डॉ. सुनील भंडगे (dr. sunil bhandage)
8 days ago

मानवतावादी तथागत भगवान गौतम बुद्ध
सेवारूप करुणामूर्ती भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला 'अत्त दीप भव' हा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे. मानवाच्य हितासाठी आणि सुखासाठी बुद्धांनी आपल्या अथक प्रयत्नांनी कल्याणकारी अशा सद्धर्माचे चक्र गतिमान केले. त्यातूनच मानवी समाजाला प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री आणि बुद्धिप्रामाण्यवादी इ.गुणांनी समृद्ध होण्याचे मार्ग दाखवले. माणसाने माणसाशी वागताना प्रेम, सद्भावना आणि मैत्रीची भावना सतत आपल्या अंत:करणात ठेवून प्रत्येकाने सुखी आणि उन्नत जीवन जगावे आणि त्याबरोबरच आचार-विचार शुद्ध ठेवावे हा गौतम बुद्धांच्या धम्माचा हेतू आहे.
आपण गौतम बुद्धांचा उल्लेख करताना नेहमी त्यांच्या नावापुढे 'तथागत' हा महत्वाचा शब्द आग्रहाने आणि आदराने नेहमी वापरतो. तथागत याचा अर्थ, ज्याने यथार्थ ज्ञान प्राप्त केले आहे असे तथागत ! तथागतांच्या जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
पौर्णिमा पुरुषोत्तम म्हणजे तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचे कारण म्हणजे राजा शुद्धोदन आणि आई महामाया यांच्या पोटी सिद्धार्थचा जन्म (इ.स.पू.५६३)झाला तो वैशाख पौर्णिमेला, त्यांना बिहार, गया येथे ज्ञानप्राप्ती तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता आणि त्यांचे महानिर्वाण(इ.स.पू.५६३) झाले ते वैशाख पौर्णिमेलाच!
राजकुमार सिद्धार्थला बालपणापासूनच सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेम, दया होती. राजघराण्यामध्ये शिकारीच्या प्राविण्याचा आणि कौशल्याचा अभिमान असल्यामुळे शिकारींच्या मोहिमांचे आयोजन केले जायचे. मात्र सिद्धार्थला शिकार करण्याची आवड नव्हती. परंतू चुलत भावाने शिकार केलेल्या घायाळ झालेल्या पक्षाच्या अंगातील बाण अत्यंत दयाळूपणे काढून खूप काळजीपूर्वक शुश्रूषा करत त्याला जीवदान दिले. त्यासाठी राजदरबारी त्याला पाठिंबाही मिळाला.
सिद्धार्थला ध्यानधारणा करण्याची आवड होती. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा तो ध्यानधारणा करत असे. त्याची शिकारीबद्दलची अनिच्छा आणि ध्यानाची आवड पाहून राजा शुद्धोदन चिंतीत होई, आपला पुत्र पराक्रमी सम्राट होण्याऐवजी संन्यासी बनण्याची दाट भीती त्यांना वाटत होती. म्हणून त्यांनी १६ व्या वर्षीचा सिद्धार्थ दंडपाणी राजाच्या कन्येच्या - राजकुमारी यशोधरेच्या स्वयंवरास गेला असताना तिने त्याच्या वरमाला घातली. उपस्थित असलेल्या अन्य राजपुत्रांनी त्याला आक्षेप घेतला. त्यासाठी तिरंदाजीची स्पर्धा घेण्यात आली. त्यात सिद्धार्थने इतर राजपुत्रांशी स्पर्धा करत आपल्या धनुर्धारी कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करत राजकन्येस जिंकले.
सर्वात जास्त आनंद राजा शुद्धोदनाला झाला. राजाने आपल्या मुलाला सांसारिक दुःख आणि यातानांपासून दूर आरामात राहता येईल याची सर्व खबरदारी घेतली. राजकुमार त्यांच्या शाक्य कुळाचा नायक बनला. कालांतराने त्यांना पुत्रप्राप्ती झाली, त्याचे नांव राहूल ठेवण्यात आले.
