क्रीड़ा-भारती - क्रीडा क्षेत्रातील एकमेव सामाजिक संघटन

प्राचीन काळापासून, भारतीय जीवनात खेळ फक्त मनोरंजनाचे साधन नसून, व्यक्ती निर्माण, सामाजिक समरसता आणि राष्ट्रशक्तीचा स्रोत आहे. आपण आपल्या लहानपणापासून रामायण आणि महाभारताच्या कथा ऐकत आलो आहोत, पण कदाचितच कुणी भारताच्या त्या प्राचीन इतिहासात लपलेल्या आजच्या जवळजवळ सर्व आधुनिक खेळांच्या उगमाचा विचार केला असावा. ढोलावीरा आणि राखीगढ़ी येथे पुरातत्व विभागाच्या संशोधनातून समोर आलेले हजारो वर्षांपूर्वीचे भव्य क्रीडा संकुलांचे (स्टेडियम्स) अवशेष आपल्या क्रीडा वैभवाचे थेट साक्षीदार आहेत. आपल्या प्राचीन इतिहासात, बाली आणि सुग्रीव यांचे मल्ल युद्ध, रावण वधानंतर जांबवंतांची श्रीरामाशी कुस्ती करण्याची इच्छा, जी 2000 वर्षानंतर भगवन श्रीकृष्णाने पूर्ण केली, मथुरेत कंसाद्वारे श्रीकृष्ण आणि बलरामच्या स्वागतासाठी आयोजित मल्लयुद्ध स्पर्धा, भारताच्या गुरुकुलांमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शास्त्रासह शस्त्रविद्येचे स्पर्धात्मक परीक्षण, द्रौपदीच्या स्वयंवरातील लक्ष्यवेध, गुप्त आणि मौर्य काळात लिहिलेल्या साहित्यामध्ये आलेले खेळांचे संदर्भ आणि नाण्यावर अंकित खेळ, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील द्वंद्व स्पर्धा... या सर्व गोष्टी भारतात उगम पावलेल्या आणि विकसित झालेल्या खेळांच्या दीर्घ परंपरेच्या साक्षीदार आहेत.
कालांतराने अनेक हल्ले आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही भारतीयांच्या मनातील खेळांची जाणीव कधीही संपली नाही. स्वातंत्र्यापूर्वीच भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भाग घेऊ लागले होते. स्वातंत्र्यानंतर देशात विशाल युवा शक्ती, नैसर्गिक प्रतिभा आणि खेळांप्रती सहज प्रेम असूनही या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी एक मजबूत, राष्ट्रीय, संस्काराधारित आणि समाजव्यापी व्यवस्थेची आवशक्यता भासू लागली.
विभिन्न खेळांचे वेगवेगळ्या संघटना अस्तित्वात होत्या, परंतु असा एक व्यापक मंच आवश्यक होता जो जगभरातील सर्व खेळ गावागावांपर्यंत पोहोचवू शकेल, तसेच पारंपरिक भारतीय खेळांना नवे जीवन देईल, त्यांचा सन्मान वाढवेल, व्यक्तीला खेळाशी जोडेल, खेळाडूंचे शरीर, मनोबल आणि संस्कार मजबूत करेल, आणि खेळांना फक्त पदकांपुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रनिर्मिती प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग बनवेल. याच सकारात्मक विचारातून क्रीड़ा भारती या सामाजिक संघटनेचा उदय झाला. क्रीड़ा भारती हे असे संघटन आहे जे केवळ निवडक खेळाडू, प्रशिक्षकांसाठी काम न करता संपूर्ण समाजात खेळभावना, शिस्त, स्वास्थ्य, ऊर्जा, राष्ट्रीय भावना आणि सांस्कृतिक चेतनेचा प्रसार करते.
