उपासना नारीशक्तीची
आदिशक्तीची आराधना -पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा

माणसाला भरभरून दान देणा-या निसर्गाची जपणूक एखाद्या पवित्र व्रतासारखी केली पाहिजे. अशीश्रध्दा जपणा-या रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलच्या निसर्गप्रेमी शिक्षका, प्रतिभा वडनेरकर यांचे पर्यावरणाचे काम विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये जागृती करणारे आहे. या कामाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, नवरात्रातली आदिशक्तीची आराधनाच मला कायम पर्यावरण संरक्षणाची प्रेरणा देते...
रमणबाग प्रशालेत 'राष्ट्रीय हरित सेने' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहभागातून त्यांनी गांडूळखताचा प्रकल्प ऊभा केला आहे. बियाणांची बँक, बीजापासून रोपे तयार करणे, बियांच्या राख्या करणे , झाडांना राखी बांधून 'वृक्ष रक्षणा'ची हमी अशा कार्यक्रमात त्या विद्यार्थ्यांसोबत रमतात. वसुंधरा महोत्सवात पर्यावरण चित्ररथ, प्लॅस्टीक पिशवीला पर्याय म्हणून कागदी व कापडी पिशव्यांची कार्यशाळा, निसर्ग प्रदर्शन, अशा गोष्टीतून प्रत्यक्ष पर्यावरण जागृतीचे काम करतानाच ओसाड माळराने हरित करण्यासाठी देशी झाडांची रोपे लावण्याचा कार्यक्रम, छोटी रोपे तयार करून मोठ्या वृक्ष लागवडीची मोहीम , असे विविध प्रकारे पर्यावरण विषयक काम त्या करतात.
नाशिकच्या वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते असलेले वडील आणि 'वन विकास महामंडळ' येथे कार्यरत आई, यांच्यामुळे साहाजिक प्रतिभाताईचे हिरव्या वनराईशी प्रेमाचे नाते जडले. पर्यावरणाचा संस्कार मनात रूजला.शिक्षण सुरु असताना पर्यावरण चळवळीशी त्या जोडल्या गेल्या.
'अमृत कोपरा' या उपक्रमात नवरात्र असल्याने मुलांनी ठरवून देवीच्या पुजेसाठी मोगरा, गुलाब, जास्वंद, शेवंती अशा सुगंधी रोपांची निवड केली. शाळेचे सारे प्रांगण गंधीत आणि हरित होऊन गेले होते. विद्यार्थ्यांचे चेहरे फुललेले पाहून त्यांना कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
'पर्यावरण संरक्षण गतीविधी' अंतर्गत सायकल रॅलीत कागदी व कापडी पिशव्यांचे वाटप, पर्यावरण दिनी 'प्रश्न मंजुषा' ' हरीतघर ' अशा कार्यक्रमांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, तेव्हा खरे समाधान वाटते.प्रतिभाताई बह्र्भारून सांगत होत्या. अशा कार्यक्रमातून 'मानसिक पर्यावरण हानी' या एका वेगळ्याच मुद्दयावर प्रतिभाताईं जनजागृती करतात. माणसाच्या नकारात्मक वृत्तीने निसर्गाला हानी पोहचते. घरातला कचरा रस्त्यावर फेकणे किंवा सार्वजनिक ठिकाणी नासधूस करणे, अन्न वाया घालवणे अशा गोष्टी करणा-या लोकांची मने दूषीत असतात. ही दूषीत मनेच प्रदूपण फैलावतात. मन सुदृढ असण्यासाठी व्यक्तीची कौटुंबिक, सामाजिक पार्श्वभूमी सुसंस्कारीत हवी. तरच माणूस चांगले काम स्वयंस्फूर्तीने करतो, हा संदेश त्या प्रभावीपणे पोहोचवतात.
पर्यावरणाशी संबंधित अनेक क्षेत्रात धोकादायक स्थिती आहे. हवेचे प्रदूषण पाणी प्रदूषण, पावसाचे वाहून जाणारे पाणी, जंगलतोड व जैवविविधता , शेतजमिनीचा कस, हवामानातले बदल, प्लॅस्टीकसह इतर कृत्रीम वस्तूंचा कचरा, या संकटांवर मात करायला हवी, असे सांगताना, प्राचीन काळी दस-याला सीमोल्लंघन करून युध्दमोहीम सुरू होत असे, आजच्या काळात 'पर्यावरण संरक्षण गतीविधी' द्वारे ही प्रदूषणाची लढाई आपण जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिरवगार भरली राने ,
मुक्या जीवांसाठी अभयारण्ये
पाखरांचेही जपावे गाणे ,
सकल प्राणीमात्र जगावे सुखाने ...
असे तन-मन- धनाने पर्यावरण रक्षणाचे काम ध्यासपूर्वक करणा-या प्रतिभा वडनेरकर यांच्या कार्यातून निसर्ग पूजन हेच पर्यावरण संरक्षण अशी प्रेरणा सर्व मैत्रिणींना मिळो.
अमृता खाकुर्डीकर