•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

वारकरी संप्रदाय - संकल्पना, वाटचाल व महत्त्व

सचिन लादे 24 days ago
भाष्य  

 

 

वारकरी संप्रदाय - संकल्पना, वाटचाल व महत्त्व

 

समाजाच्या धारणेसाठी 'धर्माची' कल्पना पुढे आली, या धर्माचरणातून मोक्षप्राप्ती हे ध्येय बाळगून निरनिराळी व्रत-वैकल्ये करणाऱ्यांना व हे सर्व करण्याचा अधिकार नसणाऱ्यांनादेखील विशेषतः मध्ययुगाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वर, नामदेवादि संत मंडळींनी भक्तीचा सहज-सोपा मार्ग मोक्षप्राप्तीकरीता दाखविला. हा मार्ग सर्वदूर-सर्वजणांपर्यंत पोहचविण्यासाठी संतांनी ज्या वारकरी अथवा भागवत संप्रदायाचा प्रसार केला, त्या वारकरी संप्रदायाचा आपण प्रथमतः विचार करू. वारकरी संप्रदाय हा केवळ महाराष्ट्र राज्यापुरता पूर्वीही कधी मर्यादीत नव्हता व आजही नाही. या संप्रदायाबद्दल संतसाहित्यातील संशोधकांनी तसेच निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळी मते व्यक्त केली आहेत, परंतु या सर्वांनीच या संप्रदायाचे व संप्रदायाच्या माध्यमातून घडलेल्या कार्याचे महत्त्व मान्य केले आहे. वारकरी संप्रदायाचे अभ्यासक श्री. शं. दा. पेंडसे आपल्या 'वैदिक वाङमयातील भागवतधर्माचा विकास आणि ज्ञानदेव-नामदेव' या ग्रंथामध्ये संप्रदायाची व्याख्या करताना म्हणतात, "वारकरी संप्रदाय म्हणजेच महाराष्ट्रीय संतांचा भागवतधर्म. हा भागवतधर्म विशाल आणि समावेशक अशा वैदिक धर्माचेच एक विकसित रूप आहे. वेदातील भग-सविता-सूर्य- विष्णू या देवताक्रमाच्या विकासातून 'विष्णू' हे 'विष्णुर्देवानां श्रेष्ठः इति। यः सः विष्णुर्यज्ञसः ।।' असे विशाल स्वरूप उदयास आले. भगवान विष्णू हा यज्ञ आहे. या विष्णूरूपी यज्ञात चातुर्वर्ण्ययुक्त विराट पुरूषाचे हवन करण्याच्या प्रेरणेतून 'धर्मकल्पना' उदयास आली. या धर्मकल्पनेसच आपण 'वैष्णवधर्म' असे म्हटले. यज्ञाच्या बाह्य अवडंबरापेक्षा त्यातील त्यागाच्या तत्वावर सर्वस्व भर देऊन उदयास आलेला हा वैष्णवधर्म म्हणजे सनातन 'भागवतधर्म' होय."
 
वारकरी संप्रदायाचे एकूणच महत्त्व विषद करताना संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री. भा. पं. बहिरट 'वारकरी संप्रदाय उदय व विकास' या ग्रंथात म्हणतात, "वारकरी संप्रदाय हा हिंदुधर्मामध्ये असलेल्या भारतातील अनेक भक्तिसंप्रदायांपैकी प्रमुख असा संप्रदाय आहे, हा संप्रदाय सद्धर्म आणि सदाचार यांच्या शिकवणुकीच्याद्वारा तो श्रेष्ठ जीवनमूल्यांचे रक्षण व पोषण करीत आहे." सद्धर्म व सदाचार यासाठी सातत्याने सर्व संतांनी या संप्रदायाच्या माध्यमातून केलेले कार्य विचारात घेता श्री बहिरट यांचे म्हणणे योग्य वाटते. वारकरी संप्रदाय अथवा पंथ हे नाव कसे पडले या संदर्भात प्रा. शं. वा. दांडेकर 'वारकरी पंथाचा इतिहास' या ग्रंथामध्ये पुढील प्रमाणे आपले मत मांडतात, "वर्षातून आषाढी, कार्तिकी, माघी अथवा चैत्री यापैकी एका शुद्ध एकादशीस गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपूरास जातो, तो 'पंढरपूरचा वारकरी' म्हटला जातो व त्याच्या उपासनेचा जो मार्ग तो 'वारकरी पंथ' होय." परंतु वारकरी म्हणजे काय? हा प्रश्न उरतोच, कै. वि. का. राजवाडे आपल्या 'नामादिशब्दव्युत्पत्तिकोश' यामध्ये "वारि-री (प्रवाशांची टोळी) वारी" असे म्हटले आहे, यावरून पंढरपूरला जाणारी प्रवाशांची टोळी (भगवद्भक्तांचा समूह) म्हणजे वारी व अशी वारी नियमाने करणारे ते वारकरी व या भगवद्भक्तांचा (वारकऱ्यांचा) पंथ म्हणजे वारकरी पंथ अथवा संप्रदाय असे म्हणता येईल. आजही अशी नियमाने वारी करणारे भगवद्भक्त दिसून येतात त्यामुळे राजवाडे यांचे म्हणणे संयुक्तिक वाटते.
 
