देशाचा इतिहास तपासला तर फितुरी आणि भेदाभेचाने समाज ग्रासला होता. देशभक्तीचा भाव जागृत केला तर समाजातील भेदाभेद नष्ट होईल, अशे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबीर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वडगाव नगर शस्त्रपूजन उत्सवात ते बोलत होते.

संघटित, देशभक्त व चारित्र्यवान नागरिकांचा देश असावा या उद्देशाने डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. येत्या विजयादशमीला संघ शताब्दी वर्षात पदार्पण करीत असून सेवा, संपर्क व प्रचार या त्रिसुत्रीचा वापर करुन संघ स्वयंसेवकांनी संघकार्याचा विस्तार करावा, असे प्रतिपादन विनायकराव डंबीर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वडगाव नगराच्या शस्त्रपूजन उत्सव प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. वडगाव बुद्रुक येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळेच्या प्रांगणात हा शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाला. यावेळी सिंहगड भागाचे संघचालक सुनील राऊत व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संग्राम बाळासाहेब पवार हे व्यासपीठावर विराजमान होते.
डंबीर पुढे म्हणाले की,"संघ स्थापन होण्यापूर्वीचा इतिहास तपासला तर फितुरी, भेदाभेद याने समाज ग्रासला होता आणि देशभक्तीचा भाव जागृत करणे हाच त्यावर इलाज आहे असे डॉ हेडगेवार यांना वाटले. देशभक्तीभाव जागृत असता तर मोजक्या संख्येत आलेल्या इंग्रजांना या देशावर राज्य करताच आले नसते." आजही या देशात हिंदूंना डिवचण्याचे अनेक प्रकार घडतात असे सारसबाग व त्र्यंबकेश्वर येथील घटनांचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितले.
आज समाजातील वातावरण गढूळ झाले असून देशाचा विचार करण्यापेक्षा स्वजातीचा विचार करण्याची वृत्ती बळावली असल्याने सामाजिक समरसता अधिक बळकट करण्यावर त्यांनी जोर दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवकांची जात कधीच विचारली जात नाही असे सांगून महात्मा गांधी यांनी वर्धा येथील शिबिराला भेट दिल्यावर संघ कार्याचे कौतुक केल्याचे उदाहरण दिले. आज एक लाख सहा हजार सेवाकार्य माध्यमातून संघ स्वयंसेवक देशातील सेवावस्तीत विविध प्रकारचे सेवाकार्य करीत असून सेवा कार्यातून व्यक्ती परिवर्तन, व्यक्ती परिवर्तनातून समाज परिवर्तन होत असल्याचे सांगितले.

संघ स्वयंसेवकांसाठी त्रिसुत्री -
आज कुटुंबातील व्यक्तींचा आपापसातील संवाद कमीकमी होत असून कुटुंबातील संवाद बळकट करण्यासाठी भरीव प्रयत्न होण्यावर त्यांनी जोर दिला. संघ स्वयंसेवकांनी सेवा, संपर्क व प्रचार या त्रिसुत्रीचा वापर करुन एक लाख शाखा हे उद्दिष्ट साध्य करावे असे आवाहन केले. प्रमुख अतिथी संग्राम पवार यांनी स्वतःचे मनोगत थोडक्यात व्यक्त केले. व्यवसाय करीत असतांना सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत असतो असे सांगून व्यासपीठावरुन बोलण्यापेक्षा संघ स्वयंसेवकांसमवेत मैदानावर काम करायला आवडेल असे मनोगत व्यक्त केले.
वडगाव नगराचे सह कार्यवाह आप्पासाहेब मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. वडगाव नगराचा भौगोलिक विस्तार सांगून मागील एक वर्ष कालावधीत झालेल्या कामांचा आढावा मांडला. वडगाव नगरात १६ शाखा असून ७ स्वयंसेवक पूर्णवेळ प्रचारक निघाले असून रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वेळी अक्षता वितरण, सरसंघचालक पू मोहनजी भागवत यांचा मृत्युंजय शाखा प्रवास, कौटुंबिक एकत्रीकरण, विविध संस्कारवर्ग संचालन इत्यादी बाबी नमूद केल्या. त्याचवेळी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी शाळा, ज्ञानसाधना शाळा, चंद्रकांत दांगट पाटील विद्यालय या शाळा व्यवस्थापनाचे तसेच पोलिस, मनपा यांचे आभार व्यक्त केले. सेवाकर्मी, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वबोध व नागरी शिष्टाचार या पंचसूत्री आधारे वडगाव नगर कार्य करीत असल्याचे सांगितले.
नगर कार्यवाह राजेंद्र पुराणिक यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संघ स्वयंसेवकांनी काही प्रात्यक्षिके सादर केली. त्यात दंडासह काही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सांघिक गीत, सुविचार, सुभाषित, वक्ता परिचय, पाहुण्यांचे स्वागत व वैयक्तिक गीत सादर झाले.
याप्रसंगी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.