भारतीय खेळातील प्रामाणिकपणा, चारित्र्य आणि राष्ट्राप्रति समर्पण या हरवू पहात असलेल्या गुणांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने, तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये निरूत्साह, पराजयाची मानसिकता, भ्रष्टाचार, साधन सामुग्रीची कमतरता यामुळे क्रीडा क्षेत्राची प्रगती होत नाही हे लक्षात आल्यामुळे आणि सशक्त व चारित्र्यवान तरुण तरुणी हाच देशाच्या उज्वल भविष्याचा पाया आहे हे ओळखून स्व. दामुआण्णा दाते व स्व. श्रीपती शास्त्री यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसमोर क्रीडा क्षेत्रासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे, असे सुचविले. खेळाडूंना एकत्र करण्यासाठी प्रथमच सन १९८६-८७ मध्ये खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पुण्याच्या संघ कार्यालयात सन्मान केला. ९ डिसेंबर १९९० रोजी खेळाडूंसाठी काय करता येईल या विषयावर विचार करण्यासाठी मॉडर्न हायस्कूल पुणे येथे पहिली बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय विचारांनी क्रीडा क्षेत्रात काम करणार्या संघटनेची आवश्यकता लक्षात घेऊन ’क्रीड़ासे निर्माण चरित्र का और चरित्र से निर्माण राष्ट्र का।‘ असे ब्रीद वाक्य घेऊन स्वतःच्या आंनदासाठी खेळ, सर्वांच्या आरोग्यासाठी खेळ, देशाच्या गौरवासाठी खेळ अशी सामाजिक चळवळ निर्माण करण्यासाठी १९९२ च्या चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला पुण्यामध्ये क्रीड़ा-भारती या अखिल भारतीय संघटनेची स्थापना झाली.
यापैकी काही बैठकांच्या आयोजन प्रक्रियेत सहभागी होण्याचे मला एका तरुण कार्यकर्त्याच्या नात्याने भाग्य प्राप्त झाले. संस्थापक कार्यकारिणी, घटना इत्यादी तयार झाल्यानंतर, ४ डिसेंबर १९९२ रोजी संघटनेला विधिवत मान्यता मिळाली आणि इतिहासातील आदर्श खेळाडू हनुमान, यांच्या जयंतीपासून क्रीड़ा भारतीचे कार्य प्रत्यक्षरित्या सुरू झाले. मा. कार्याध्यक्ष श्रद्धेय मुकुंदराव आंबर्डेकर जी आणि मा. महामंत्री व कोषाध्यक्ष श्री. राज चौधरी जी यांनी कार्यभार स्वीकारला. स्व. आंबर्डेकर जी २०१२ पर्यंत कार्याध्यक्ष राहिले आणि श्री राज जी सुरुवातीपासून आजपर्यंत महामंत्र्याच्या भूमिकेत, क्रीड़ा भारतीच्या यशस्वी इतिहासाचे साक्षीदार आहेत. संघटनेच्या विस्तारासाठी प्रथम संपूर्ण महाराष्ट्रात आणि गेल्या १८ वर्षांपासून संपूर्ण भारतात त्यांचा अविरत प्रवास सुरू आहे.
खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक आणि असंख्य क्रीडाप्रेमी नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून क्रीड़ा-भारतीचे सामाजिक संघटन विकसित होत गेले. सुरवातीला महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले काम नंतर संपूर्ण भारतभर पसरले. २००९ मध्ये क्रीड़ा-भारती ने अखिल भारतीय रूप घेतले आणि श्री. चेतनजी चौहान यांच्या अध्यक्षतेखाली व मा. महामंत्री श्री. राजजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने वाटचाल सुरू केली. देशातील प्रत्येक राज्यात आणि एकूण ६०० पेक्षा जास्त जिल्ह्यात आता क्रीड़ा-भारती चा विस्तार झाला आहे. अधिकाधिक लोकांनी रोज मैदानावर यावे, स्वतःची क्षमता आणि आवड याला अनुरूप असा कोणताही खेळ खेळावा त्यातून वैयक्तिक आणि स्वाभाविकच संपूर्ण देशाचे आरोग्य चांगले राहावे आणि सुदृढ व सशक्त समाज निर्माण व्हावा हे क्रीड़ा-भारती चे ध्येय आहे.
