संत ज्ञानेश्वर : आध्यात्मिक आणि सामाजिक परिवर्तनाचे दीपस्तंभ

संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक तेजस्वी आणि अजरामर व्यक्तिमत्त्व आहेत. अत्यंत अल्पायुष्यात त्यांनी केलेले आध्यात्मिक कार्य, साहित्यनिर्मिती आणि सामाजिक प्रबोधन आजही समाजाला दिशा देत आहे. ज्ञानेश्वरांची जयंती म्हणजे केवळ एका संताच्या जन्माचे स्मरण नव्हे, तर त्यांच्या विचारांचा आणि मानवतावादी दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्याचा दिवस आहे. अशी महान व्यक्ती या भूमीत अवतरली, हे आपल्या मातीचे भाग्यच आहे.
ज्ञानेश्वरांचा जन्म तेराव्या शतकात आपेगाव येथे झाला. दुर्दैवाने त्यांच्या आई-वडिलांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. त्यामुळे लहान वयातच ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना समाजातील भेदभाव, कर्मकांड आणि अनिष्ट रूढींचे चटके सहन करावे लागले. परंतु, या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मनात कोणतीही कटुता न बाळगता ज्ञान, भक्ती आणि समतेचा मार्ग स्वीकारला. त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरू होते, तर सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची भावंडेही या संतपरंपरेतील महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे ठरली.
संत ज्ञानेश्वरांचे सर्वात महत्त्वाचे आध्यात्मिक कार्य म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ (भावार्थदीपिका) या ग्रंथाची निर्मिती! भगवद्गीतेतील कठीण तत्त्वज्ञान सामान्य माणसाला सहज समजावे, या उद्देशाने त्यांनी प्राकृत मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. त्या काळात संस्कृत भाषा आणि धार्मिक ज्ञान हे ठरावीक वर्गापुरतेच मर्यादित होते. ज्ञानेश्वरांनी अध्यात्माचे दरवाजे समाजातील सर्व घटकांसाठी खुले केले. कर्म, भक्ती, ज्ञान, आत्मस्वरूप आणि परमात्म्याशी एकरूपता यांसारख्या गहन संकल्पना त्यांनी अत्यंत सोप्या, रसळ आणि काव्यमय भाषेत मांडल्या.
‘अमृतानुभव’ हा त्यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा स्वतंत्र आध्यात्मिक ग्रंथ आहे. या ग्रंथातून अद्वैत, आत्मज्ञान आणि विश्वातील चैतन्य यांचे सखोल तत्त्वज्ञान स्पष्ट होते. त्यांच्या विचारांमध्ये केवळ धार्मिक उपदेश नाही, तर प्रत्येक जीवामध्ये एकच चैतन्य वसलेले आहे, अशी व्यापक मानवतावादी दृष्टी दिसून येते. म्हणूनच त्यांची भक्ती ही केवळ व्यक्तिगत मुक्तीची वाट न राहता, सर्व जगताच्या कल्याणाची वाट बनते.
ज्ञानेश्वरांचे सामाजिक कार्यही तितकेच मोलाचे आहे. त्यांनी जातिभेद, उच्च-नीचता आणि सामाजिक बहिष्काराला आपल्या कार्यातून आव्हान दिले. ईश्वरप्राप्तीसाठी जन्म, जात किंवा सामाजिक स्थान महत्त्वाचे नसून अंतःकरणातील शुद्धता आणि निस्सीम भक्ती महत्त्वाची आहे, हा संदेश त्यांनी दिला. त्यांनी ज्ञान आणि अध्यात्म थेट लोकभाषेत आणल्यामुळे मराठी भाषेला राजाश्रय व प्रतिष्ठा मिळाली आणि सामान्य जनतेच्या आत्मविश्वासाला मोठी ताकद मिळाली.
ज्ञानेश्वरांच्या संपूर्ण कार्यात ‘विश्वकल्याण’ हीच मध्यवर्ती भावना राहिली आहे. त्यांनी विश्वाला दिलेले ‘पसायदान’ हे याचे मूर्तिमंत रूप आहे. पसायदानातून त्यांनी अखिल मानवी समाजात सद्भावना, विवेक, मैत्री आणि नैतिकता निर्माण व्हावी, अशी प्रार्थना केली आहे. “दुरितांचे तिमिर जावो” ही त्यांची प्रार्थना आजच्या काळातही तितकीच प्रस्तुत आणि अर्थपूर्ण आहे. ही प्रार्थना कोणत्याही एका धर्मासाठी किंवा पंथासाठी नसून, संपूर्ण मानवजातीसाठी केलेली उच्चतम वैश्विक प्रार्थना आहे.
अत्यंत अल्पायुष्य लाभूनही संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनावर अमिट ठसा उमटवला. त्यांनी भक्तीला ज्ञानाची जोड दिली आणि ज्ञानाला मानवतेची दिशा दिली. म्हणूनच संत ज्ञानेश्वर हे केवळ संत किंवा कवी नव्हते; तर ते आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक समतेचे खरे दीपस्तंभ होते. त्यांच्या पावन जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून ते आपल्या आचरणात आणणे, हीच त्यांना दिलेली खरी आणि भावपूर्ण आदरांजली ठरेल.