वारकरी संप्रदायाने भक्तीचा महिमा सर्वदूर सर्वजनांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविल्याचे आज दिसून येते, परंतु या संप्रदायाचा उगम कोणत्या कालखंडात झाला याचा विचार केला तर आपल्याला नक्कीच एक हजार वर्षे तरी मागे जावे लागेल. भक्तिसंप्रदायाचा अभ्यास करणारे श्री. र. रा. गोसावी 'पाच भक्तिसंप्रदाय' या ग्रंथामध्ये या संप्रदायाच्या काळाबद्दल आपले मत पुढील प्रमाणे मांडतात, "भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाच्या इतिहासाला सुरुवात होते, असे मानले जाते. तेव्हा ज्ञानदेवपूर्व (भक्त पुंडलिकाचा) काळ, ज्ञानदेव व नामदेव काळ, भानुदास आणि एकनाथाचा काळ, तुकोबा आणि निळोबा यांचा काळ व तुकारामोत्तर ३०० वर्षांचा काळ असे या संप्रदायाचे पाच कालखंड स्थूलमानाने पडतात." साधारणतः याच पद्धतीचा कालखंड श्री. शं. गो. तुळपुळे, श्री. भा. पं. बहिरट व श्री. सुंठणकर यासारख्या अभ्यासकांनी मांडला आहे. म्हणूनच हा कालखंड आज सर्वमान्य होताना दिसत आहे. पंढरीला येणारा तो वारकरी, पण हा वारकरी कोणाला भेटायला येतो, तर तो वारकरी संप्रदायाच्या आराध्य दैवत पंढरीरायाला म्हणजेच पांडुरंगाला विठ्ठलाला भेटायला येतो. या विठूरायाच्या ओढीने मैलोन्‌मैल चालत येणारे भगवद्भक्त आहेत. हा विठूराया हरी व हर म्हणजेच विष्णू व शिव यांच्या ऐक्याचे प्रतीक मानले जाते. निरनिराळ्या संतांनी आपल्या अभंगातून यापद्धतीचा संदर्भ दिला आहे, संत नामदेव महाराज,
" विष्णूशी भजिला शिव दुरावला । अधःपात झाला तया नरा।।
नामा म्हणे शिव-विष्णू मूर्ती एक। देवाचा विवेक आत्मारामू।।" (नामदेव गाथा- २२७४)
अशी हरिहरैक्यभावना व्यक्त करतात तर "हरिहरा भेद। नाही करू नये वाद।" (तुकाराम गाथा-९९) असा द्वैत मानणाऱ्यांना संत तुकाराम महाराज उपदेश करताना दिसतात. वारकरी पंथातील भगवद्भक्त नित्य एकादशी करून हरिची उपासना करतात तर महाशिवरात्रीचा उपवास धरून हर म्हणजेच शिवालाही भजताना दिसून येतात, म्हणजेच वारकरी निदान हा भेद मानत नाहीत असे दिसून येते.
एखादा पंथ अथवा संप्रदाय उदयास येतो, त्यावेळी या पंथ संप्रदायाच्या अनुयायांनी कसे वागावे-बोलावे, काय खावे-प्यावे हा आचारधर्म त्या पंथ संप्रदायाच्या प्रवर्तकांनी ठरवून दिलेला असतो. परंतु वारकरी संप्रदायातील आचार तात्त्विक धारणेतून निर्माण झालेल्या नीतिशास्त्रातून स्वाभाविकपणे आकारास आले आहेत, म्हणूनच या आचारधर्मात कोठेही कर्मकांड निर्माण झाल्याचे आपल्याला दिसत नाही. या