‘क्रीडा वृत्त्या सदाचारो राष्ट्रदेव: कृती युवा’ या घोष वाक्याप्रमाणे क्रीड़ा भारतीचे काम अविरत चालू आहे. म्हणजेच खेळ विश्वात सौहार्दपूर्ण भावना, क्रीडावृत्ती निर्माण करणे, भारतीय क्रीडा क्षेत्र भ्रष्ट्राचार, वशिलेबाजी आणि सर्व वाईट प्रवृत्तींपासून मुक्त असावे, भारतीय क्रीडा क्षेत्राला जगात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, या साठी क्रीड़ा-भारती चे सर्व कार्यकर्ते अविरत प्रयत्न करत आहेत.
सक्षम महिला अभियान, खेळाच्या माध्यमातून आरोग्यप्राप्तीसाठी समर्थ भारत अभियान असे अनेक उपक्रम क्रीड़ा भारती तर्फे देशभर चालू आहेत. चारित्र्य निर्माण आणि त्यायोगे आपल्या संस्कृतीचा व आपल्या देशाचा परिचय. खेळ, खेळाचे मैदान यातून राष्ट्रभक्ती, राष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवणे, खेळाचा अधिकार (राईट टू प्ले) आणि खेळ हेच आरोग्यप्राप्तीचे उत्तम साधन याचा सतत पाठपुरावा त्याच बरोबर सूर्यनमस्कार आणि योगासने यांच्या प्रसारासाठी क्रीड़ा-भारती कटिबद्ध आहे.
देशाच्या अमृत काळात क्रीड़ा भारतीने मांडलेल्या आणि पाठपुरावा केलेल्या अनेक कल्पना, योजना यांना आता सरकार कडून सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘खेलो-भारत’, ‘फिट इंडिया उपक्रम’, नवीन शैक्षणिक धोरणात खेळ विषयाला दिलेले प्राधान्य, खेळ आणि खेळाडू यांच्याप्रति सर्व स्तरावर वाढती प्राथमिकता, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशाची वाढती कमान अश्या अनेक गोष्टी क्रीड़ा-भारती ला साफल्याचा आंनद देत असतानाच योग्य मार्गावर वाटचालीचे समाधान आणि भविष्यासाठी प्रेरणा सुद्धा देतात.
क्रीड़ा भारतीने सुरूवातीला सूर्यनमस्कारचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन सूर्यनमस्कार संगीतावर शिकविणे, स्पर्धा घेणे असे कार्यक्रम केले. सूर्यनमस्काराव्यतिरिक्त आणखी काय काय कार्यक्रम होऊ शकतात याचा सारासार विचार करुन संपूर्ण समाज बरोबर घेऊन जाण्यासाठी व भारतातील खेळाडूंमध्ये राष्ट्रभाव निर्माण करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम ठरवले.
1. सूर्यनमस्कार - रथसप्तमी (माघ शु. ७) – क्रीड़ा भारती तर्फे दरवर्षी विविध उपक्रमांद्वारे रथसप्तमी साजरी केली जाते. या दरम्यान सूर्यनमस्काराचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र केला जातो. सूर्यनमस्काराचे महत्व शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना कळावे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा शास्त्रशुद्ध प्रसार व्हावा हा उद्देश आहे. सांगलीच्या कार्यक्रमात हिंद केसरी पै स्व. विष्णू सावर्डे जी आणि कोल्हापूरच्या एका अन्य कार्यक्रमात हिंद केसरी पै स्व. गणपतराव आंदलकर जी उपस्थित होते. आंदलकर जी हे आजीवन क्रीड़ा भारतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते.
2. हनुमान जयंती-क्रीड़ा भारती स्थापना दिवस (चैत्र पौर्णिमा) – भारतीय इतिहासातील तसेच संस्कृतीमधील उच्यतम शारीरिक क्षमता आणि बुद्धिमत्ता याचे प्रतीक म्हणजे श्री हनुमान. हनुमंताचे भारतीय संस्कृतीत अव्दितीय स्थान आहे. श्री हनुमान जयंती हा क्रीड़ा भारती चा स्थापना दिवस विविध उपक्रमातून व्यापक जनसंपर्क आणि जन जागृती मधून तसेच क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटना, अनेक नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू यांच्या उपस्थितीत दरवर्षी साजरा केला जातो.
