कायद्याने होणारी, सरकारी फतव्यांनी होणारी कामे नसून ती प्रत्यक्षात समाजाने मनापासून स्विकारली तरच होणार आहेत. मग ती सामाजिक समरसता असो की पर्यावरण. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून स्वयं स्विकृत मानसिकतेने ते स्विकारले पाहिजे व मगच समाजात ते स्विकारले जाणार आहे. पण तरीही यातील एक परिवर्तन हे स्वयंसेवकांना नवीन म्हणून थोडे अवघड आहे व पटकन परिणाम दिसणारे नाही आहे. ते काम म्हणजे नागरी कर्तव्ये. संघाचे स्वयंसेवक हे राष्ट्रभक्त आहेत हे समाजाला परिचित आहे, सेवाभावी आहेत हे ही माहिती आहे, धार्मिक दृष्ट्या जागृत आहेत हे ही माहित आहे पण नागरी कर्तव्ये यासाठी स्वयंसेवक तितकेसे माहिती नाहीत. नागरिक स्वयंप्रेरणेने जेवढे प्रगल्भपणे दैनंदिन जीवनात कर्तव्य, जबाबदारी पार पाडतील तेवढे समाज जीवन समृद्ध असते. त्या जबाबदारीचे भान स्वयंसेवकांनी स्वतः मध्ये आणणे व नंतर समाजात जागृती करणे हे ते विशेष परिवर्तन कार्य आहे.
या बरोबरच जिज्ञासा समाधान म्हणून प्रश्नोत्तरे झाली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने सद्यस्थिती मधील समस्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न प्रबुद्ध जनांनी केला. यातील प्रश्नोत्तरे ही संघ स्वयंसेवकांसाठी नवीन नव्हती व हे संघटनेचे वैशिष्ट्य सिध्द करते. रस्त्याची, गावांची नावे बदलावित का? यावर संघ आक्रमांविरुध्द आहे हे स्पष्ट केले. देशभक्त मग तो कोणत्याही उपासना पध्दतीचा असो आम्हाला वंद्य आहे हे स्पष्ट केले. स्वयंसेवक म्हणून सर्वांना हे उत्तर माहिती असते. तसेच मथुरा, काशी ही तिर्थक्षेत्रे हिंदूंना मिळाली पाहिजेत हेही अधिकृत भूमिका म्हणून स्पष्ट केले आहे . अखंड भारत ही फक्त राजकीय नसून सांस्कृतिक भूमिका आहे हे ही स्पष्ट केले आहे. संस्कृती शिक्षण हे सर्व शाळांपर्यंत पोहोचेल तेंव्हा पोहचू द्या पण घरातून सुरवात तर करु शकतो ना? हे स्वयंसेवकांसाठी आवाहनही केले आहे. संविधानातील प्रस्तावना, नागरी हक्क कर्तव्य व मार्गदर्शक तत्व महाविद्यालयीन युवकांमध्ये शिकवली गेली पाहिजेत हे मतही या कालावधिमध्ये मांडले गेले. पण प्रश्नोत्तरे ही स्वयंसेवकांसाठी नव्हती तर प्रबुद्ध जनांच्या जिज्ञासा पूर्ती साठी होती.
त्यामुळे ही भाषणे समाज संघाची भूमिका म्हणून समजून घेत आहे तर स्वयंसेवकांसाठी पुढील मार्गक्रमण कसे असेल हे सांगणारे आहे. अत्ता पर्यंत समाज संघटित करण्याचे काम चालू आहे, यापुढे या देशावर जी वैश्विक मार्गदर्शनाची जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांनी काम करायचे आहे, त्यासाठी समाजाला पंच परिवर्तनाधारे समृध्द बनवून विश्व गुरुत्वाच्या प्रवासासाठी सिध्द करायचे आहे. हे तीन व्याख्यानांचे पाथेय आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदलाचे नाविन्य नाही, पण या पूर्वीच्या बदलात कार्यकर्ता निर्माण या मूलभूत कामात कोणताच बदल नव्हता पण अता समाज रुप संघ अशा बदलाच्या दिशेने वाटचाल चालू होणार आहे.
ही भाषणे स्वयंसेवकांनी कशी अभ्यासावी यासाठी ह्या लेखाचा खटाटोप.
अजूनही अनेक प्रकारे या भाषणांचे व कदाचित काही मर्यादांचे विश्लेषण करता येईल पण प्रमुखपणे स्वयंसेवकांना काय दिशादर्शन आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सुनील देशपांडे