•  21 Jun 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

डॉक्टर हेडगेवार -आजच्या काळात त्यांच्या विचारांची समर्पकता विनम्र अभिवादन

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 1 day ago
व्यक्तिविशेष  

डॉक्टर हेडगेवार -आजच्या काळात त्यांच्या विचारांची समर्पकता
विनम्र अभिवादन 

आज लोकांना विश्व हिंदू परिषद माहित आहे, अखिल भारतीय  विद्यार्थी परिषद माहित आहे, भारतीय मजदूर संघ माहिती आहे आणि राजकीय क्षेत्रात काम करणारी भाजप सुद्धा माहित आहे; परंतु या फांद्या ज्या वटवृक्षाच्या आहेत त्या वटवृक्षाचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तुत्व काय, असा प्रश्न जर विचारला गेला तर त्याचं निर्विवाद उत्तर म्हणजे या देशातील लाखो लोकांना प्रतिदिन देशासाठी आपला अमूल्य वेळ देणे आणि समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करणे याची प्रेरणा देणारा संघ आहे. या देशातील सामान्य माणसातील असामान्यत्व जागृत करून त्यांच्याकडून मोठमोठी कामे संघाने लीलया करून घेतलेली आहे. मनुष्यबळाच्या इतक्या मोठ्या शक्तीला राष्ट्रपोषक कार्यामध्ये लावून भारत मातेची खूप मोठी सेवा संघाकडून झालेली आहे. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज म्हणजे त्याचे संस्थापक डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार हे होते.  प्रत्येकच महापुरुषांचे काही विचार हे कालसापेक्ष असतात, तर काही कालजयी असतात. काळ बदलला तरीही त्या विचारांची आवश्यकता, त्याचं महत्त्व कमी होत नाही. डॉक्टर हेडगेवार यांनी विविध प्रसंगी जनतेला, स्वयंसेवकांना, कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना अनेक उत्तम विचारमोती आपल्याला दिलेले आहेत.  

एका ठिकाणी ते म्हणतात, जपान जसे जपानी लोकांचे, अमेरिका जसे अमेरिकन लोकांचे आणि इंग्लंड जसे इंग्रजांचे आहे, तसेच हिंदुस्तान हे हिंदू लोकांचे राष्ट्र आहे व या राष्ट्रामध्ये हिंदू म्हणतील ती पूर्व दिशा असली पाहिजे. हे संघ ओळखतो. संघाला इतर गोष्टी जाणून घेण्याची आवश्यकता नाही. मागील शंभर वर्षात जगामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये बदल झालेला आहे. तंत्रज्ञानामध्ये बदल झालेला आहे, लोकांच्या आवडीनिवडी बदललेल्या आहेत, आवागमनाची साधने अधिक गतिमान झालेली आहेत. संपूर्ण जग जोडले गेलेले आहे. विचारांचे प्रवाह या टोकापासून जगाच्या त्या टोकापर्यंत अगदी सहजपणे जाऊ शकत आहेत. भारताच्या सहिष्णू धोरणामुळे पूर्वीपासूनच जगाच्या पाठीवर जे जे कोणी दुःखी-कष्टी होते त्यांनाही भारतातच यावेसे वाटले, व जे लुटारू होते,  इथली साधन संपत्ती हरण करण्याची ज्यांची इच्छा होती, त्यांनाही भारतातच यावेसे वाटले. या देशात यात्रेकरू म्हणून आलेला, पर्यटक म्हणून आलेला आणि आक्रमक म्हणून आलेला असे सगळे लोक या देशाच्या भूमीमध्ये वसले. त्यातील काही एकरूप झाले; परंतु अनेक अ-हिंदू समाज हे अद्यापही आपले अस्तित्व कायम ठेवून आहेत. आजही त्यांची मातृभूमी, पितृभूमी आणि पुण्यभूमी ही भारताच्या बाहेर आहे. अशा हिंदू नसलेल्या लोकांना भारत हा केवळ त्यांच्या निवासाचे केंद्र वाटत असतो. बरेचदा यांची लोकसंख्या सुद्धा वाढल्यामुळे भारतातीलच काही राजकीय लोकांना किंवा अशा अ-हिंदू समाजाच्या गठ्ठा मतदानावर पोसलेल्या राजकीय पक्षांना असे वाटत असते की हिंदुस्तान हे कोण्या एकाचे राष्ट्र नाही, तर हे सर्वांचे मिळून राष्ट्र आहे. “लोग आते गए, कारवाँ बनता गया” अशा पद्धतीचे त्यांचे विचार असतात. परंतु डॉक्टर हेडगेवार म्हणतात त्याप्रमाणे हे हिंदू लोकांचे राष्ट्र आहे. हिंदूंच्याच पराक्रमावर हे राष्ट्र वैभवसंपन्न कधी झाले होते; हिंदूंच्या आत्मविस्मृतीमुळे हे राष्ट्र अवनतीला गेले. त्यामुळे या देशाचा खराखुरा पुत्ररूप समाज जर कोणी असेल, तर तो हिंदू आहे. या हिंदू समाजालाच स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांना संघटित ठेवणे आणि यातूनच देशापुढील समस्यांचे उत्तर शोधणे हे आवश्यक आहे.  