एके दिवशी सिद्धार्थ राजवाड्याच्या बाहेर पडल्यानंतर त्याला म्हातारा माणूस, आजारी माणूस आणि एक प्रेतयात्रा दिसली. ते सर्व पाहून अस्वस्थता आलेल्या सिद्धार्थने लोकांच्या दैन्याचे व दुःखाचे कारण काय आहे? काय उपाय करता येईल? त्यांच्या यातना आणि दुःखनिवारण्याचा मार्ग आहे का? अशा अनेक प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा निर्णय घेत सर्व कुटुंबाचा त्याग करत कमालीच्या कारुण्यमय जाणीवेने देशाच्या सीमेवर जात अंगावरील सर्व वस्त्रालंकार सारथ्याच्या स्वाधीन केले. मुंडन करून हातात भिक्षेची वाटी घेतली आणि सिद्धार्थ संन्यासी झाला. आदर आणि आनंदाने लोक सिद्धार्थला भिक्षा देवू लागले. नंतर सलग ४० दिवसांची तपश्चर्या केली. अतिशय कठोर साधनेने वैशाख पौर्णिमेच्या रात्री त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली.
सिद्धार्थला बोधीवृक्षाखाली ज्ञान मिळाल्याने ते बुद्ध झाले. ते फक्त बोधिसत्व होते. ज्यामध्ये मुदिता, विमला, प्रभाकारी, अर्किष्मती, सुदूर जय, अभिमुखी, दुरंगमा, अकाल, साधुमती, धर्म, मेघ इ,दहा महान गुण त्यांच्या ठायी होते, ज्यामुळे ते बोधिसत्वाचेबुद्ध झाले.ज्या कथांमध्ये हे सर्व कथन केले आहे, त्या बुद्धांच्या जातक कथा खूप प्रसिद्ध आहे.
मानवजातीच्या संपूर्ण दुःख निवारण्याचा उपाय शोधल्यानंतर, बुद्धांनी हे ज्ञान अखिल मानवजातीपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला. ते म्हणतात, 'मी ईश्वर नाही, ईश्वराचा अवतारही नाही. मी फक्त माणूस आहे. माझ्या सहकारी मनुष्यप्राण्याचे दुःख दूर करण्यासाठी फक्त माझे ज्ञान आणि अनुभव मी सांगत आहे.'
सिद्धार्थ त्यांच्या वयाच्या ३५ व्या वर्षी बुद्ध झाले. त्यांनी आपल्या धम्माचा एवढा व्यापक प्रसार केला असे बुद्ध हे कदाचित जगातील पहिले संत होते. बुद्ध पाली भाषेत शिकवत असत. त्या काळात पाली भाषेचा वापर उत्तर भारतात सर्रासपणे होत असे. ते दिवसातून एक वेळच भोजन करत, तेही भिक्षा म्हणून मिळेल ते. शक्य असेल तर विहारात विश्रांती घेत असत नाहीतर एखाद्या झाडाखालीच. त्यांच्याकडे भगव्या कपड्यांच्या दोन जास्तीच्या जोड्या असत. कपडे फाटले तर ते शिवण्यासाठी सुई दोरा सोबत असे.
मी दुसऱ्या माणसाला मोक्ष देवू शकत नाही. प्रत्येकाने स्वतःचा मोक्ष स्वतःच मिळवावा अर्थात 'अत्त दीप भव' म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा! त्यासाठी त्यांनी बुद्ध संघाची स्थापना केली. त्याची नियम आणि कर्तव्य जाहीर केली.
१) संघाच्या हितसंबंधांचे संरक्षण तन-मन-धनपूर्वक करणे.
२) संघाच्या सभांमधून कधीही गैरहजर न रहाणे.
३) कोणत्याही शाक्याच्या वर्तनात दिसून येणारे दोष कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता उघडपणे बोलून दाखवणे.
४) कोणी दोषारोप केला की रागावू नये. अपराधी असल्यास कबूल करणे,निरपराधी असल्यास सांगणे.
भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश सारनाथ येथे दिला. ते म्हणतात, या जगातील माणूस आणि माणसाचे माणसाची नाते, मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात रहात आहे. सर्व जग दुःखाने भरलेले आहे. जगातून दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. सदाचरणाचा मार्ग स्विकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर दुःखाचा निश्चितपणे निरोध होईल. त्यांच्या संदेशाचे सर्व समाजात स्वागत होऊ लागले. त्यांची आई, पत्नी आणि मुलासह अनेकांनी बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेतली.