संप्रदायातील भगवद्भक्तांच्या आचरणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की सर्वच संतांनी 'विठ्ठल' हेच हरी अन् हर यांचे ऐक्य प्रतीक असल्याचा जो संस्कार केला आहे, त्यामुळे या संप्रदायामध्ये 'भेद' दूर होऊन समत्त्वदृष्टी निर्माण झाली आहे. एकदा का ही समत्त्वादृष्टी निर्माण झाली की मग आपोआपच प्रेम, बंधुता या गोष्टी सहजपणे आचरणात यायला लागतात. प्रा. र. रा. गोसावी 'पारा भक्तिसंप्रदाय' या संशोधनपर ग्रंथात याच पद्धतीचे मत व्यक्त करतात, "विम्याबंधूत्य, समत्त्व आणि प्रोली या तीन तत्त्वातून वारक-यांचा आचारधर्म उदयास आला." वारकरी संप्रदायातील आचारचर्म हा कर्मकांड जरी नसला तरी सहज करण्यायोगे, आचरण्याजोग्या काही गोष्टी मात्र या संप्रदायात निश्चित आहेत. 'रामकृष्णहरी' हा मंत्रजप, गळ्यात तुळशीची माळ धारण करणे, कपाळ व शरीराच्या इतर भागावर गोपीचंदाचा वापर करून मुद्राधारणा करणे, एकादशीदिवशी उपवास करणे व पंढरपूर-आळंदीची बारी करणे अशा गोष्टी वारकरी म्हणवणाऱ्याने कराव्यात अशी अपेक्षा ठेवली गेली आहे. यासाठी आग्रह धरला जातो परंतु सक्ती केली जात नाही, त्यामुळेच हा आचारधर्म कर्मकांड ठरत नाही.
गेली हजार-बाराशे वर्षे ज्या संप्रदायाच्या वाढीचा कायमच चढता आलेख राहिलेला आहे, त्या संप्रदायाच्या या वाढीमागील मुख्य कारण कोणते असेल तर ते म्हणजे या संप्रदायाची शिकवण. ज्ञानेश्वर-नामदेवांपासून तुकाराम-निळोबारायांपर्यंत सर्वच संतांनी आपल्या आचरणातून, अभंग-भाजन-कीर्तनातून 'कर्तव्य करा, पण ईश्वरावर श्रद्धा ठेवा ईश्वारालाच आपली वृद्धी सर्वस्या अर्पण करा, प्रपंच करा पण त्याचा मोह ठेवून त्याला कायम चिटकून राहू नका, वर्ण धर्म पाळा पण 'भेदाचा' भाव मनामध्ये न ठेवता वर्णाभिमान सोडा यासारखी सातत्याने शिकवण दिली. सर्वच संतांनी आपल्या वाडमयातून, साहित्यातून समाजाचे प्रबोधन करायचे व आध्यात्यिक, वैचारिक व सामाजिक जाणिवा जागृत, विकसीत करायच्या हेच ध्येय ठेवलेले होते म्हणूनच या संतसाहित्याची आजच्या आधुनिक काळातही तेवढीच गरज असल्याचे लक्षात येते.
 
डॉ.सचिन वसंतराव लादे,
पंढरपूर, जि. सोलापूर
मो. ७५८८२९६५२६

- सचिन लादे

  • वारकरी संप्रदाय - संकल्पना
  • वाटचाल व महत्त्व
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

सचिन लादे

सचिन लादे पंढरपूर येथे

प्राध्यापक आहेत.

 इतिहास (4), संस्कृती (3), हिंदुत्व (1), सामाजिक (2),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.