
भारतीय राष्ट्रजीवनात स्वयंसेवकांची भूमिका ही केवळ संघटित शक्तीपुरती मर्यादित नाही, तर ती एक सांस्कृतिक पुनर्जागरणाची चळवळ आहे. १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेले हे संघटन केवळ नागपूरच्या चौकटीत न राहता, हळूहळू संपूर्ण भारताच्या समाजमनात शिरले आणि विशेषतः ग्रामीण व जनजाती समाजाच्या जीवनमूल्यांना स्वीकारून त्यांच्यातील सुप्त सामर्थ्य जागृत करण्याचे कार्य करू लागले. भारतीय संविधानाने अनुसूचित जमातींना स्वतंत्र ओळख दिली असून आज देशाच्या सुमारे ८.६ टक्के लोकसंख्या या समाजाची आहे. या समाजाच्या जीवनपद्धतीत आजही निसर्गाशी असलेले अखंड ऐक्य आणि तादात्म्य दिसून येते. गोटूल परंपरा, सामूहिक नृत्य, लोककला, बोलीभाषा, वेशभूषा हे घटक त्यांच्या सभ्यतेच्या सातत्याचे प्रतीक आहेत आणि हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही परंपरा जतन करण्यासाठी प्रयत्नशील दिसतो.
- स्वप्निल शिवराम कुमरे
साधारणतः जनजाती जीवनाचे वर्णन "जल, जंगल, जमीन" या त्रिसूत्रीवर केले जाते; परंतु वस्तुतः त्यांचे जीवनमान अधिक व्यापक असून ते सहा आधारांवर टिकून आहे : (जल, जंगल, जमीन, जीव, जिजीविषा, जंतूया) – जल म्हणजे नद्यांशी, झऱ्यांशी आणि पाण्याशी असलेली नाळ; जंगल म्हणजे अन्नधान्य, औषधी वनस्पती व निसर्गसंपत्तीचा शाश्वत आधार; जमीन म्हणजे वडिलोपार्जित शेती व सांस्कृतिक ओळख; जीव म्हणजे सर्व सजीवांशी नाळ जपणारी मूल्यव्यवस्था; जिजीविषा म्हणजे संघर्षातून पुन्हा उभे राहण्याची जीवनशक्ती; तर जंतूया म्हणजे सूक्ष्मजीवांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्व प्राण्यांविषयी सहजीवनाची भावना. ही सहा "ज" जनजाती जीवनाचे तत्त्वज्ञान आहे, त्यातूनच भारतीय चिंतनातील “वसुधैव कुटुंबकम्” या मूल्याचा प्रत्यय येतो. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी प्रतिपादित केलेला “एकात्म मानववाद” हा विचार आज आपण ग्रंथातून शिकतो, पण जनजाती समाज त्याचे आदिम आणि सजीव उदाहरण आहे, कारण त्यांच्या जीवनशैलीत व्यक्ती, समूह आणि निसर्ग यांचे अखंड तादात्म्य स्पष्टपणे दिसते.

याच तादात्म्याला धार्मिक रूपही प्राप्त झाले आहे. जनजाती समाजाचा धर्म हा स्वतंत्र, प्राचीन, समावेशक आणि निसर्गाशी घट्ट जोडलेला आहे. वनदेवता, ग्रामदेवता आणि मातृशक्ती ही त्यांच्या उपासनेची केंद्रे आहेत. तथापि धर्मांतराच्या दबावामुळे या श्रद्धा ढासळू लागल्या आणि झांजा आयोगाच्या (२०११) अहवालानुसार अनेक ठिकाणी जनजाती समाज आपली मूळ ओळख हरवण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. अशा वेळी संघप्रेरित वनवासी कल्याण आश्रम पुढे आले आणि त्यांनी जनजाती श्रद्धांचा अवमान न करता, उलट त्यांना भारतीय संस्कृतीशी पुनःजोडण्याचे कार्य केले. महाराष्ट्रातील भामरागड–एटापल्लीतील आंदोलन, झारखंडातील सरना धर्म चळवळ, ओडिशातील धरणी पूजा – या परंपरा धार्मिक विधी म्हणून मर्यादित न राहता सांस्कृतिक अस्मितेची घोषणाच ठरल्या.