मोहम्मद इकबाल यांनी “सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी, यह गुलिस्तां हमारा” अशा प्रकारचे गीत लिहिले होते. इंग्रजांच्या राज्यामध्ये अनेक वेळा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे गीत म्हटले जायचे. त्यावेळेला डॉक्टरांनी  असे म्हटले होते की बुलबुल हा असा पक्षी आहे की जो जे बगीचे हिरवेगार असतात तेथेच राहतो. बगीचा जर काही कारणामुळे उजाड झाला, वाळून गेला, तर तो बगीचा सोडून दुसऱ्या हिरव्यागार बगीच्याच्या शोधात जात असतो. डॉक्टर पुढे म्हणतात की हिंदू समाज हा या बुलबुल पक्ष्यासारखा नाही. आमची ही एकमेव मातृभूमी आहे. आम्ही हिला हिरवीगार असली तरी सुद्धा आणि आमच्याच काही प्रमादामुळे जर हिच्यावर वाईट परिस्थिती ओढवली तरीसुद्धा आम्ही तिला सोडून जाणार नाही. म्हणून ते म्हणायचे की हे गीत आमच्यासाठी लागू नाही.  

त्याकाळी काँग्रेसच्या असहकार आंदोलनामुळे अनेकांनी आपल्या शाळा सोडल्या, कोणी महाविद्यालयांचा त्याग केला, कोणी सरकारी नोकरीचा त्याग केला.लोक तुरुंगामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी जायला तयार झाले. अशांना डॉक्टर विचारायचे, “ किती दिवसांची तयारी तुम्ही केलेली आहे?” त्यावर समोरचा उत्तर देई, “सहा महिने.” डॉक्टर म्हणायचे, “त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली, दोन वर्षांची, तर काय करणार?” त्या वेळेला लोक म्हणायचे की दोन वर्षांची शिक्षा सुद्धा आम्ही भोगू. त्यावर डॉक्टर म्हणायचे की आजकाल देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जाणे हे एकमात्र देशभक्तीचे लक्षण लोकांना वाटत आहे; परंतु लोकांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की सहा महिने, वर्षभर काम करून देशाचे स्वातंत्र्य काही मिळणार नाही. देशासाठी मरावयाची तयारी ठेवली पाहिजे; परंतु त्याचबरोबर देशासाठी आजन्म संघटनेचे कार्य करण्याची तयारी सुद्धा ठेवली पाहिजे. आज आपण बघतो की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी लोक एकत्र जमतात, राष्ट्रगीत म्हणतात आणि “भारत माता की जय” म्हणतात. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये भारत जिंकला तरी सुद्धा देशभक्तीचे वातावरण निर्माण होते. परंतु डॉक्टर हेडगेवार यांनी सांगितल्याप्रमाणे हंगामी देशभक्ती ही देशाच्या सर्वकालिक समस्यांना उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून प्रतिदिन काही वेळ देशातील सर्वच नागरिकांनी देशाच्या कामासाठी देणे आवश्यक आहे. ही वृत्ती तरुणांमध्ये निर्माण करावी, त्यांचे संघटन करावे; यासाठी संघाची स्थापना झालेली आहे असे डॉक्टर हेडगेवार म्हणत असत.  

