प्रा. शांताराम बुटे
1 day ago

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आषाढ शुध्द एकादशी भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या विठूरायाच्या दर्शनासाठी टाळ, मृदूंग, विणा, दिंडयापताकासह असंख्य वारकरी, टाळकरी, माळकरी असे विठ्ठलभक्त- वैष्णवजन लाखोंच्या संख्येने विठू नामाच्या गजरात, रामकृष्णहरि व ज्ञानोबा-तुकाराम भजन करीत तिर्थक्षेत्र पंढरपूरात दाखल झाले असतात. हा आनंद सोहळा सुरम्य, आल्हाददायक अवर्णनीय असून डोळयाचे पांग फेडणारा असा आहे.
महाराष्ट्र ही संताची भूमी. अनेक संत, महंत व भक्तिसंप्रदाय या महाराष्ट्रात विविध कालखंडात उदयास आले आहे. या अनेक भक्तिसंप्रदायापैकी सर्वचस्तरावर, तळागाळापर्यंत रुजलेला व सर्व सामान्यजनतेपर्यंत प्रचार व प्रसार झालेला लोकाभिमुख व लोकप्रिय असा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय. या संप्रदायाने महाराष्ट्राला साहित्यीक, सांस्कृक्तिक व सामाजिक अधिष्ठान व वैशिष्टयपूर्ण परंपरा प्रदान केली आहे.
"वारकरी" हा सामासिक शब्द असून वार करी ही दोन पदे यामध्ये आहेत. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माधी अशा चार एकादशीला पंढरपूरला विठूरायाची यात्रा भरते. जो नित्यनेमाने वारंवार पंढरपूरला जातो तो पंढरीचा वारकरी होय. वारकरी संप्रदायास तत्वज्ञानात्मक व आचरणात्मक अधिष्ठान प्राप्त करुन देणारे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वकाळापासून ही वारीच्या प्रथेचा प्रघात आहे तसेच आपल्या विठ्ठलभक्तांला वारीकर असे म्हटले आहे. ती वारी कशाप्रकारची करावी हे सांगतांना ते म्हणतात.
काया वाचे मने, जीवे सर्वस्वे उदार ।
बाप रखुमादेवीवरा, विठ्ठलाचा वारीकर ।।
विठोबाची वारी करणारा वारकरी हा कायाने, वाचेने, मनाने व जीवावर सर्वस्व उदार होवून ईश्वराशी समर्पित झालेला असतो. तोच खरा वारकरी असतो. माझ्या जीवीचा जीव असणाऱ्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी मी पंढरीला गुढी घेवून जाणार आहे. कारण त्यांनी माझे मन वेधले आहे. असे ते म्हणतात.
माझे जीवीचे आवडी । पंढरपूरा नेईल गुढी ।।
पांडूरंगी मन रंगले । गोविदाचे मनी वेधले ।।
एवढेच नव्हे तर हा संसार आनंदाचा करुन माझे माहेर असलेल्या पंढरपूरला जाणार आहे. असे ते म्हणतात.
अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक ।।
जाईन गे माये तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपूलिया ।।
त्याच प्रमाणे संत नामदेव महाराज हे वारकऱ्याला शुरवीर समजतात. ते म्हणतात.
आले आले रे हरिचे डिंगर। वीर वारीकर पंढरीचे ।।
प्राचार्य डॉ शांताराम बुटे,
संत साहित्याचे अभ्यासक
- प्रा. शांताराम बुटे
Share With Friends
अभिप्राय
अभिप्राय लिहा