•  15 Jun 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

लॉस्ट अमंग द मिथ्स - ‘हर स्टोरीज’ – फ्रॉम रामायण

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) today
भाष्य  

लॉस्ट अमंग द मिथ्स - ‘हर स्टोरीज’ – फ्रॉम रामायण 
रामायणातील मिथकांमध्ये हरविलेल्या “तिची गोष्ट”: कल्याणी सरदेसाई  


अभ्यासकांच्या मते ई. पू . ५११४ साली (ई. पू .७३२३?) राजा दशरथ अयोध्येवर राज्य करीत होता आणि तेव्हापासून रामायणास सुरुवात होते . रामजन्मापासून ते लव-कुशांपर्यंत आणि नंतर सीतेच्या धरणी  प्रवेशापर्यंतचे सर्व प्रसंग आपल्या मनःपटलावर अक्षरशः कोरले गेले आहेत आणि आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. फक्त आसेतुहिमालयच नव्हे तर श्रीलंका, आग्नेय आशिया, चीन इ. ठिकाणी रामकथा भिन्न रुपात, ढंगात अभिव्यक्त झालेली दिसते. तिच्या खरे-खोटेपणाविषयी चर्चा होऊ शकते, मात्र तरीही ‘रामायण’ हे भारतीयांसाठी एक ‘शाश्वत सत्य’ ठरते. 

वाल्मिकींनी लिहिलेले ‘आद्य’ रामायण, तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’, दक्षिणेतील कंबमुनींचे प्राचीन तमिळ रामायण, या खेरीज इतर लोकवाङमय, लोकगीते , रामलीला, दशावतार कथा, नाटकं, ‘अमर चित्रकथा’ मधील बालवाङमय, दूरचित्रवाणीवर दृक्श्राव्य स्वरुपात साकार झालेले रामानंद सागर यांचे ‘रामायण’, देवदत्त पटनायक यांची ‘सीता’, अलीकडे प्रसारित झालेली ‘सिया के राम’ अशा वेगवेगळ्या वाहिन्यांवरील मालिका .... अशा किती तरी पद्धतीने भारतीय मनावर गारूड घालणारी ‘रामकथा’ अभिव्यक्त झालेली दिसते. मात्र दशराथापासून रावणापर्यंत आणि राम-लक्ष्मणापासून लव-कुशांपर्यंत ‘रामायण’ हे सतत पुरुषी व्यक्तिरेखेभोवती फिरताना दिसते. यात स्त्रिया नाहीत असे नाही पण त्या अवती-भोवती असल्याने ओघाने येतात. विशिष्ट प्रसंगी त्यांचे मनोव्यापार कळून येत नाहीत. कदाचित सर्व प्रकारच्या रामायणांचे लेखन पुरुषांनीच केले असल्याने असे असावे . त्यामुळे स्त्री व्यक्तिरेखेला पटकन कुटील, दुष्ट, लोभी, त्यागी, दुर्दैवी, भक्त, सती, इ. विशेषणं लावत कथा पुढे सरकते. 