3. स्व. मेजर ध्यानचंद जयंती-राष्ट्रीय क्रीडा दिवस (२९ ऑगस्ट) - स्व. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा आपण राष्ट्रीय खेल दिवस म्हणून साजरा करतो. ध्यानचंदजी म्हणजे शब्दशः हॉकी चे जादूगार! ज्यांच्या खेळामुळे भारताला सलग ३ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाले. ज्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी मध्ये २३ वर्षाच्या कारकिर्दीत १८५ मॅच खेळताना ५७० गोल केले आणि आजही हा विक्रम अबाधित आहे. अत्यंत प्रतिभावान, रात्र रात्र जागून मैदानावर कठोर परिश्रम घेणारा आणि विजयाची तीव्र इच्छा सतत बाळगणारा हा खेळाडू निश्चितच जगातील अगदी मोजक्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक. अलौकिक प्रतिभा, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि देशाप्रती संपूर्ण समर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मेजर ध्यानचंद! खेळातील कौशल्याइतकेच किंबहुना त्याही पेक्षा अधिक महत्वाचे असे त्यांचे राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राप्रती समर्पण सतत देशासमोर, नवोदित खेळाडूं समोर राहिले पाहिजे म्हणून २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस भारताचा राष्ट्रीय खेळ दिवस झाला! या निमित्ताने पुणे महानगर हे दरवर्षी डॉ. हेडगेवार एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करते. आत्ता पर्यंत सलग १० वर्ष या स्पर्धेचे अतिशय यशस्वी रित्या आयोजन केले आहे.
4. क्रीडा ज्ञान परीक्षा – क्रीडा ज्ञान परीक्षा हा क्रीड़ा भारतीचा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्या मध्ये खेळाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच त्यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी क्रीड़ा भारती तर्फे दरवर्षी ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेस संपूर्ण देशभरातून २,२५,००० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभाग नोंदवतात. २५ मिनिटात ५० प्रश्न सोडवणे असे या परीक्षेचे स्वरूप असते. सर्व प्रश्न हे खेळाविषयी आणि बहुपर्यायी असतात. सर्व कुटुंबाने किंवा मित्र मैत्रिणींनी एकत्र बसून परीक्षा देण्याचा आनंद घ्यावा यातूनच त्यांच्यात खेळाविषयी कुतूहल आणि जागरूकता निर्माण व्हावी हा या मागचा हेतू. या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या २५ वर्ष वयोगटा पर्यंत च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर आकर्षक रोख बक्षिसे देखील दिली जातात.
5. जिजामाता सन्मान पुरस्कार - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा, त्यांच्या मार्गदर्शकांचा सन्मान, सत्कार सर्वत्र केला जातो. पण त्या खेळाडूच्या यशात महत्वाचा वाट असणाऱ्या आईचा मात्र कुठेही उल्लेख किंवा सन्मान केला जात नाही. एक खेळाडू घडण्यामागे जितके त्याच्या प्रशिक्षणाचे आणि त्या खेळाडूचे कष्ट असतात तितकेच कष्ट हे त्याच्या मातेचे असतात. आपल्या मुलांसाठी ती माता अनेक त्याग करते, कठीण परिस्थितीला सामोरी जाते. जिजाबाईंनी ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले तसेच ती आई आपल्या मुलांना घडवते. अश्या मातेचा क्रीड़ा भारती 'जिजामाता सन्मान पुरस्कार' देऊन सन्मान करते. जिजामाता सन्मान पुरस्कार हा कायमच भावनिक कार्यक्रम होतो. आपल्या मुलांसाठी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले हि भावना त्या मातेच्या मनात असते आणि आपल्या आईचा सन्मान केला जात आहे ह्या भावनेने त्या खेळाडूला आनंद झालेला असतो. असा हा जिजामाता सन्मान पुरस्कार सोहळा भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात होतो. गेल्या वर्षी नुकत्याच अखिल भारतीय स्तरावर पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये, पी. आर. श्रीजेश, नीरज चोप्रा, अवनी लेखरा, लवलिना बोर्गोहेन, दीपा कर्माकर, विवेक सागर प्रसाद यांच्या मातांना देण्यात आला.
