संतांवर आक्षेपार्ह टीका करणार्या श्याम मानव यांची जादूटोणा शासकीय समितीतून हकालपट्टी करावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली. तसेच ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात वारकरी संप्रदायाकडून आळंदी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

आळंदी (जिल्हा पुणे) - अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव (shyam Manav) हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गजानन महाराज आदी अनेक संतांवर सातत्याने जातीयवादी आणि आक्षेपार्ह टीका करत असतात. समस्त वारकर्यांच्या धार्मिक भावना दुखावणार्या श्याम मानव यांची जादूटोणा कायद्याच्या शासकीय समितीतून तात्काळ हकालपट्टी करावी, तसेच संभाजी ब्रिगेडच्या (sambhaji Brigade) राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केल्याप्रकाणी ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाने आज आंदोलनाच्या माध्यमातून केली. समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आज सायंकाळी चाकण चौक, आळंदी येथे जनआंदोलन घेण्यात आले. या वेळी मागण्याचे फलक घेऊन महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल !
त्याचबरोबर ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharav) यांच्या विरोधात वारकरी संप्रदायांच्या वतीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात ही तक्रार केली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक नरके यांनी तक्रार प्रविष्ट करून या प्रकरणाची २ दिवसांत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. या वेळी गोरक्षक श्री. गणेश हुलावले, समर्थक ज्ञानपिठाचे ह.भ.प. महेंद्र महाराज मस्के महाराज, श्री. प्रसाद जोशी, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे ह.भ.प. चोरघे महाराज, ‘आध्यात्मिक आघाडी’चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज उंदरे पाटील, ह.भ.प. राममहाराज सूर्यवंशी आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे श्री. पराग गोखले हे उपस्थित होते.