वास्तवात श्रद्धेपुरतेच थांबून चालत नाही; समाजाचा खरा उद्धार शिक्षणातून होतो. ज्ञानप्रकाशाशिवाय जीवनात परिवर्तन शक्य नाही हे जाणून संघाने प्रेरित एकल विद्यालय प्रकल्प सुरू केला. आज देशभरात तीस हजारांहून अधिक शाळा कार्यरत आहेत आणि लाखो जनजाती विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये वसतिगृह प्रकल्प उभारले गेले असून शेकडो जनजाती तरुण उच्चशिक्षणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. शिक्षणाबरोबरच आरोग्यसेवा, व्यसनमुक्ती मोहिमा, सेंद्रिय शेतीसाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि महिला सक्षमीकरण ही संघकार्याची महत्त्वाची पैलू ठरली आहेत. याच संदर्भात सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘आपली संस्कृती जंगले व शेतातून जन्माला आली आहे आणि जनजाती समाज हा आपला उगम आहे, कारण झाडांना देव मानणे, पर्यावरणाशी सहजीवन राखणे ही भारतीय संस्कृतीची अद्वितीय परंपरा आहे’ आणि अशी परंपरा भारताऐवजी कुठे दिसत नाही.

इतिहास साक्ष देतो की भारताचा स्वातंत्र्यसंग्राम केवळ शहरातील नेत्यांनी लढलेला नव्हता, तर जनजाती नायकांनीही त्यात प्राणार्पण केले. झारखंडातील भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलान आंदोलन उभे करून ब्रिटिश शोषणाला आव्हान दिले; त्यांचा संघर्ष हा केवळ राजकीय नसून जल, जंगल, जमीन, जीव, जिजीविषा, जंतूया या जीवनाधारांच्या रक्षणाचा होता. गोंडवाना साम्राज्याची पराक्रमी राणी दुर्गावती अकबराच्या सैन्याशी लढून जनजाती सन्मानासाठी बलिदान देत एक अमर इतिहास रचून गेली; तर टंट्या भील “भीलांचा रॉबिनहुड” म्हणून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अन्यायाविरुद्ध शस्त्र घेऊन उभा राहिला. या नायकांचे स्मरण हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही किंवा सैन्याशी लढणं नव्हतं तर जनजातीयांचे परंपरा, संस्कृती यांचे रक्षण झालं, तर आजच्या पिढीसाठी स्वाभिमान, संघर्ष आणि सामर्थ्याची प्रेरणा आहे. या सर्व परंपरेचा परिपाक म्हणजेच संघ शताब्दी. या निमित्ताने जनजाती गौरव यात्रा आयोजित केली जात आहे ज्यातून बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, टंट्या भील यांसारख्या क्रांतिवीरांचे स्मरण आणि त्यांच्या कार्याचा प्रसार होतो आहे. त्याचबरोबर समरसता अभियान सुरू करून जात–पात, ग्राम–जनजाती या भेदांना ओलांडून अखिल भारतीय समाजभावना दृढ करण्याचा संकल्प केला जात आहे. म्हणूनच संघ शताब्दी हा केवळ संघाचा सोहळा नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे.
संघ शताब्दीचा खरा अर्थ हाच आहे की जनजाती समाजाचे जीवनमूल्य, श्रद्धा आणि परंपरा या भारतीय संस्कृतीच्या मूळ धारा आहेत. त्यांच्या अस्मितेला अभिमानाने स्थान देणे, त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांचे मुख्य प्रवाहात स्वागत करणे हाच खरा जनजागरणाचा मार्ग आहे. अशा प्रकारे संघाची शताब्दी ही नव्या भारताच्या उभारणीत जनजाती समाजाला केंद्रस्थानी ठेवणारा एक ऐतिहासिक विचार ठरेल याबाबत विश्वास वाटतो.
- स्वप्निल शिवराम कुमरे
वरिष्ठ संशोधक (यूजीसी नेट एसआरएफ, सेट) लोकप्रशासन विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर