
सांगोला: "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आदर्श राज्यकर्ते होते. त्यांनी हिंदुत्वासाठी आणि स्वधर्मासाठी स्वतःचे बलिदान दिले, हाच इतिहास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे," असे प्रतिपादन प्रा. तुकाराम खंदाडे यांनी केले. सांगोला तालुक्यातील देवाकते वाडी येथे सकल हिंदू समाज मांजरी मंडळातर्फे आयोजित 'हिंदू संमेलनात' ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई खंडागळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर येथील समाज प्रबोधनकार ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, यानिमित्ताने धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिवसही श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला.
ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव यांनी आपल्या कीर्तनातून गीता, रामायण आणि संतांच्या वचनांचे दाखले देत हिंदू रक्षण आणि समाजप्रबोधनावर प्रभावी भाष्य केले. सुवर्णाताई खंडागळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. संमेलनाच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात 'पंच परिवर्तन' संकल्पनेची माहिती देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. तसेच, इतर मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासावर प्रकाश टाकला. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील अबालवृद्धांसह सर्व समाजाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता स्पीकरवर लावलेल्या भक्तीमय भजनांनी झाली, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. याप्रसंगी प्रशांत सूर्यवंशी, चांगदेव महाराज शिंगारे, ओंकार पवार, ज्ञानेश्वर जगताप यांसह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रशांत चारुदत्त शिंगारे यांनी केले.