निसर्ग, संस्कृती आणि कृतज्ञतेचा उत्सव: ‘भाद्रपद’

भाद्रपद हा केवळ सण-उत्सवांची मालिका नसून तो निसर्गाच्या समृद्धीला नमन करण्याचा, आरोग्याची काळजी घेण्याचा आणि पूर्वजांपासून ते समाजापर्यंत प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा भारतीय जीवनशैलीचा एक अनुपम आविष्कार आहे.
हिंदू पंचांगानुसार 'चैत्र ते फाल्गुन' या बारा महिन्यांच्या कालचक्रातील सहावा महिना म्हणजे 'भाद्रपद' होय. भारतीय पंचांगातील प्रत्येक महिन्याला त्याचे नाव त्या महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्यावरून दिले जाते. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र 'पूर्वा भाद्रपदा' किंवा 'उत्तरा भाद्रपदा' या नक्षत्रांच्या पार्श्वभूमीवर असतो, आणि म्हणूनच या महिन्याला 'भाद्रपद' हे नाव प्राप्त झाले आहे.
'भद्र' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'कल्याणकारी', 'शुभ', 'मंगलमय' किंवा 'सौभाग्य आणणारा' असा होतो. भाद्र हे याच शब्दाचे एक रूप असून 'पद' म्हणजे 'पाय' किंवा 'पाऊल'. याचा एकत्रित अर्थ 'शुभ पावले घेऊन येणारा महिना' असा होतो. प्राचीन संस्कृत साहित्यात आणि खगोलशास्त्रीय ग्रंथांमध्ये या नक्षत्रांना 'प्रोष्ठपदा' असेही म्हटले आहे. पाश्चात्य खगोलशास्त्रात या तारकासमूहाला 'पेगासस' (उडता घोडा) म्हटले गेले, तर भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी याला खाटेच्या पायांची उपमा दिली.
- खगोलशास्त्र आणि ऋतूचे बदलते रूप
खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून भाद्रपद महिन्यात सूर्याचे भ्रमण 'सिंह' राशीतून 'कन्या' राशीत होते. हा काळ दक्षिणायनाचा असतो. या काळात सूर्याची प्रखरता हळूहळू कमी होऊ लागते आणि चंद्राचा प्रभाव वाढू लागतो. आयुर्वेदानुसार हा 'विसर्ग काळ' मानला जातो, जिथे चंद्राच्या शीतल किरणांमुळे निसर्गात ओलावा निर्माण होतो. भाद्रपद हा 'वर्षा ऋतू'चा उत्तरार्ध असून, ढगांची गर्दी ओसरून आकाशात निरभ्रता येऊ लागते. यातूनच पुढे मनाला प्रफुल्लीत करणाऱ्या 'शरद ऋतू'ची आल्हाददायक चाहूल लागते. महर्षी वाग्भट लिखित 'अष्टाङ्गहृदयम्' आणि महर्षी चरक लिखित 'चरक संहिता' या ग्रंथांमध्ये या काळातील शरीरातील त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलनासाठी योग्य ऋतुचर्या पाळण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
- कृषी संस्कृती आणि रानभाज्यांची आरोग्यसंपदा
भाद्रपद महिना हा भारतीय कृषी चक्रातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. जून-जुलैमध्ये शेतकऱ्यांनी पेरलेली खरिपाची पिके (भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन) आता पक्व होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतात. शेतात तण काढणे व निगा राखण्याची कामे पूर्ण होऊन निसर्गात सगळीकडे हिरवळ आणि प्रसन्नता पसरलेली दिसते.
या ऋतूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जंगलात व शेताच्या बांधावर मिळणाऱ्या 'रानभाज्या'. आयुर्वेदात या भाज्यांना अनन्यसाधारण औषधी महत्त्व आहे. उदाहरणार्थ, कुर्डू ही वनस्पती शरीरातील उष्णता कमी करून लघवीच्या विकारांवर व मुतखड्यावर गुणकारी मानली जाते, तर तांदूळजा ही पालेभाजी डोळे, यकृत आणि पित्ताच्या त्रासावर उपयुक्त ठरते. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी सोळा रानभाज्यांचा नैवेद्य दाखवून निसर्गातील जैवविविधतेचा आदर केला जातो.

- सण, उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा
भाद्रपद महिन्याची सुरुवातच मुळात भक्तिभाव आणि उत्साहाने होते. या महिन्यातील सण केवळ धार्मिक नसून सामाजिक आणि कौटुंबिक जोडणी निर्माण करतात. भाद्रपद शुद्ध तृतीया हरितालिका व्रताने सुरू होते, ज्या दिवशी महिला पाना-फुलांनी शिवाची पूजा करतात. त्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे आगमन घरोघरी व सार्वजनिक मंडळांत होते.
भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषी पंचमी साजरी केली जाते, जिथे सप्तर्षींचे स्मरण करताना बैलाच्या कष्टाचे अन्न न खाता नैसर्गिक रानभाज्या खाऊन निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यानंतर ज्येष्ठा गौरी पूजनात अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला 'अनंत चतुर्दशी' साजरी केली जाते, ज्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा होते आणि गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.
- पितृपक्ष: पूर्वजांप्रती कृतज्ञता
भाद्रपद कृष्ण पक्षात सुरू होणारा पंधरवडा म्हणजे 'पितृपक्ष' किंवा 'महालय'. या काळात सूर्य तुळ राशीजवळ आणि चंद्र यम देवतेच्या 'भरणी' नक्षत्रात असतो. मत्स्य पुराण व मार्कंडेय पुराणात याचे विस्तृत वर्णन आढळते. मानवी जीवनात आपले अस्तित्व पूर्वजांमुळे आहे, या भावनेतून तर्पण, पिंडदान व अन्नदान करून पूर्वजांचे स्मरण केले जाते.

- सार्वजनिक गणेशोत्सव: राष्ट्रीय चेतनेचा प्रवाह
ऐतिहासिकदृष्ट्या पेशवे काळात गणेशोत्सव हा घराघरांत आणि राजवाड्यांपुरता मर्यादित होता. १८९२ मध्ये पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणपतीची स्थापना केली आणि १८९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 'केसरी' वृत्तपत्राच्या माध्यमातून या उत्सवाला राष्ट्रीय चळवळीचे रूप दिले. स्वातंत्र्यासाठी समाजसंघटन करणे, पोवाडे व व्याख्यानांद्वारे स्वराज्यप्रेरणा जागवणे हा यामागचा मुख्य हेतू होता.
भाद्रपद हा केवळ सण साजरे करण्याचा काळ नसून कुटुंब, समाज, निसर्ग आणि राष्ट्राशी जोडले जाण्याची जीवनदृष्टी देणारा काळ आहे. आजच्या आधुनिक युगात उत्सवांचे स्वरूप भव्य व व्यावसायिक होत असताना, त्यांचा मूळ उद्देश—म्हणजेच समाज जोडणे, सेवाभाव वाढवणे, निसर्गाचे रक्षण करणे आणि संस्कृतीची जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे—जपणे हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचे ठरते.
"उत्सव म्हणजे केवळ आनंदाचा क्षण नाही, तर ती समाजनिर्मितीची आणि सामूहिक चेतना जागवण्याची संधी आहे."
(साभार - वायुवेग)