जंगल सत्याग्रह करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार विदर्भातील पुसद येथे आलेले होते. सकाळच्या वेळेस नदीवरून स्नान करून येत असताना त्यांना असे दिसले की दोन मुसलमान मुलगे एका गाईला घेऊन चाललेले आहेत. त्यावेळची समाजाची परिस्थिती डॉक्टरांना माहीत असल्यामुळे त्यांनी त्या मुलांना विचारले, “ही गाय कुठे चालविली आहे?” त्यावर ते मुलं म्हणाले की “आम्ही हिची  कुर्बानी करणार आहोत.” त्यावर डॉक्टर त्यांना म्हणाले, “तुम्ही ही गाय कितीला विकत घेतली?” त्यावर ते मुलं म्हणाले की “बारा रुपयाला.” त्यावर डॉक्टर म्हणाले, “आता जर तुम्हाला कोणी ही गाय विकत मागितली तर तुम्ही द्याल का?” तर ते म्हणाले, “नाही.” तेवढ्यात आणखी काही मुसलमान तिथे जमा झाले. ते डॉक्टरांना समजावू लागले की गाय मारून तिचे मांस विकणे हाच आमचा धंदा आहे. “तुम्ही या गावात नवीन आहात; तुम्ही या भानगडीत पडू नका.” डॉक्टर त्यांना म्हणाले, “या गाईच्या मांसाचे किती पैसे तुम्हाला मिळतील?” त्यावर ते म्हणाले की “पंचवीस रुपये तरी मिळतील.” त्यावर डॉक्टर म्हणाले, “मी तुम्हाला या गाईचे तीस रुपये देतो; पण तुम्ही हिला मारू नका.” ज्या वेळेला वाद वाढला, त्या वेळेला आणखी काही मुसलमान गावातील हिंदूंना सुद्धा घेऊन आले. त्यांनी पण डॉक्टरांना सांगितले की इथे गाईला नेहमीच मारले जात असते. तेवढ्यात गावातील आणखी काही हिंदू प्रतिष्ठित पुढारी तेथे आले, व पोलीस सुद्धा आले. एक हिंदू पुढारी डॉक्टरांना म्हणाले की “तुम्ही इथे जंगल सत्याग्रहाकरिता आलेले आहात; असे असताना या फालतू गोष्टीत तुम्ही कशाला पडत आहात?” त्यावर डॉक्टर संतापाने त्यांना म्हणाले, “हिंदूंकरिता पूज्य असलेल्या गाईचे रक्षण तुम्हाला फालतू वाटते का? माझ्यासाठी जंगल सत्याग्रह केला काय आणि गाईसाठी सत्याग्रह केला काय, दोन्हीही सारखेच आहेत.” अनेक वर्षांच्या पारतंत्र्याच्या कुसंस्कारांनी अशी बोथट, स्वाभिमानशून्य, पडखाऊ माणसे पुढारी झालेले पाहून डॉक्टरांना अतिशय वाईट वाटले. शेवटी डॉक्टरांनी त्या गायीची मुक्तता केली. गोपूजकांच्या या देशामध्ये आज मोठमोठे यांत्रिक कत्तलखाने उभारले गेलेले आहेत. महामार्गाने गाईंना अमानुषपणे विविध वाहनांमध्ये कत्तलीसाठी नेले जाते. आजही स्वाभिमानशून्य हिंदू हे दृश्य मख्खपणे पाहत असतो. काही हिंदुत्ववादी तरुण सातत्याने या कसाईंच्या तावडीतून गोमातेला मुक्त करण्याचे कार्य करीत असतात; परंतु मागील शंभर वर्षांमध्ये हिंदूंची बोथट, स्वाभिमानशून्य आणि पडखाऊ वृत्ती आजही कायम आहे. आज जे गोरक्षक व गोहत्या बंदीच्या विरोधात कार्य करीत असताना दिसतात, ते सर्वच  ज्या डॉक्टर हेडगेवारांनी  संघ सुरू केला त्याच हिंदुत्वाच्या भावनेने अनुप्राणित संस्थांचे ते कार्यकर्ते आहेत.  वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर या गावी झालेल्या संघाच्या शिबिरामध्ये स्वयंसेवकांसमोर बोलताना डॉक्टर म्हणतात की पूर्वीचा गांधार आज अफगाणिस्तान झालेला आपण पाहत आहोत. आजचा हिंदुस्तान भविष्यकाळात इस्लामी स्थान होईल की काय, अशी भीती आज वाटत आहे. धर्म आणि संस्कृती याचे मोल देऊन स्वराज्य घ्या, असे जर कोणी म्हणाले तर असे संस्कृती विहीन स्वराज्य घेण्यात काय अर्थ आहे, याचा तुम्ही विचार करा. गोलमेज परिषदेत उत्तर हिंदुस्थानाला पाकिस्तान हे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावरून वारा कोणत्या दिशेने वाहत आहे हे आपल्या लक्षात येईल. आज हिंदूंमध्ये जर सगळ्यात मोठी उणीव कोणती असेल, तर परस्परांना सहाय्य करण्याच्या बुद्धीची आहे. संघाला हीच उणीव भरून काढायची आहे.  