१९९७ मध्ये स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने क्रीड़ा भारती तर्फे शनिवार वाडा, पुणे पासून गेटवे ऑफ इंडिया, मुंबईपर्यंत ४७५ किलोमीटर लांब 'अल्ट्रा रिले मॅराथॉन' आयोजित करण्यात आली. संभाजीनगरमध्ये डॉ. हेडगेवार यांच्या नावाने अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधून एकूण ५४ संघांनी सहभाग घेतला. स्वाभाविकरित्या क्रीड़ा भारतीचा संदेश देशाच्या अनेक राज्यांमध्ये पोहोचला. मुंबई विद्यापीठ आणि क्रीड़ा भारतीच्या संयुक्त प्रयत्नाने आयोजित कार्यशाळेत भारतीय क्रीडा संस्कृतीला बळकट करण्याचा संकल्प केला. ‘क्रीडा विद्यापीठ’ही कल्पना आणि ग्रामीण पातळीवर खेळाचा प्रसार करण्याची मूलभूत विचारधारा “जेथे गाव तिथे खेळ आणि मैदान”याला विशेष महत्त्व दिले. प्रत्येक गावात विविध ‘क्रीडा केंद्रे’सुरु करण्याचे निर्णय देखील या कार्यशाळेत घेण्यात आले. डोंबिवली येथे आयोजित अखिल भारतीय संगोष्ठीमध्ये शिक्षणाच्या अभ्यासक्रमात खेळांचा समावेश व्हावा आणि त्याला 'अनिवार्य विषय' म्हणून ठेवावे यावर विशेष भर देण्यात आला. खेळ फक्त हार जीत आणि स्पर्धेपुरता मर्यादित नसून, शिक्षण, आरोग्य, सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रनिर्मितीच्या साधनांमध्ये रूपांतरित व्हावा, हा प्रयत्न क्रीड़ा भारती सुरूवातीपासून करत आलेली आहे.
क्रीड़ा भारतीची लोकप्रियता वाढली तशी संघटनेचा विस्तार संपूर्ण भारतात वाढवण्याची आवश्यकता देखील निर्माण झाली. २००८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय सभेसमोर हे विचार मांडले गेले. त्याच वर्षी डोंबिवली येथे आयोजित बैठकीत सर्व प्रांतांमधून आलेल्या प्रतिनिधींशी रूपरेषा तयार करण्यात आली. २८ जून २००९ रोजी नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सहसर्कारवाह श्री. मदन दास जी देवी, अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख श्री. लक्ष्मण राव पार्डीकर जी यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली, ज्यात अखिल भारतीय कार्यकारिणीची विधिवत जाहीर घोषणा करण्यात आली: अध्यक्ष श्रद्धेय चेतन जी चौहान (दिल्ली), उपाध्यक्ष- श्री नारायण सिंह राणा (देहरादून), कार्याध्यक्ष स्व. मुकुंदराव अंबर्डेकर (पुणे), महासचिव श्री राज जी चौधरी (पुणे); त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य गतीमान झाले. २०१२ मध्ये स्व. मुकुंदराव जी यांच्या आरोग्य समस्येमुळे पार्डीकर जी यांनी कार्याध्यक्षाचे जबाबदारी सांभाळली परंतु २०१५ मध्ये त्यांचे वाहन प्रवास दरम्यान आकस्मिक निधन संघटनेसाठी मोठे दु:खद ठरले. २०१५ पासून कार्याध्यक्ष म्हणून श्री चेतन्य कुमार काश्यप जी