पुणे, दिनांक 7 ः गणवेशातील स्वयंसेवकांची शिस्तबद्ध कवायत, घोषाचे रणभेदी वादन, अंगावर शहारा आणणारे दंडयुद्ध, ताकदीचा कस पाहणारे नियुद्ध आणि व्यायामयोगाच्या प्रात्यक्षिकांनी पुण्यातील 37 मैदानांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव पार पडला.
विजयादशमी निमित्त पुणे महानगरातील नऊ भागांत 37 स्थानांवर संघाचा शस्त्रपूजन उत्सव पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे प्रमूख पाहुणे कार्यक्रमांना उपस्थित होते. समाजासमोरील आव्हाने, स्वयंसेवकांची कर्तव्ये आणि शताब्दी वर्षात प्रवेश करणारा संघाच्या वाटचालीबद्दल वक्त्यांनी मांडणी केली. पुणे महानगरातील हजारो सस्वयंसेवकांनी संपूर्ण गणवेशात उत्सवाला हजेरी लावली. विजयादशमीच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी स्वयंसेवकांची सघोष पथसंचलने आयोजित करण्यात येणार आहे.
कात्रज भागाच्या उत्सवात जनकल्याण समितीचे प्रांत संघटन मंत्री पराग कंगले, भागाचे संघचालक शिवाजीराव मालेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संतोष कुंजीर उपस्थित होते. यावेळी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी संघाच्या समर्थक किंवा हितचिंतक होऊ नका. तर स्वयंसेवक व्हा असे आवाहन कंगले यांनी केले. कंगले म्हणाले,"आपल्या परंपरेत विजयादशमी हा उपासनेचा दिवस आहे. असुरी शक्तीवरती विजयाचा दिवस आहे. पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी याच दिवशी संघाची स्थापना केली. याच दिवशी पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बंधू भावाचा उद्घोष करणाऱ्या बौद्ध मताचा स्वीकार केला. हिंदू समाज संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि योग्य नीति स्थापित करण्यासाठी कार्यरत आहे. "
---
विद्यापीठ भागात प्रांत धर्मजागरण प्रमूख श्रीनिवास पुलय्या यांनी विषय मांडणी केली. यावेळी उद्योजक बाबू आगेल्लू, सुरेश नाईकरे, अनिल देशमुख, डॉ. अविनाश वाचासुंदर व्यासपीठावर होते. तर पुणे महानगरातील कात्रज भागातील धनकवडी नगराच्या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवव्याख्याते गणेश ढालपे, प्रजापीता ब्रह्मकुमारी सुलभा दीदी तसेच नगर कार्यवाह बाळासाहेब बोत्रे उपस्थित होते. महानगरात असे 37 ठिकाणी उत्सव आयोजित करण्यात आले होते.
शताब्दी वर्षातील पंचसुत्री ः
संघाच्या शताब्दी वर्षात आपला समाज सक्षम व निर्दोष होण्यासाठी संघाने येत्या काळात पंचसूत्रींवर भर देण्याचे ठरविले आहे. कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्व-बोध, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक कर्तव्य हे करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी एकत्र यायला हवे. समाज निर्दोष व संघटित होण्यासाठी, आपली सर्वांची जबाबदारी समजून नित्यनियमाने करण्याची गोष्ट आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा समावेश अगदी सहजपणे करता येईल. आणि त्याचा परिणाम फक्त कौटुंबिक पातळीवर नव्हे तर भविष्यात सर्व जगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल यात शंका नाही, असे आवाहन स्वयंसेवकांना करण्यात आले आहे.
----
प्रथम वर्ष शिक्षित स्वयंसेवक
अमर अंबादास पाटील
07 Oct 2024 21:29