1947 साली भारताचे विभाजन झाले. पूर्ण भारत इस्लामी स्थान झाला नाही; परंतु त्याचा मोठा भाग पाकिस्तानामध्ये परिवर्तित झाला. आजही हिंदूंकडूनच आणि हिंदू बहुसंख्य असलेल्या राजकीय पक्षांकडूनच हिंदू धर्म आणि संस्कृती यावर हल्ले होताना आपण पाहतो. हिंदूंचे सण-उत्सव यावरही समाजमाध्यमांवर सातत्याने हल्ले चढविले जातात. हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंचा धर्म, त्यांची संस्कृती यांचा अनादर होताना आपण पाहतो. ही परिस्थिती बरोबर नाही. डॉक्टर हेडगेवार यांनी याबद्दल जे भाकीत केले होते ते खरे ठरले, व आजही भारत तुष्टीकरणाच्या विषवेलीने ग्रस्त झालेला आपल्याला दिसून येतो.  डॉक्टरांना कोणीतरी विचारले की हिंदूंची संघटना झाल्यावर तुम्ही काय कराल. त्याचे उत्तर देताना डॉक्टर हेडगेवार म्हणाले की “ऑर्गनायझेशन फॉर द सेक ऑफ ऑर्गनायझेशन,” संघटनेसाठी मी संघटना करीत राहील. म्हणजे हिंदू संघटनेचे कार्य हे कधीही थांबणार नाही. जागृत, सक्रिय, आणि संघटित हिंदू हे देशाच्या आणि समाजाच्या सर्व परिस्थितीचे सार्वकालिक उत्तर आहे, हे आपल्याला डॉक्टरांच्या जीवनावरून लक्षात येते. डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना करून सर्वसामान्य माणसाला देशभक्तीचा एक मार्ग दाखविलेला आहे. 


अमोल पुसदकर 
सुप्रसिद्ध वक्ता व लेखक
9552535813


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • विश्व हिंदू परिषद
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (16), सामाजिक (165), कला (3), संस्कृती (41), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (65), रा. स्व. संघ आणि परिवार (82), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (9), विज्ञान (5), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.