•  25 Jul 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

युगप्रवर्तिका तेजतपस्विनी: वंदनीय मावशी केळकर

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 2 days ago
व्यक्तिविशेष  

युगप्रवर्तिका तेजतपस्विनी: वंदनीय मावशी केळकर

आषाढ शुद्ध दशमी हा दिवस राष्ट्रभक्ती, देशप्रेम आणि संघटनशक्तीच्या दृढ संकल्पाचा दिन म्हणून ओळखला जातो. ६ जुलै १९०५ रोजी वर्ध्यातील एका राष्ट्रभक्त कुटुंबात जन्मलेल्या 'कमल दाते' पुढे 'वंदनीय मावशी केळकर' म्हणून राष्ट्रसेवेच्या प्रवासात अजरामर झाल्या. भारतीय स्त्रीच्या सामर्थ्यावर अढळ विश्वास ठेवत, तिच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अखंड आयुष्य वेचणाऱ्या आणि 'राष्ट्र सेविका समिती' या अखिल भारतीय महिला संघटनेची पायाभरणी करणाऱ्या या युगप्रवर्तक तेजतपस्विनीच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा घेतलेला हा आढावा...

- वैचारिक वारसा आणि संघर्षातून जडणघडण : 
वंदनीय मावशींचे पूर्वाश्रमीचे नाव कमल भास्करराव दाते. दाते कुटुंब मूळचे सातारचे. आर्थिकदृष्ट्या सामान्य असले तरी वैचारिकदृष्ट्या अतिशय समृद्ध. त्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना लोकमान्य टिळकांचे ‘केसरी’ वृत्तपत्र वाचण्यास बंदी असतानाही, कमल यांच्या आई यशोदाबाई स्वतःच्या नावाने ‘केसरी’ विकत घेऊन शेजारच्या महिलांना ते एकत्र वाचून दाखवत. हाच राष्ट्रप्रेमाचा आणि सामाजिक भान असणारा वारसा लहानग्या कमल यांनी आत्मसात केला.

त्या काळातील सामाजिक रीतीरिवाजांनुसार अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि त्या ‘लक्ष्मीबाई पुरुषोत्तमराव केळकर’ म्हणून वर्ध्यात आल्या. पतीच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आईविना वाढणाऱ्या दोन लहान मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत लहान वयात स्वीकारली. वैवाहिक जीवन अवघे १०-१२ वर्षांचे लाभले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, लक्ष्मीबाईंनी आपल्या दुःखालाच समाजकार्याची प्रेरणा बनवले. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत त्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रभातफेऱ्या आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय राहिल्या.

- संघटन संकल्प
महात्मा गांधींचे "सीतेच्या जीवनातून राम निर्माण होतो" हे वाक्य त्यांच्या मनावर खोलवर कोरले गेले. त्यांनी रामायणाचा सखोल अभ्यास केला. समाजात आदर्श पिढी घडवायची असेल तर प्रथम स्त्री सशक्त झाली पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात दृढ झाला. महिलांना स्वसंरक्षणासाठी व राष्ट्रा उभारणीसाठी सक्षम बनवण्याचे मंथन त्यांच्या मनात सुरू होते.

याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती मिळाल्यावर, "पुरुषांप्रमाणे महिलांचे संघटन का असू नये?" असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची भेट घेतली. दीर्घ चर्चेनंतर महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त संघटना उभारण्याचा निर्णय झाला. २५ ऑक्टोबर १९३६ (विजयादशमी) रोजी वर्धा येथे 'राष्ट्र सेविका समिती'ची स्थापना झाली. "स्त्री ही केवळ कुटुंबापुरती मर्यादित न राहता राष्ट्रजीवनाची आधारशक्ती बनली पाहिजे. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा समतोल साधत समाजाला दिशा देणारी स्त्री घडविणे हेच समितीचे ध्येय ठरले."

- माणसे जोडण्याची कला आणि नेतृत्वगुण
'दोन महिला एकत्र काम करू शकत नाहीत' हा समज खोटी ठरवत मावशींनी आत्मीयतेने सेविंकांची साखळी विणली. पुण्याच्या सरस्वतीताई आपटे यांनी मावशींच्या निरहंकारी व आपुलकीच्या व्यवहाराने प्रभावित होऊन आपले कार्य राष्ट्र सेविका समितीत विलीन केले.
संघटनेच्या विस्तारासाठी त्यांनी वयाच्या चाळिशीत सायकल चालवायला शिकले आणि समाजप्रबोधनासाठी उत्कृष्ट वक्तृत्व आत्मसात केले. स्वतःमध्ये आवश्यक बदल स्वीकारत त्यांनी सेविकेसमोर आचरणाचा वस्तुपाठ ठेवला. १९४७ च्या फाळणीच्या अत्यंत कठीण प्रसंगात, प्राणाची पर्वा न करता कराचीतील सेविकांना भेटायला जाणे, हे त्यांच्या अथांग वात्सल्याचे आणि धैर्याचे उदाहरण आहे.

- शारीरिक आणि बौद्धिक विकासाचा संगम : 
समितीच्या कार्यपद्धतीत मावशींनी शारीरिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाचा सुंदर समन्वय साधला:
- शारीरिक : व्यायाम, योग, दंड, लाठी व नियुद्ध याद्वारे स्वसंरक्षणाचे धडे.
- बौद्धिक : इतिहास, संस्कृती, राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिर्मितीचे संस्कार.
- आराध्य दैवत : संरक्षण, शक्ती आणि करुणेचे प्रतीक असणारी 'देवी अष्टभुजा' ही समितीचे आराध्य दैवत बनली.

- आजच्या काळातील प्रासंगिकता : 
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात भौतिक प्रगती झाली असली तरी संस्कार, चारित्र्य आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची गरज आजही तितकीच आहे. मावशींनी लावलेल्या रोपट्याचा आज जगभर वटवृक्ष झाला आहे. राष्ट्रनिर्मिती केवळ योजनांनी होत नाही, तर ती सुसंस्कारित व कर्तृत्ववान व्यक्तींच्या निर्मितीतून होते, हाच संदेश मावशींचे जीवन आपल्याला देते.

प्रणाम घे हा कोटीकरांचा कृतज्ञतेने करितो वंदन |
राष्ट्रोन्नतीचा मार्ग दाविला, फिटेल कधी का हे तव ऋण ||

- सौ. अपर्णा नागेश पाटील – महाशब्दे


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • मावशी केळकर
  • युगप्रवर्तिका तेजतपस्विनी
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (172), कला (3), संस्कृती (42), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (67), रा. स्व. संघ आणि परिवार (86), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (11), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.