| | गुढी शौर्याची, गुढी परंपरेची, गुढी आपल्या विजयी संस्कृतीची | |
क्षितिजावर संस्कृतीच्या उजळून आली नवी पहाट
सुख समृद्धीची गुढी उभारू सदैव राहो आनंदाची लाट
वसंताच्या आगमनाने मोहरलेल्या सृष्टीच्या, सोनेरी किरणात उगवत्या सूर्याला, तेजाला वंदन करून, गुढ्या तोरणे उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याचा, साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा- गुढीपाडवा.
ब्रम्ह देवांनी आजच्याच दिवशी विश्वाची निर्मिती केली असे म्हणतात; सृष्टीच्या उत्पत्तीचा हा दिवस.जगातील सर्वात प्राचीन व शास्त्र शुद्ध कालगणना प्रारंभ झाली तो दिवसघराघरावर गुढी उभारून साजरा करण्याची हिंदू परंपरा आहे. महाराष्ट्रात बांबुच्या काठीला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर कडूनिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचे भांडे बसवले जाते व हि गुढी उंच उभारून त्याची पूजा केली जाते.
चैत्र महिन्यात नवनिर्मितीचे संकेत देत झाडांना नवी पालवी फुटलेली असते ; हिवाळ्याची थंडी कमी होऊन उन्हाळा सुरु होत असतो अशा वातावरणात कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील जंतूंचा नाश होतो म्हणून गुढीपाडवा सणांमध्ये कडूलिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व देत आरोग्यदायी संदेश दिला जातो.
गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे प्रतिक मानली जाते.महाराष्ट्रा व्यतिरिक्त आन्ध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात हा दिवस पाडवो / उगादी या नावाने तर सिंधी लोक हा उत्सव चेटीचंड या नावाने साजरा करतात.
हा उत्सव का साजरा करायचा ? या प्रश्नाचे उत्तर शोधतांना अनेक दाखले मिळतात. वर्षप्रतीपदेपासूनच ऐतिहासिक विजयाचे प्रतिक असलेल्या विक्रम संवताचा प्रारंभ होतो. भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे रममाण असणे असा तेजात रममाण असलेल्या आपल्या या भारत देशावर अनेक आक्रमणे झालीत.
विक्रमादित्याच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाने झुंज देत ऐतिहासिक विजय मिळवला या विजयाचे स्मरण राहावे म्हणून विक्रम संवत सुरु झाले. राजा विक्रमादित्यने शकांवर विजय मिळविला पण तरीही हि आक्रमण थांबली नव्हती. विक्रमादित्या नंतर सुमारे सव्वाशे वर्षांनी पुन्हा शकांनी भारतावर आक्रमण केल यावेळी शालिवाहनाने हिंदू राष्ट्राचे नेतृत्व केले. असे म्हणतात कि, शालिवाहन नावाच्याकुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण फुंकून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला आणि म्हणून गुढ्या तोरणे उभारली असावी.
मातीचे जे अश्व अचेतन, करूनि तयावर अमृत सिंचन ,
मृत वीरांना देऊन जीवन , दिग्विजायास्तव सैन्य निर्मिते,
पराक्रमाची साक्ष सांगते घराघरावर गुढी डोलते
त्या विजयाची स्मृती म्हणून याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरु झाले. शक सुरु करणारा हा पहिला महाराष्ट्रीयन राजा. या शालिवाहन शकात एकूण ६० संवत्सरे आहेत यातील ३९ वे संवत्सर " विश्ववसू"नाम संवत्सराची सुरवात आज होत आहे.
विजया दशमीच्या दिवशी रावणासारख्या राक्षसाचा वध करून प्रभू रामचंद्र ज्या दिवशी अयोध्येला परत आले तो दिवस होता चैत्रशुद्ध प्रतिपदा. हिंदू समाजाचे दैवत असलेले प्रभू श्रीरामचंद्रानी रावणाचा पराभव करून भारतातीलच नव्हे तर आशिया आणि आफ्रिकेतील लोकांना हि रावणाच्या अत्याचारातून मुक्त केले होते. १४ वर्षांचा आपला वनवास संपवून श्रीराम अयोध्येत पोहोचले हा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येतील प्रत्येक घरात ध्वजारोहण करण्यात आले, घरोघरी विजयाच्या गुढ्या / तोरणे उभारून प्रभू श्रीरामांचे स्वागत करण्यात आले. हजारो वर्षा पूर्वीची हि स्मृती अखंड जपत हि परंपरा पुढे नेत आज हि गुढी पाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारून प्रभू श्रीरामाच्या शौर्याचे स्मरण म्हणून गुढीच्या रूपात विजयध्वज उभारले जातात.
१४ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीत ही सज्जनाकरवी गुढी उभारल्याचा उल्लेख आढळतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात,
"अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥
१६व्या शतकात संत चोखामेळा आपल्या अभंगात वर्णन करतात,
"टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट ही चालावी पंढरीची"
असा पराक्रमाची आठवण करून देणारा, पुढे पुढे मार्गक्रमण करणेसाठी नवीन चैतन्याने, भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा देणार्या या गुढीपाडव्या बद्दल खानदेशकन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी म्हणतात –
" गुढीपाडव्याचा सन , आतां उभारा रे गुढी,
नव्या वरसाचं देनं, सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी, आतां पाडवा पाडवा ,
तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा "
हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
अपर्णा नागेश पाटील – महाशब्दे
९८२३७६६६४४