कल्याणी सरदेसाई या स्त्री व्यक्तिरेखेच्या पोटात शिरतात, तत्कालीन परिस्थिती तिच्या नजरेतून बघतात. मंथरा-कैकेयी-शूर्पणखा-रंभा-तारा-शांता-सीता-अहिल्या-शबरी-मंदोदरी आणि भूदेवीपर्यंत प्रत्येकीला समजून तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. लहानपणापासून देशभर केलेल्या भ्रमंतीतून टिपलेली रामकथा आणि पत्रकारितेची पार्श्वभूमी यातून हे लेखन बहरते. विशेष म्हणजे त्या क्रिस्टलच्या माहितगार असून त्याचे गुणधर्म जाणून त्या विशिष्ट व्यक्तिरेखेला स्मोकी क्वार्टझ्, गार्नेट, मूनस्टोन, मोती, जेड, ओपल, अशा उपमा देतात. ऐतिहासिक आणि साहित्यिक संदर्भ शोधून योग्य ठिकाणी त्याची पेरणी करतात, तरीही काही ठिकाणी थोडे शब्द-जंजाळ झाले आहे का असे वाटते.कुटील, लोभी म्हणवली गेलेली मंथरा ही दासी नसून कैकेयीचे पालन-पोषण करणारी तिची दुसरी आईच होती, इतर दोन्ही सवतींपेक्षा सर्व बाबतीत सरस असणारी आपली लेक सर्व लेकरांवर असेच प्रेमवर्षाव करीत राहिली तर राम राजा झाल्यावर रघुकुलाची दासी होईल म्हणून कारस्थाने करणारी मात्र तिला वैधव्य आल्यावर आणि भरत विन्मुख झाल्यावर कष्टी होते तर ‘भरत अथवा राम राजा झाला तरी माझे स्थान अबाधित होते मात्र रावणाच्या विजीगिषु वृत्तीपुढे अयोध्येत कोणालाच स्वास्थ्य लाभले नसते म्हणून रावणाच्या अंतासाठी रामाने लंकेला जाणे गरजेचे होते’ असे म्हणत मंथरेची ग्लानी दूर करते. तर पुरुषसत्ताक व्यवस्थेत पोटच्या कन्येला, शांतेला दूर लोटावे लागले आणि मुलगे होत नाहीत म्हणून सवती स्विकाराव्या लागल्या आणि नंतर आदर्श अशा पुत्राला देखील वनवासात गेलेले बघावे लागले, ती कौशल्या. रघुकुलाची आदर्श सून, आदर्श पत्नी, महत्त्वाकांक्षी आणि पतीवर भुरळ घालणाऱ्या कैकेयीला चांगलीच जाणून होती म्हणून दशरथाचे वर राखून ठेवले तेव्हाच तिला येणाऱ्या वादळाची कल्पना आली होती. प्रतिकार करण्यापेक्षा परिस्थितीला तोंड देणारी कौशल्या सर्वांनी झिडकारल्यानंतर एकाकी झालेल्या कैकेयीस राम अयोध्येस परतत असताना माफ करून टाकते. मनमिळावू, विनम्र सुमित्रेचा तेवढा तिला आधार असतो. इतक्या वर्षात त्या शांतेचं अस्तित्व तरी कोणाच्या खिचगणतीत आहे का हो? मुलगी घराची शोभा वाढवणारी असते, पुढे तिला लग्नाच्या बाजारात राज्याराज्यातील संबंध दृढ करण्यासाठी उतरवलं जातं; इथे तर दशरथाने शांतेला निपुत्रिक वृद्ध मांडलिक राजाला देऊन मिंधे केले. दोन्ही पित्यांचे ऋण फेडत तिने आपले एकाकीपण ऋषी राजश्रींगी याच्याशी विवाह करून त्याच्या आश्रमात घालवले. अवखळ अशा उर्मिलेला गृहीत धरून धर्म आणि कर्म प्रथम म्हणत जबरदस्तीने एकांतवास देत सोडून जाणाऱ्या लक्ष्मणासोबत चौदा वर्षांनंतर पुन्हा संसार सुरु करणे किती अवघड गेले. 

देवादिकांचा पराभव करून समस्त ब्रह्मांडावर आपले राज्य प्रस्थापित करावे ही महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून मातृसत्ताक राक्षस कुलोत्पन्ना कैकेसी विद्वान विश्रवाशी, असामान्य संतती निर्माण व्हावी या उद्देशाने विवाह करून रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा आणि विभीषणास जन्म तर देतेच शिवाय तसेच बाळकडूही देते. तिच्या प्रशिक्षणातून रावण मन योद्धा, विद्वान कवी, तपस्वी, भक्त, वादक आणि कलेचा भोक्ता बनतो, कालांतराने अनेक दुर्गुणांचा अधिकारीही होतो. जो रावण आपल्या पुतण्याच्या पत्नीला, आपल्या सुनेला – रंभेला सुद्धा आपल्या वासनेचा शिकार करतो. रंभा, जी अतुलनीय सौंदर्याची स्वामिनी असते, तिला कुटुंबापासून लांब करून अप्सरा केले जाते जी नंतर नलकुबेराची पत्नी होते. शरीररुपी मंदिर अपवित्र झाले तरी त्यातील देवतेची काळजी घ्या असे ती शिकाऊ अप्सरांना सांगते.  अतिशय प्रेम असणर्या आपल्या पतीची हत्या करून रावणाने अकाली वैधव्य लादले अशी शूर्पणखा, तिला आपल्या भावाप्रमाणेच लैंगिक सुख प्राप्त करण्याचा अधिकार का नाकारला जातो म्हणून चिडून उठते, ती राम-लक्ष्मणाकडे प्रेमाची याचना करते आणि या कथेचा क्लायमॅक्स सुरु होतो. शापित अप्सरा, मग मांडूकी, नंतर साक्षात पार्वतीचे रूप ल्यालेली मंदोदरी पतीने, रावणाने, काही काळ दिलेले सुखाचे क्षण मान्य करून तो आपल्याशीच संवाद साधतो या विचाराने सुखावते. त्याचे अधःपतन रोखण्याचा बाष्कळ प्रयत्न करते, सीतेचे हरण केल्यावर मात्र तिला पुढील पडझडीची पूर्ण चाहूल लागते. वैद्य तारा, राजदरबारी प्रजेच्या हितासाठी तळमळीने सल्ले देणारी तारा, पतीच्या अनेक चुकांसह त्यावर प्रेम करणारी तारा, रीतीप्रमाणे पती वाली निधन पावला असे समजून रीतीप्रमाणे दीर सुग्रीव याच्याशी लग्न करूनही वालीशी एकनिष्ठ राहणारी प्रजादक्ष तारा जेव्हा सुग्रीव-वाली युद्धात रामाचा हस्तक्षेप होतो तेव्हा चवताळून उठते आणि रामास शाप देते. कशासाठी आणि कोणासाठी शाकाहारी भिल्लीण शबरी विवाहाच्या आधी घर सोडून निघून जाते एका अज्ञाताच्या प्रवासाला निसर्गाच्या साक्षीने. काय प्राप्त करायचे असते तिला? रानमेवा तिच्या आवडीचा आणि जे आपण खाऊ शकतो तेच दुसऱ्यास द्यावे या नावाने टी बोरं रामास देते. उष्टी वगैरे नाही, तर उत्तम द्यावे या भावनेने कित्येक वर्षं वाट पाहिल्यानंतर भेटणाऱ्या आराध्याला गोड रसरशीत बोरं देऊ करते. केवळ स्त्रीच्याच वाटेला आलेली पावित्र्याची परीक्षा देत अहिल्याही अशीच हजारो वर्षांची वाट बघत शिलेच्या रुपात ताटकळली. तिची कामना करून इंद्राने तिला फसवले ही तिची चूक ज्याच्या उद्धारासाठी तिला रामाची वाट बघावी लागली. ती जानकी विवाहपूर्व राजकन्येचे सुख भोगलेली विवाहोत्तर सतत वनवासात, आश्रमात तर राहिली. आपल्या स्वत्व आणि सतीत्वाच्या  जोरावर जिने रावणाच्या लंकेत तग धरला आणि नंतर अग्निदिव्य ही  केले. तरीही नियतीने तिला तिच्या हक्कांपासून हिरावून पुन्हा वनात ढकलले. मनात किंचितही किल्मिष न ठेवता तिने आपल्या जुळ्या मुलांना राघुवंशीयांचे संस्कार दिले, रामायण शिकवले, मात्र, आता रामची भेट होणार अशा वेळी तिने भूदेवीत सामावणे पसंत केले. आणि अखेरीस आपल्या कन्येला सामावून घेताना भूदेवीचं किती मायाळू दर्शन होतं..... धन्य, कृतार्थ, सीतेच्या वेदनेची, त्यागाची, अव्यक्त शब्दांची धग ती आपल्यात सामावून शांत करते.         
रामायणाच्या युद्धानंतर लंकेत उरल्या त्या केवळ स्त्रियाच - मंदोदरी, सरमा, त्रिजटा, शूर्पणखा, कैकेसी, सुलोचन आणि उरतात त्यांचे मनोव्यापार. प्रथेप्रमाणे मंदोदरीचा तिला नको असलेला विभीषणासोबातचा पुनर्विवाह..... हे पुस्तक वाचल्यावर वाटते की ‘रामायण’ ही खरी तर एक जटील पुरुषकेंद्रित व्यवस्थेची, स्त्रीला सतत गृहीत धरले जाण्याची, तिचे निर्णयस्वातंत्र्य नाकारले जाण्याची, तरीही आपले स्वत्व जपणाऱ्या, प्रश्न उपस्थित करणाऱ्या स्त्रीची गाथा आहे; स्त्री व्यक्तिरेखा या दुय्यम नसून अनेक ठिकाणी त्या देखील ‘रामायणा’च्या केंद्रस्थानी आहेत असे “हर स्टोरीज” वाचल्यावर लक्षात येते.

                     
- डॉ. प्रीति प्रभुणे


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • फ्रॉम रामायण
  • ‘हर स्टोरीज’
Share With Friends

अभिप्राय

अतिशय उत्तम पुस्तक. रामायणातल्या स्त्रियांकडे बघण्याचा एक विलक्षण वेगळा दृष्टीकोन . कल्याणी सरदेसाई यांचं मनापासून अभिनंदन आणि पुढील पुस्तकांसाठी शुभेच्छा . शुभास्ते पन्थानः सन्तु .
सुचेता परांजपे 15 Jun 2026 18:15


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (16), सामाजिक (164), कला (3), संस्कृती (41), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (65), रा. स्व. संघ आणि परिवार (78), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (9), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.