जिथे जिथे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म पोहोचले तिथे तिथे स्थानिक धर्म आणि संस्कृतीचा अत्यंत निर्दयपणे नाश केला गेला. अमेरिकन खंडातील रेड-इंडीयन लोकांच्या संस्कृतीचा आणि तेथील मानवी जीवनाचं संहार तसेच ख्रिश्चन मिशनर्यांनी ऑस्ट्रेलियातील धार्मिक श्रद्धांसह त्यांच्या स्थानिक जमातींचे पूर्णपणे केलेले उच्चाटन याचे इतिहासात खूप चांगले दस्तऐवजीकरण झालेले आहे. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये असलेल्या अनेक शतकांच्या पाश्च्यात्य वसाहतींच्या अधिपत्याच्या काळात, ख्रिश्चन मिशनर्यांनी स्थानिक लोकांचे व्यापक प्रमाणात धर्मांतरण केले. इस्लाम कबुल करण्यासाठी इस्लामवाद्यांनी क्रूरपणे बळाचा वापर केला. गोव्यातील कॅथॉलिक चर्चने अन्वेषणच्या नावाखाली हजारो मंदिरे उद्धवस्त केली आणि सुमारे ४०० वर्षे हिंदूंची कत्तल केली. भारताच्या संस्कृतीला अनुसरून बौद्ध भिख्खूंनी कधीही बळजबरीने धर्मप्रसार केला नाही. स्वामी विवेकानंदांनी केवळ आपल्या बुद्धीने आणि युक्तिवादाने लोकांची मने जिंकली. त्यांना कधीही मोहात पाडले नाही किंवा घाबरवले नाही. ही खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची विशेषता आहे.
जागतिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या बौद्धधर्म अतिशय महत्वाचा आहे. खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक चळवळ झाली ती तथागत भगवान बुद्धांच्या काळात. त्याचे कारणही महत्वाचे होते. बुद्धांनी चार आर्यसत्ये सांगितली, १) दुःखाचे अस्तित्व - दुःख आर्यसत्य, २) दुःखाचे कारण - दुःख समुदय आर्य सत्य, ३) दुःखाचे निवारण – दुःख निरोध आर्य सत्य, ४) दुःख निवारण्याचा मार्ग – दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्यसत्य.
तथागतांनी सांगितलेल्या त्रिसरण पंचशिलाच्या पालनाने आपले जीवन नक्कीच समृद्ध होईल इतके सामर्थ्य पंचशीलामध्ये आहे.
१)पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजेच मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.
२)अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजेच मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.
३)कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजेच मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.
४)मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजेच मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.
५)सुरा मेरय मज्ज-पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी म्हणजेच मी मद्य, मादक तसेच सर्व मोहांत पाडणाऱ्या नशादायक वस्तूंच्या सेवानांपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो.
भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे सर्व गोष्टींचा मध्य बिंदू मानवी मन आहे.
मन सर्व वस्तुत श्रेष्ठ आहे. ते सर्वावर अंमल चालवते, त्याची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख केंद्र आहे. मनातून चांगले-वाईट उत्पन्न होते. म्हणून मनाच्या संस्कारावर लक्ष पुरवणे आवश्यक आहे. भगवान बुद्धांनी सर्व जगाला शिकवण दिली. त्यांचा सर्वात मोठा संदेश म्हणजे मानवांची समानता. समानतेचे महान उपदेशक असलेल्या बुद्धांनी घोषित केले होते की, प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला अध्यात्म प्राप्त करण्याचा समान अधिकार आहे. त्यांनी निर्वाणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले होते. जन्माधिष्ठित विशेषाधिकार वा भेदभावांविरूध्द उठाव करण्यास शिकवले.
बौद्ध धर्म अनेक देशांमध्ये आजही अस्तित्वात आहे ताज्या जनगणनेनुसार जगातील ९ ते १० टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करत आहे. कंबोडिया, थायलंड, म्यानमार, भूतान, श्रीलंका, लाओस तसेच मंगोलियातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या बौद्ध आहे. चीन,जपान, सिंगापूर, तैवान, दक्षिण कोरिया, मलेशिया, मकाऊ व्हियेतनाम, हॉंगकॉंग तसेच उत्तर मारियाना बेटांवर मोठ्या प्रमाणावर बौद्ध बांधव आहेत.
संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या धर्माचा उद्गाता आपल्या भारतवर्षात जन्मला हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. जन जनमें हो समता, लक्ष्य हमनें माना हैं! सब समाज को लिए साथमें आगे हैं बढते जाना! करुणेचा हुंकार असलेल्या मानवतावादी तथागत गौतम बुद्धांना कोटी कोटी वंदन!
डॉ. सुनिल दादोजी भंडगे
अध्यासन प्रमुख,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन
- डॉ. सुनील भंडगे (dr. sunil bhandage)
Share With Friends
अभिप्राय
अभिप्राय लिहा