वारकरी संप्रदायात घुसखोरीचा आरोप केवळ राजकीय आकसापोटी झालेला नाही, तर त्यामागे एक मोठे वैचारिक षडयंत्र आहे. विठ्ठल भक्तीत लीन असलेल्या वारकऱ्यांनी कधीही भेदाची भाषा वापरली नाही. उलट, ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।’ हाच विचार त्यांनी जगाला दिला आहे. राजकीय प्रवक्त्यांनी केलेला हा आरोप हिंदू परंपरांपासून वारकरी संप्रदायाला वेगळे भासविण्याचा डाव आहे. असाच प्रयत्न भूतकाळात शीख, बौद्ध आणि जैन धर्मीयांबाबत झाला आहे. वर्तमानात महानुभाव, लिंगायत आणि आता वारकऱ्यांच्या संदर्भातही तोच प्रयोग केला जात आहे. यामागील वैचारिक षडयंत्र समजून घेणे गरजेचे आहे.
- सम्राट कदम

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्यासाठी वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचा आरोप केला. अर्थात, याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा आधार होता. लवांडे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी २० वारकऱ्यांची यादी 'घुसखोर' म्हणून जाहीर केली. ज्यामध्ये वारकरी परंपरेचे अध्वर्यू असलेले ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज, साक्षेपी विचारवंत आणि २५० वर्षांची वारकरी परंपरा लाभलेले श्रीगुरू चंद्रशेखर महाराज देगलूरकर, ३५० वर्षांची परंपरा असलेल्या वासकर घराण्याचे राणा महाराज यांसारख्या आदरणीय व्यक्तींच्या नावांचा समावेश होता. कैक पिढ्या नित्यनेमाने विठ्ठल भक्ती करणाऱ्या घराण्यांवर असे आरोप झाल्याने संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे. हा विषय केवळ यादीपुरता मर्यादित राहिला नाही, तर काही कीर्तनकारांचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांना बदनाम करण्याचे पद्धतशीर 'कॅम्पेन' राबविण्यात आले. सोशल मीडिया ट्रॅकिंगवरून हे जाणीवपूर्वक केले गेल्याचे स्पष्ट होते.
निश्चितच, सर्वच राजकीय विचारांचे लोक वारकरी संप्रदायात आहेत. संप्रदायाने मागील शेकडो वर्षांत अनेक नवे वैचारिक प्रवाह स्वतःमध्ये सामावून घेतले, मात्र कधीही 'सनातन विरोधी' भूमिका घेतली नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये वारकरी संप्रदायाने हिंदू हिताची भूमिका घेतल्यामुळे भाजपला फायदा झाला, असे मत विरोधी पक्षांचे आहे. याच आकसापोटी ही मोहीम राबविली गेल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, हे प्रकरण वरवरचे नाही; गेल्या १०-१५ वर्षांपासून वारकरी परंपरा ही सनातन धर्मापासून वेगळी असल्याचे भासविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत.

- हिंदूविरोधी षडयंत्र :
सर्वच संतांनी धर्मातील दोष दूर करण्यासाठी तत्कालीन धर्ममार्तंडांवर कठोर प्रहार केले होते आणि समाजव्यवस्थेतील अनिष्ट प्रथांना विरोध केला होता. मात्र, यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग हा कृष्णभक्तीचा अर्थात विठ्ठल भक्तीचाच होता. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा ही वारकरी वाङ्मयाची 'प्रस्थानत्रयी' आहे. वारकरी संप्रदायाला हिंदू तत्त्वज्ञानापासून वेगळे करणे अशक्य आहे. असे असतानाही काही नास्तिक आणि तथाकथित पुरोगामी शक्ती वारकरी हे हिंदू नाहीत, हे बिंबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्या काही संस्थांनी आषाढी वारीत यासाठी रितसर चळवळ उभारली आहे. गंभीर बाब म्हणजे, 'ज्ञानदेव-तुकाराम' म्हणण्याऐवजी वारकऱ्यांनी 'नामदेव-तुकाराम' म्हणावे, असा सल्ला या मंडळींनी दिला. ब्राह्मण असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींना परंपरेतून वगळणे, हा यामागील मुख्य हेतू होता. वारकरी संप्रदाय हा केवळ बहुजनवादी आणि सनातन विरोधी आहे, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, 'रामकृष्ण हरी' म्हणणारा वारकरी भोळा असला तरी त्याला भक्तीतील मर्म ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी ही 'विषवल्ली' वेळीच उपटून फेकली. असे असूनही आजही वारीमध्ये सनातन विरोधी अजेंडा राबवण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. काही ठिकाणी तर मिशनऱ्यांनीही आपले प्रचारतंत्र राबविल्याचे निदर्शनास आले आहे.
- खोटे नरेटिव्ह
सर्व भेद विसरून भक्तीत तल्लीन होणाऱ्या वारकरी संप्रदायात 'विद्रोही' चळवळ पेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी काही 'महाराज' निर्माण केले असून, त्यांच्याद्वारे हिंदू विरोधी विचार पसरवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे, पंढरपूरचा विठ्ठल हा भगवान श्रीकृष्ण नसून भगवान बुद्ध असल्याचे खोटे 'नरेटिव्ह' रेटले जात आहे. यामागे त्यांना बुद्धाची किंवा विठ्ठलाची भक्ती करायची नसून, केवळ संप्रदायात फूट पाडायची आहे. आता तर वारकरी संप्रदाय वेदांच्या आणि सनातन धर्माच्या विरोधात असल्याचे लेखनही केले जात आहे. अशा असंख्य खोट्या प्रचाराबाबत वारकऱ्यांनी सावध व्हायला हवे.

कीर्तनकारांच्या माध्यमातून राजकीय प्रचार होत असेल, तर त्यावर नक्कीच भाष्य करावे, विरोधही करावा; पण संप्रदायाचे पूर्ण ज्ञान नसताना समाजात फूट पडेल अशी वक्तव्ये टाळायला हवीत. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी समाजातील एकात्मतेला बाधा आणत असेल, तर ते ओळखले पाहिजे. अशा भूमिकेतून तात्पुरता राजकीय फायदा होईल, पण ती कृती संविधानविरोधी ठरेल. संविधानाच्या उद्देशिकेत म्हटल्याप्रमाणे, 'श्रद्धा व उपासनेच्या स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित' करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. वारकरी संप्रदायावरील वैचारिक हल्ला परतवून लावण्याचे सामर्थ्य संतांच्या अभंगांत आहे. ईश्वराच्या भक्तीत कोणताही भेद न मानणाऱ्या वारकऱ्यांच्या नावाने जर हिंदू विरोधी अजेंडा राबवला जात असेल, तर समाजाने निश्चितच सावध व्हायला हवे.

(लेखक विश्व संवाद केंद्राचे सहयोगी संपादक आहेत.)