‘पूर्णम’चा दशकपूर्ती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन ही पुण्यातील नामांकित संस्था १० वर्षे कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. संस्थेचा दशकपूर्ती समारंभ रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायंकाळी टाटा हॉल, बीएमसीसी, शिवाजीनगर या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून चिपळूण येथील ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक मा. श्री. भाऊ काटदरे हे उपस्थित होते.भाऊ काटदरे यांनी त्यांच्या भाषणात,
' पर्यावरणाचा विचार डावलून भारत विश्वगुरू होऊ शकणार नाही,म्हणूनच आपल्या मूळ भारतीय संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे माणसाने निसर्गात ढवळाढवळ न करता निसर्गानूकुल वर्तन ठेवले पाहिजे.' असे आग्रहाने सांगितले. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
संस्थेद्वारे दरवर्षीप्रमाणे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रहिवासी संस्थेला आणि व्यक्तीला अनुक्रमे “पर्यावरण हितवर्धिनी” आणि “पर्यावरण मित्र” ह्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
बावधन येथील व्हेले व्हिस्टा या रहिवासी संस्थेला “पर्यावरण हितवर्धिनी” या पुरस्काराने आणि ‘लेम्नियन ग्रीन सोल्युशन’ च्या संस्थापिका सौ.पूजा तेंडुलकर यांना “पर्यावरण मित्र” या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच गेल्या वर्षभरात पूर्णमच्या कामामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सौ. श्वेता पटवर्धन यांना व 'सर्वोत्कृष्ट स्वयंसेविका ' या पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच 'सौ. चंद्रकला शिंदे ' आणि 'श्री. शुभम जाधव ' यांना विभागून सर्वोत्कृष्ट कर्मचारी ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान 'वार्षिक अहवाल २०२३-२४' आणि धनश्री बेडेकर लिखित 'पूर्णम'च्या कार्याविषयी माहिती देणाऱ्या ‘शाश्वत विकास माझ्या हातात’ या पुस्तकाचे प्रमुख वक्त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरण जनजागृतीसाठी संस्थेचे नवीन यूट्यूब चॅनेल 'इति पूर्णम' बद्दल व्हिडिओद्वारे माहिती देण्यात आली. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश मणेरीकर यांनी प्रेझेंटेशनद्वारे पूर्णमच्या गेल्या वर्षीच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि अध्यक्ष सचीन कुलकर्णी यांनी भविष्यकालीन दोन योजना जाहीर केल्या.
- दररोज १₹ (वर्षाला ३६५₹) पर्यावरणासाठी देणे अर्थात ~ पूर्णाहुती.
- प्रशिक्षण वर्ग - सामान्य नागरिकांसाठी व सोसायटी पदाधिकाऱ्यांसाठी. याबद्दल माहिती दिली. उपस्थित सर्वांचे आभार मानले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका सौ.स्नेहल दामले यांनी केले. सर्व श्रोत्यांनी संस्थेचे कौतुक करत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसासाठी 'पुनर्चक्र ' ~शून्य कचरा प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. त्याला देखील सर्व वयोगटातील लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.