आणि स्व. चेतन जी यांच्या निधनानंतर अध्यक्ष म्हणून श्री गोपाल सैनी जी संघटनेचे नेतृत्व करत आहेत. सार्वजनिक रूपाने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची रचना आहे आणि संघटनात्मक कार्य आणि धोरण निर्धारणासाठी केंद्रीय नियामक मंडळासह कार्याध्यक्ष, महासचिव, मंत्री, सहमंत्री, कोश प्रमुख अशी रचना आहे. संपर्क, प्रचार, युवा, मातृशक्ती, दिव्यांग, क्रीडा केंद्र आयाम तसेच कार्यविभागांची रचना देखील केंद्रीय तसेच प्रांत स्तरावर कार्यरत आहे. केंद्रीय, प्रांत आणि जिल्हा स्तरावर सर्व कार्यकर्ते तसेच सर्व आयाम, कार्यविभागांच्या नियमित बैठका आणि प्रशिक्षण वर्गांच्या रचनेमुळे संघटना नेहमी अद्ययावत राहते आणि कार्यकर्ते तत्पर आणि उत्साही राहतात.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त देशाच्या सन्मानार्थ आयोजित 'क्रीड़ा भारती सोबत राष्ट्राची प्रदक्षिणा - एकत्र, एकाच वेळी' कार्यक्रमात, २२ मे २०२२ रोजी एका दिवसात एका वेळेस २३३ ठिकाणांवरून प्रारंभ करून १८,००० किलोमीटर अंतर पार करत १८,००० पेक्षा जास्त युवक-युवतींनी १४,००० बाइकवर संपूर्ण भारताची प्रदक्षिणा केली. या कार्यक्रमात तामिळनाडू आणि बंगालमधील कार्यकर्त्यांचा प्रेरणादायी संघर्ष क्रीड़ा भारतीच्या विस्ताराचा पाया ठरला. स्वामी रामदेव जी आणि गीता परिवारासोबत ७५ कोटी सूर्य नमस्कारांच्या गिनीज रेकॉर्डमध्ये क्रीड़ा भारतीचे महत्वाचे योगदान राहिले. या वर्षीही संघ शताब्दीच्या सन्मानार्थ, संपूर्ण देशात कबड्डी स्पर्धांच्या मालिकेचे मोठे आयोजन आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० संघ तयार व्हावेत व गाव-गावांमध्ये स्पर्धा पार पडाव्यात, संपूर्ण देश खेळमय व्हावा अशी योजना आहे.
लहान वयात मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी. त्यांची विविध खेळांशी ओळख व्हावी. क्षमतेनुसार आणि आवडीनुसार मुलांना खेळ खेळता यावा. लहान वयातच प्रामाणिकपणा आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार व्हावे आणि त्यातून त्या त्या खेळातील राष्ट्रीय यंत्रणेला एक चांगले रॉ मटेरियल सहज उपलब्ध व्हावे म्हणून देशभर अनेक ठिकाणी क्रीड़ा भारतीच्या वतीने 3000 हून अधिक क्रीडा केंद्र स्वयंचलित किंवा संलग्न स्वरूपात चालवली जातात. या क्रीडा केंद्रांमध्ये प्रत्येकाने विविध खेळांची ओळख करून घ्यावी आणि आपली क्षमता आणि आवड याला अनुसरून पुढील प्रगती करावी हा उद्देश आहे. सूर्य नमस्कार आणि मल्लखांब प्रशिक्षणाची एक नैसर्गिक रचना तयार करणे, त्यांच्या प्रशिक्षकांची निर्मिती करणे आणि सूर्य नमस्कार व मल्लखांब जनतेपर्यंत पोहचवणे ह्यासाठी मागील 3 वर्षांपासून काम प्रगतीवर आहे.
संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांना एकत्र करून, सर्व कार्यकर्ते एकमेकांना भेटतील, आपापले अनुभव एकमेकांना सांगतील, प्रशिक्षण, योजना, कार्याच्या विशाल स्वरूपाचा अनुभव या दृष्टीने, प्रत्येक ३ वर्षांनी संघटनेचे एक राष्ट्रीय अधिवेशन व्हावे अशी रचना २०१२ पासून तयार झाली. रतलाम २०१२, जयपूर २०१५, धनबाद २०१८, लखनौ २०२२ आणि या वर्षी कर्णावतीत अधिवेशन पार पडले. भारताच्या क्रीडा क्षेत्राला अधिक गतिशील आणि प्रभावी बनवण्यासाठी खेळावर असलेल्या अनावश्यक बंधनांपासून खेळाला मुक्त करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कार्णावती अधिवेशनात एक प्रस्ताव पारित करण्यात आला. खेळ हा एक मूलभूत हक्क असावा. खेळाडूला कोणत्याही सदस्यत्व किंवा संबद्धतेपासून स्वतंत्र राहून खेळण्याचा अधिकार असावा. कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था/संघटनेला राष्ट्रीय निवड प्रक्रिया/चँपियनशिप सोडून स्पर्धा/लीग आयोजनाचे स्वातंत्र्य असावे. खेळाडूंवर, प्रशिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार स्वतंत्र न्यायाधिकरणाकडे असावा. निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक केली जावी आणि प्रत्येक खेळाडूला मैदान सहज उपलब्ध असावे, तसेच प्रत्येक खेळाचे मैदान फक्त खेळासाठी संरक्षित असावे हे प्रस्तावाचे मुख्य मुद्दे आहेत. केंद्र सरकार, सर्व राज्य सरकार, सर्व क्रीडा संघटना यांनी एकत्र येऊन हा प्रस्ताव स्वीकारावा आणि भारताच्या क्रीडा क्षेत्राला पूर्णपणे पारदर्शक, मुक्त आणि प्रगतिशील बनवावे असे क्रीड़ा भारतीचे आवाहन आहे.
क्रीड़ा भारतीच्या या कामातून समाजात निर्माण होणारी जागरूकता, शासकीय स्तरावर निर्माण झालेला उत्तम संवाद, बदलत्या काळात सरकार, प्रशिक्षक, खेळाडू यांच्याकडून मिळणारा अतिशय सकारत्मक प्रतिसाद आणि त्याचा दृश्य परिणाम हे सुद्धा आता प्रकर्षाने जाणवू लागले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने काही तरी खेळ खेळावा आणि याची सुरवात शाळेतून व्हावी, व्यक्तिमत्व विकासात अभ्यासाच्या जोडीचे स्थान खेळाला असले पाहिजे ही क्रीड़ा-भारती ची सुरवातीपासून ची मागणी आता राष्ट्रीय शिक्षण धोरणात ठळकपणे नजरेत भरते. क्रीड़ा भारतीने व्हिजन म्हणून ठेवलेले विविध विषय जसे कि खेळ फक्त निवडक खेळाडूंसाठी नाही तर संपूर्ण समाजात जनआंदोलन म्हणून उभे राहावे, देशात क्रीडा संस्कृती प्रस्थापित व्हावी, खेळातून सामाजिक समरसता, हे या नीतीमध्ये स्पष्टपणे प्रतिबिंबित झाले आहेत. आता "खेलो भारत नीती - 2025" मध्ये एका नवीन दिशेने आणि नवीन आशेने खेळजगताच्या उज्ज्वल भविष्याची आणि एका उदयोन्मुख सामर्थ्यशाली राष्ट्राची गाज ऐकू येत आहे. "क्रीड़ा से निर्माण चरित्र का और चरित्र से निर्माण राष्ट्र का " हे क्रीड़ा भारतीचे बोधवाक्य खेल नीती २०२५ च्या व्हिजन स्टेटमेंटमध्ये प्रतिबिंबित आहे Sports for Nation Building - Harness the Power of Sports for Nation's Holistic Development!
व्यक्तिमत्व विकास आणि राष्ट्र निर्माण याचा महामार्ग शाळेतील पुस्तकां इतकाच किंबहुना त्याहून जास्त खेळाच्या मैदानावर प्रशस्त होतो हे आपण सर्वांनीच जाणून घेऊन खेळाकडे वळले पाहिजे. यातूनच समर्थ, सशक्त आणि राष्ट्राप्रती प्रेम असलेला समाज निर्माण होईल याची पूर्ण खात्री आम्हा क्रीड़ा भारतीच्या कार्यकर्त्यांना वाटते.
श्री. विजय पुरंदरे
अखिल भारतीय प्रचार प्रमुख आणि नियामक मंडळ सदस्य
अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र
भारतीय परंपरा, संस्कृती व क्रीडा यांचे सखोल अध्ययन करून विचार मांडले आहेत.लेखन शैली, समर्पक शब्द योजना यांनी लेख समृद्ध आहे
राजश्री शिंदे
02 Apr 2026 15:41